अमेरिकेची ‘बी-५२’ बॉम्बर्स आखातात तैनात – अमेरिकेच्या सेंट्रल कमांडची घोषणा

अमेरिकेची ‘बी-५२’ बॉम्बर्स आखातात तैनात – अमेरिकेच्या सेंट्रल कमांडची घोषणा

मायनट – किमान १४ हजार किलोमीटर सलग उड्डाण करू शकणारी अमेरिकेची ‘बी-५२एच’ बॉम्बर्स अण्वस्त्रवाहू विमाने आखातात दाखल झाली आहेत. मर्यादेपक्षा अधिक युरेनियमचे संवर्धन करणार्‍या इराणला संदेश देण्यासाठी अमेरिकेने या बॉम्बर विमानांची तैनाती केल्याचे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे. त्याचवेळी अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये छुपी लष्करी मोहिम छेडण्याची तयारी केल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराणचे वरिष्ठ कमांडर कासेम सुलेमानी यांना ठार झाल्यानंतर ‘बी-५२एच’ बॉम्बर्सचा ताफा हिंदी महासागरासाठी रवाना केला होता. आखातातील अमेरिकेच्या लष्करी मोहिमांची जबाबदारी असलेल्या ‘सेंट्रल कमांड’ किंवा ‘सेंटकॉम’ने शुक्रवारी ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमाने त्याचबरोबर सहाय्यक विमानांचा ताफा आखाती देशांसाठी रवाना केल्याचे सांगितले.

आखातातील कुठल्या देशात ही विमाने तैनात केली आहेत किंवा किती बॉम्बर्स विमाने रवाना केली, याचे तपशील ‘सेंटकॉम’ने प्रसिद्ध केले नाहीत. पण कमीतकमी वेळेत या विमानांची तैनाती करून अमेरिकेच्या मित्र आणि सहकारी देशांना आश्‍वस्त करण्याची जबाबदारी या बॉम्बर्स विमानांवर सोपविण्यात आल्याचे ‘सेंटकॉम’ने स्पष्ट केले. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या हंगामी संरक्षणमंत्र्यांनी अफगाणिस्तान आणि इराकमधून सैन्यमाघारीची घोषणा केली होती. पुढच्या दोन महिन्यांच्या कालावधीत अमेरिका ही सैन्यमाघार घेणार असून त्या पार्श्‍वभूमीवर, या ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमानांची आखातात तातडीने तैनाती केल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ कतारच्या दौर्‍यावर असताना, सदर बॉम्बर्स विमानांचे आखातात दाखल होणे निराळेच संकेत देणारे असल्याचाही दावा केला जातो. तर अमेरिकेतील पत्रकार व लष्करी विश्‍लेषकांनी ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमानांची तैनाती इराणशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.

आखाती देशांना धमकावणार्‍या तसेच मर्यादेपेक्षा १२ पट अधिक युरेनियमचे संवर्धन करणार्‍या इराणला सुस्पष्ट संदेश देण्यासाठी अमेरिकेने ‘बी-५२एच’ बॉम्बर्सचे पथक आखातात रवाना केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच इराणच्या नातांझ अणुप्रकल्पावर हल्ला चढविण्याच्या पर्यायाचा विचार केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, ‘बी-५२एच’ बॉम्बर्सच्या तैनातीकडे पाहिले जाते. याआधी जानेवारी महिन्यात अमेरिकेने सहा ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमानांचे पथक इराणपासून तीन हजार मैल अंतरावर असलेल्या हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावरील लष्करी तळावर तैनात केले होते. कासेम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणकडून हल्ल्याचा धोका ओळखून अमेरिकेने बी-५२ बॉम्बर विमाने रवाना केली होती. अमेरिकेच्या बॉम्बर्स विमानांची आखातातील तैनाती ही व्यूहरचनात्मक खेळी असल्याचे या लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द संपण्यासाठी दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत इराणवर नवे आर्थिक निर्बंध लादून दडपण वाढविण्याची योजना अमेरिकेने आखली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात छुपी लष्करी मोहीम छेडण्याची तयारी केल्याची बातमी इस्रायलच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली. आपल्या अणुप्रकल्पावर हल्ला झाल्या, भयंकर युद्ध छेडण्याचा इशारा याआधीच इराणने दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका आणि इस्रायलमधून येत असलेल्या या बातम्यांचे गांभीर्य वाढले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info