धोकादायक बनलेल्या इराणविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट करावी

धोकादायक बनलेल्या इराणविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट करावी

रियाध – ‘आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम राबविणार्‍या व दहशतवादाला चिथावणी देणार्‍या इराणपासून असलेला धोका वाढत चालला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणविरोधात ठाम भूमिका स्वीकारायलाच हवी’, असे आवाहन सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी केले. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प पराभूत झाल्याच्या बातम्यांनी आत्मविश्वास दुणावलेल्या इराणने काही तासांपूर्वी अरब देशांना धमकावले होते. त्यानंतर सौदीचे राजे सलमान यांनी जागतिक समुदायाला हे आवाहन केले आहे. दरम्यान, सौदीचे उपसंरक्षणमंत्री आणि अमेरिकेने इराणसाठी नियुक्त केलेल्या विशेषदूतांमध्ये बुधवारी विशेष बैठक पार पडली.

सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी सौदीच्या सल्लागार समितीच्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना इराणपासून वाढत असलेल्या धोक्याची जगाला जाणीव करुन दिली. ‘इराणने आखातात मोठी मोहीम छेडली आहे. इराण इतर देशांच्या राजकारणात ढवळाढवळ करीत आहे, दहशतवादाला चिथावणी देत आहे, सांप्रदायिकतेची आग भडकावित आहे. अशा या इराणच्या विरोधात जागतिक समुदायाने निर्णायक भूमिका स्वीकारावी. सर्वसंहारक शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळविण्यापासून इराणला रोखावे’, असे आवाहन राजे सलमान यांनी या बैठकीत केले.

गेल्या तीन महिन्यात दुसर्‍यांदा राजे सलमान यांनी इराणच्या धोक्यापासून जगाला सावध करण्याचा प्रयत्‍न केला आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतही राजे सलमान यांनी इराण आखाती देशांमध्ये वांशिक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर आखातातील आपल्या सशस्त्र गटांच्या माध्यमातून इराण आखातात छुपे युद्ध छेडत असल्याचा आरोप सौदीच्या राजांनी केला होता. मंगळवारी देखील राजे सलमान यांनी आखातातील तणावासाठी इराणला जबाबदार धरले. तर इराणने सौदीच्या राजांचे आरोप फेटाळले आहेत. सौदीच्या या आरोपांना कुठलाही आधार नसल्याचा दावा इराणने केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आखातातील घडामोडींनी वेग पकडला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी यापुढे इराणवर नवे निर्बंध लादले जातील, अशी घोषणा केली आहे. प्रत्येक आघाडीवर इराणची कोंडी केली जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे. तर अमेरिकेने इराणसाठी नियुक्त केलेले विशेषदूत एलियट अब्रॅम्स यांनी सौदीचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालेद बिन सलमान यांची भेट घेतली आहे. या बैठकीत आखातातील स्थैर्य व सुरक्षा मजबूत करण्याबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी सौदीच्या संरक्षणमंत्र्यांचे सल्लागार व वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल अब्दुल्लाह ओतेबी आणि येमेनसाठीचे सौदीचे राजदूत देखील उपस्थित होते. अमेरिका व सौदीच्या नेत्यांमध्ये झालेली ही बैठक लक्षणीय ठरत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info