चीनकडून अण्वस्त्रांची संख्या वाढविण्यासाठी छुप्या प्रकल्पांची उभारणी – अमेरिकेचा दावा

चीनकडून अण्वस्त्रांची संख्या वाढविण्यासाठी छुप्या प्रकल्पांची उभारणी – अमेरिकेचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेबरोबर संघर्षाचा भडका उडण्याचे संकेत मिळत असतानाच, चीनने आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढविण्यासाठी छुप्या रितीने प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने नाटोतील सहकारी देशांना यासंदर्भात माहिती दिल्याचा दावा, ‘द वॉशिंग्टन टाईम्स’ या दैनिकाने केला. चीनने आपल्या तीन प्रकल्पांमध्ये छुप्या रितीने अण्वस्त्रांसाठी लागणाऱ्या युरेनियम व प्लुटोनियमचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु केल्याचा इशारा अमेरिकी यंत्रणांनी दिला आहे. सध्या चीनकडे २०० ते ३०० अण्वस्त्रे असून त्याची संख्या १,००० पर्यंत वाढवावी, अशी मागणी चीनमधील काही विश्लेषकांनी केली होती.

अण्वस्त्रांची संख्या

अमेरिकी यंत्रणांनी गेल्या महिन्यात नाटोला दिलेल्या ‘ब्रीफिंग’मध्ये चीनच्या छुप्या प्रकल्पांचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स दाखविले होते. त्यात ‘जिऊकुआन’, ‘मिआनयांग’ व ‘लेशन’मधील प्रकल्पांचा समावेश आहे. या तिन्ही प्रकल्पांमध्ये चीनकडून छुप्या रितीने अण्वस्त्रांसाठी आवश्यक असणाऱ्या युरेनियम व प्लुटोनियमचे उत्पादन चालू आहे. २०१७ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात, चीनने १९८७ साली युरेनियमचे तर १९९१ साली प्लुटोनियमचे उत्पादन बंद केल्याची माहिती देण्यात आली होती. असे असतानाही चीनने अण्वस्त्रांसाठी लागणाऱ्या युरेनियम व प्लुटोनियमची निर्मिती गुप्तपणे चालू ठेवल्याचे अमेरिकेच्या दाव्यातून उघड होत आहे. चीनने ही माहिती तसेच आपल्या ताफ्यात नक्की किती अण्वस्त्रे आहेत, याची माहिती कधीच खुली केलेली नाही, याकडेही अमेरिकी अधिकाऱ्यानी लक्ष वेधले.

अण्वस्त्रांची संख्या

चीनने आपल्या अणुचाचणी घेण्यात येणाऱ्या जागेचाही मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. या जागेवर चीनने गुप्तपणे अणुचाचण्या केल्याचेही अमेरिकेने आपल्या यापूर्वीच्या अहवालात म्हटले होते. चीनच्या लष्करी संचलनातील नव्या अण्वस्त्रांच्या संख्येतही गेल्या दशकभरात वाढ दिसून आल्याचे नाटोला दिलेल्या ब्रीफिंगमध्ये सांगण्यात आले आहे.

दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने, ‘मिलिटरी अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्हिंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना २०२०’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात, अमेरिका व रशियाप्रमाणे ‘न्यूक्लिअर ट्रायड’ क्षमता मिळविण्यासाठी चीन जोरदार हालचाली करीत असून येत्या दशकभरात चीनकडील अण्वस्त्रांचा साठा दुपटीहून अधिक वाढलेला असेल, असा इशारा देण्यात आला होता. मे महिन्यात चीनच्या एका आघाडीच्या दैनिकाने, अमेरिकेच्या सामरिक महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी चीनने किमान हजार अण्वस्त्रांसह सज्ज रहावे, अशी मागणी केली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info