तुर्कीकडून सोमालियन निर्वासितांना ग्रीसमध्ये घुसवले जात आहे – ग्रीसच्या मंत्र्यांचा आरोप

तुर्कीकडून सोमालियन निर्वासितांना ग्रीसमध्ये घुसवले जात आहे – ग्रीसच्या मंत्र्यांचा आरोप

अथेन्स/अंकारा – तुर्कीकडून सोमालियातील निर्वासितांना ग्रीसमध्ये घुसविण्याच्या कारवाया सुरू आहेत, असा आरोप ग्रीसच्या मंत्र्यांनी केला आहे. गेल्या महिन्याभरात अशा रितीने घुसविलेले सुमारे दीडशे सोमालियन निर्वासित ग्रीसच्या लेस्बोस बेटावर दाखल झाल्याचे समोर आले आहे, अशी माहितीही ग्रीक मंत्र्यांनी दिली. काही महिन्यांपूर्वीच तुर्की जाणुनबुजून हजारो निर्वासितांना ग्रीसच्या सीमेकडे ढकलत असल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सवरून उघड झाले होते. त्यानंतर ग्रीसने निर्वासितांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुंपण उभारून अतिरिक्त सुरक्षादले तैनात केली होती.

सोमालियन निर्वासित, घुसविण्याच्या कारवाया, मायग्रेशन मिनिस्टर, निर्वासित, दबाव आणण्याच्या कारवाया, तुर्की, ग्रीस, इंधनक्षेत्र, TWW, Third World War

सध्या ग्रीस व तुर्कीमध्ये भूमध्य सागरातील इंधनक्षेत्राच्या मुद्यावरून प्रचंड तणाव आहे. तुर्कीने सातत्याने आपली जहाजे ग्रीसच्या हद्दीनजिक पाठवून तसेच धमक्या देऊन ग्रीसला चिथावणी द्यायचा प्रयत्न चालविला आहे. ग्रीसने त्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन तुर्कीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती केली आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरून तुर्कीवर दडपण आणण्यातही ग्रीस यशस्वी ठरला असून, युरोपिय महासंघाने याच मुद्यावरून तुर्कीवर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. हे निर्बंध टाळण्यासाठी तुर्कीने गेल्या काही दिवसात युरोपबरोबर सामोपचाराची भाषा सुरू केली होती.

सोमालियन निर्वासित, घुसविण्याच्या कारवाया, मायग्रेशन मिनिस्टर, निर्वासित, दबाव आणण्याच्या कारवाया, तुर्की, ग्रीस, इंधनक्षेत्र, TWW, Third World War

मात्र हे करीत असतानाच दुसऱ्या बाजूला तुर्कीकडून निर्वासितांचा वापर करून ग्रीस व युरोपवर दबाव आणण्याच्या कारवाया चालूच असल्याचे दिसत आहे. 2016 साली युरोप व तुर्कीत झालेल्या करारानुसार, युरोपमध्ये येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यांना आश्रय देण्याची जबाबदारी तुर्कीवर सोपविण्यात आली होती. त्यासाठी तुर्कीला अर्थसहाय्य देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर व्यापारी सवलतीही पुरविण्यात आल्या होत्या. पण तुर्कीने याचा गैरफायदा घेऊन आपल्याकडील निर्वासितांचा वापर युरोपविरोधातील शस्त्र म्हणून करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी लाखो निर्वासितांचे लोंढे युरोपवर सोडू, असे धमकावले होते.

सोमालियन निर्वासित, घुसविण्याच्या कारवाया, मायग्रेशन मिनिस्टर, निर्वासित, दबाव आणण्याच्या कारवाया, तुर्की, ग्रीस, इंधनक्षेत्र, TWW, Third World War

या पार्श्‍वभूमीवर ग्रीसच्या मंत्र्यांनी तुर्कीवर केलेला नवा आरोप लक्ष वेधून घेणारा ठरतो. ग्रीसचे ‘मायग्रेशन मिनिस्टर’ नोतिस मिताराकिस यांनी तुर्कीवर निर्वासितांना घुसविण्याचा ठपका ठेवतानाच त्यामागील कार्यपद्धतीही उघड केली. सोमालियातील तुर्कीचा दूतावास व तुर्कीच्या इतर सरकारी विभागांकडून सोमाली नागरिकांना निर्वासित म्हणून तुर्कीत येण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी ‘स्टुडंट व्हिसा’चा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. तुर्कीत दाखल झाल्यानंतर काही दिवस इतर शहरांमध्ये ठेऊन मग या निर्वासितांना तुर्की-ग्रीस सीमेनजिकच्या भागांमध्ये आणून सोडले जाते, अशी माहिती ग्रीसचे मंत्री मिताराकिस यांनी दिली.

तुर्कीने गेल्या काही महिन्यात जवळपास 300 सोमाली नागरिकांना निर्वासित म्हणून आपल्या देशात आणल्याचा दावाही ग्रीसच्या मंत्र्यांनी केला. गेल्या महिन्याभरात ग्रीसमध्ये दाखल होणाऱ्या निर्वासितांमध्ये जवळपास दीडशे सोमाली निर्वासित होते, याकडेही ग्रीसने लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी ग्रीसने एका बोटीवरून वाचविलेल्या निर्वासितांमध्येही सोमाली निर्वासितांचा समावेश होता. त्यातील काहीनिर्वासितांनी आपल्याला तुर्की यंत्रणांनी सहाय्य केल्याची कबुली दिल्याचेही ग्रीसच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले.

तुर्कीच्या या नव्या कुरापतींमुळे ग्रीस व तुर्कीमध्ये चिघळलेला तणाव अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info