चीनच्या महत्त्वाकांक्षांमुळे पुढील ‘९/११’ अंतराळात घडेल – विश्‍लेषक गॉर्डन चँग यांचा इशारा

चीनच्या महत्त्वाकांक्षांमुळे पुढील ‘९/११’ अंतराळात घडेल – विश्‍लेषक गॉर्डन चँग यांचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘चीन चंद्रावर ताबा मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे. अमेरिकेने अंतराळातील आपल्या स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत तर महत्त्वाकांक्षी चीन पुढील ९/११ अंतराळक्षेत्रात घडवेल व अमेरिकन्स त्याचे बळी ठरतील’, असा खळबळजनक इशारा अमेरिकी विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी दिला. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनबरोबर अंतराळक्षेत्रात भागीदारीसाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला त्यांच्या निकटवर्तियांनी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर, चँग यांनी अंतराळातील चीनच्या महत्त्वाकांक्षांची जाणीव करून देत त्याची तुलना थेट ‘९/११’च्या हल्ल्याबरोबर केली.

अमेरिकेतील आघाडीची वेबसाईट ‘पॉलिटिको’वर प्रसिद्ध झालेल्या बातमीत, नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनबरोबर अंतराळक्षेत्रातील मर्यादित भागीदारीसाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला त्यांच्या निकटवर्तियांनी दिल्याचे म्हटले आहे. यावर अमेरिकी वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, विश्‍लेषक गॉर्डन जी. चँग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यावर जोरदार कोरडे ओढले आहेत. ‘अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे अंतराळविषयक धोरण मूर्खपणाचे होते. या काळात अमेरिकेने चीनला पुढे जाण्याची संधी दिली व आपण पिछाडीवर पडलो. याच काळात काम केलेले अधिकारी आता नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांना चीनबाबत सल्ला देत आहेत’, याची जाणीव चँग यांनी करून दिली.

‘चीनबरोबर अंतराळक्षेत्रात सहकार्य ही बाब कागदावर खूप छान वाटते. पण त्याचवेळी चीन आपल्या अब्जावधी डॉलर्सवर डल्ला मारत आहे, हे विसरून चालणार नाही. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे चीनचा अंतराळ कार्यक्रम त्यांच्या लष्कराकडून हाताळला जातो. त्यामुळे अमेरिकेने केलेले सहकार्य शेवटी चीनच्या लष्कराच्या फायद्याचे ठरणार आहे. याच सहकार्यातून मिळविलेल्या क्षमतांच्या आधारावर चीनचे लष्कर अमेरिकी नागरिकांना संपविणार आहे. हे लक्षात घेतले तरी बायडेन यांना सल्ला देणारे किती धोकादायक प्रस्ताव देत आहेत, हे लक्षात येईल’, अशा आक्रमक शब्दात चँग यांनी बायडेन यांच्या सल्लागारांना फटकारले.

‘ओबामा यांनी सूत्रे हाती घेताना अमेरिका अंतराळक्षेत्रात चीनपेक्षा आघाडीवर होती. त्यामुळे त्यांनी चीनकडे दुर्लक्ष करून अमेरिकेची आघाडी कायम राखण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत’, असा दावाही अमेरिकी विश्‍लेषकांनी केला. मात्र त्याचा फायदा उचलून चीन व रशियाने अंतराळ क्षेत्राचे ‘लष्करीकरण’ सुरू केले आणि अंतराळातील संघर्षासाठी प्रगत शस्त्रांसह स्वतःला सज्ज करून घेतले, असा ठपका चँग यांनी ठेवला आहे. ‘चीन चंद्रावर दाखल झाला असून व्यावसायिक व लष्करी अशा दोन्ही पातळीवर चंद्रावर वर्चस्व मिळविण्यासाठी हालचाली करीत आहे. अशा स्थितीत अमेरिकेने आपल्या स्रोतांचे रक्षण करण्यासाठी वेगाने पावले उचलायला हवीत’, असा सल्लाही त्यांनी दिला.

अमेरिका चीनच्या सहाय्याशिवाय चंद्रावर पकड मिळवू शकते, असा दावा गॉर्डन चँग यांनी केला आहे. तसे झाले नाही तर महत्त्वाकांक्षी चीन वर्चस्व मिळविण्यासाठी अंतराळक्षेत्रात ९/११ इतका भयानक हल्ला घडवू शकतो आणि त्यात अमेरिकन्सचे बळी जातील, असे चँग यांनी बजावले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी, अंतराळक्षेत्रात ‘पर्ल हार्बर’च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ आता चँग यांनी अंतराळातील संभाव्य हल्ल्याची तुलना ‘९/११’शी करून पुढील काळात अंतराळातील संघर्ष अधिकाधिक तीव्र होत जाण्याचे संकेत दिले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info