ऑस्ट्रियातील सुरक्षायंत्रणाकडून कट्टरपंथियांविरोधात मोठी कारवाई  – ‘मुस्लिम ब्रदरहूड’ व ‘हमास’शी निगडित ३० संशयित ताब्यात

ऑस्ट्रियातील सुरक्षायंत्रणाकडून कट्टरपंथियांविरोधात मोठी कारवाई  – ‘मुस्लिम ब्रदरहूड’ व ‘हमास’शी निगडित ३० संशयित ताब्यात
व्हिएन्ना – ऑस्ट्रियात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण होत असतानाच, सुरक्षायंत्रणांनी कट्टरपंथियांविरोधात मोठी कारवाई केली आहे. सोमवारी ऑस्ट्रियन यंत्रणांनी ‘मुस्लिम ब्रदरहूड’ व ‘हमास’शी निगडित ठिकाणांवर धाडी टाकून ३० हून अधिक संशयितांना अटक केली आहे. यावेळी कोट्यवधी युरोची रोकड तसेच कागदपत्रेही जप्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर, युरोपियन कौन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल व फ्रान्सचे वरिष्ठ मंत्री क्लेमेंट ब्युन यांनी ऑस्ट्रियाला भेट दिली असून दहशतवादविरोधी संघर्षाच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या आठवड्यात ऑस्ट्रियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, एका दहशतवाद्यासह पाचजणांचा बळी गेला असून १७ जण जखमी झाले होते. ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचा समर्थक असणाऱ्या दहशतवाद्याने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. ऑस्ट्रियात झालेल्या या हल्ल्यापूर्वी फ्रान्समध्ये एका महिन्यात तीन दहशतवादी हल्ले झाले होते. एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांवर युरोपातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. फ्रान्स व ऑस्ट्रिया या दोन्ही देशांनी कट्टरपंथीय तसेच दहशतवादी गटांविरोधात व्यापक कारवाईचे संकेत दिले होते. सोमवारी ऑस्ट्रियन यंत्रणांनी केलेली कारवाई त्याचाच भाग ठरतो.
ऑस्ट्रियन पोलीस व दहशतवादविरोधी पथकाने ‘लक्झर’ या नावाने राबविलेल्या मोहिमेअंतर्गत चार प्रांतांमध्ये ६०हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या प्रांतांमध्ये व्हिएन्ना, लोअर ऑस्ट्रिया, स्टायरिया व कॅरिंथिआ यांचा समावेश आहे. ९००हून अधिक पोलीस अधिकारी व जवान या मोहिमेत सहभागी झाले होते. कट्टरपंथियांची मुळे उखडून फेकणे हा या मोहिमेचा उद्देश होता, अशी माहिती ऑस्ट्रियाचे सुरक्षमंत्री कार्ल नेहॅमर यांनी दिली. ७०हून अधिक संशयितांची चौकशी सुरू असून ३० जणांना अटक करण्यात आली आहे. मुस्लिम ब्रदरहूड व हमासशी निगडित असलेल्या तसेच त्यांचे समर्थन करणाऱ्या गटांचीही चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती ऑस्ट्रियन यंत्रणांनी दिली. दहशतवादी गट स्थापन करणे, दहशतवादाला अर्थसहाय्य पुरविणे व पैशांची अफरातफर असे आरोप संशयितांवर ठेवण्यात आल्याचेही ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कारवाई करण्यात आलेल्या संघटनांपैकी हमासला युरोपिय महासंघाने दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. तर मुस्लिम ब्रदरहूड ही कट्टरपंथी संघटना म्हणून ओळखण्यात येते. त्यामुळे ऑस्ट्रियाने केलेली कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते. ऑस्ट्रियाकडून ही कारवाई सुरु असतानाच युरोपियन कौन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल व फ्रान्सचे ‘युरोपियन अफेअर्स मिनिस्टर’ क्लेमेंट ब्युन यांनी ऑस्ट्रियाला भेट दिली. या भेटीत ऑस्ट्रियन चॅन्सेलर सेबॅस्टिअन कर्झ यांच्याशी दहशतवादविरोधी संघर्षाच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती ऑस्ट्रियन माध्यमांनी दिली. यावेळी चॅन्सेलर कर्झ यांनी, युरोपात कट्टरपंथीयांविरोधात एकत्रित व व्यापक मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याची मागणी केल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, फ्रान्स व ग्रीसने दहशतवादविरोधी संघर्षाच्या मुद्यावर ‘स्पेशल टास्क फोर्स’ची उभारणी केल्याची माहिती ग्रीक माध्यमांनी दिली आहे. हा टास्क फोर्स संशयित दहशतवाद्यांसंदर्भात माहितीची देवाणघेवाण करणे, त्यांची टेहळणी व इतर मुद्यांवर समन्वय ठेवण्याचे काम करेल, असा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्रीक पत्रकाराने आयएसचे ६०० दहशतवादी ग्रीसमध्ये असल्याचा खळबळजनक दावा मुलाखतीमध्ये केला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info