चीनला रोखण्यासाठी तैवान अण्वस्त्रांचा पर्याय स्वीकारेल – ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाच्या विश्‍लेषकांचा दावा

चीनला रोखण्यासाठी तैवान अण्वस्त्रांचा पर्याय स्वीकारेल – ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाच्या विश्‍लेषकांचा दावा

तैपेई/बीजिंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन वर्षांपूर्वी तैवानवर ताबा मिळविण्यासाठी लष्करी कारवाईचा पर्यायही खुला असल्याचे जाहीर केले होते. जिनपिंग यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानला करण्यात येणार्‍या शस्त्रसहाय्यात मोठी वाढ करून लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे व प्रगत यंत्रणा देण्यासाठी करारांचा सपाटा लावला होता. मात्र पुढील महिन्यात ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर हे धोरण कायम राहिल का? यावर शंका व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसर्‍या बाजूला ट्रम्प यांच्या निर्णयांनी बिथरलेल्या चीनने तैवानवर जबरदस्त दडपण आणण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनला रोखण्यासाठी तैवान अण्वस्त्रसज्ज होण्याचा पर्याय स्वीकारू शकतो, असा दावा ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाच्या विश्‍लेषकांनी केला आहे.

‘द ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या(एएसपीआय) अ‍ॅलेक्स लिटिलफिल्ड व अ‍ॅडम लोथर यांनी ‘द स्ट्रॅटेजिस्ट’ या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात तैवानच्या अण्वस्त्रसज्जतेची शक्यता वर्तविली आहे. अमेरिकी विश्‍लेषक मायकल पिल्सबरी यांनी, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीपुढे २०४९ सालापर्यंत हाँगकाँग व तैवानला पुन्हा चीनचा हिस्सा बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले होते. त्याचा उल्लेख करून लिटिलफिल्ड व लोथर यांनी चीनच्या सध्याच्या आक्रमक कारवायांकडे लक्ष वेधले आहे. त्याचवेळी अमेरिकेत बायडेन सत्तेवर आल्यानंतर चीनबाबतच्या धोरणात होणार्‍या संभाव्य बदलांची जाणीवही करून दिली.

‘बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेचे चीनबाबतचे धोरण डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे आक्रमक नसेल. अमेरिकेच्या तैवानबाबतच्या धोरणात जी संदिग्धता आहे ती बायडेन पुढेही कायम ठेवतील. ज्यो बायडेन चीनशी जुळवून घेण्याचा व सल्लामसलत करून पुढे जाण्याचा मार्ग अवलंबू शकतात. त्यांच्या या भूमिकेची खात्री असणारा चीन तैवानवरील दबाव अधिकाधिक वाढविण्यासाठी हालचाली सुरू ठेवेल. चीनच्या या हालचाली आणि अमेरिकेच्या ठाम सहकार्याबाबत असलेली अनिश्‍चितता, यामुळे तैवानच्या नेतृत्त्वाला स्वातंत्र्य टिकविण्यासाठी टोकाची पावले उचलण्याची तयारी ठेवावी लागेल’, असा दावा ‘द स्ट्रॅटेजिस्ट’च्या विश्‍लेषकांनी केला आहे.

इस्रायलचे अनुकरण करून तैवान आपला गोपनीय अणुकार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करु शकतो व वेगाने अण्वस्त्रनिर्मिती करण्यासाठी ‘जपान ऑप्शन’चा आधार घेऊ शकतो, असे लिटिलफिल्ड व लोथर यांनी म्हटले आहे. यापूर्वी १९६७ व त्यानंतर १९८०च्या दशकात तैवानने आक्रमकपणे अणुकार्यक्रम राबविला होता, याकडे सदर विश्‍लेषकांनी लक्ष वेधले. १९७०च्या दशकात तैवानने आपल्या अणुकार्यक्रमाअंतर्गत ‘वेपन्स ग्रेड प्लुटोनियम’ची निर्मिती करण्यात यश मिळविले होते आणि यशस्वीरित्या ‘न्यूक्लिअर रिअ‍ॅक्शन’ही घडवून आणली होती, याची आठवण लेखात करून देण्यात आली आहे. या दोन्ही वेळेला अमेरिकेचे दडपण व चीनच्या राजवटीने बदललेले धोरण हे घटक तैवानचा अणुकार्यक्रम बंद करण्यास कारणीभूत ठरल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तैवानकडे अण्वस्त्रे आली तर चीनच्या राजवटीसाठी आक्रमणाचा पर्याय वापरणे अधिक अवघड ठरेल, असा दावा विश्‍लेषकांनी केला. अमेरिकेतील चिनी धोरणाचे अभ्यासक व विश्‍लेषक तैेवानच्या अण्वस्त्रज्जतेची शक्यता हवेत उडवून लावू शकतात. याचे कारण त्यांना चीनकडून तैवानवर टाकण्यात येणार्‍या जबरदस्त दडपणाची जाणीव नसणे, हे असू शकते, असेही लिटिलफिल्ड व लोथर यांनी म्हटले आहे. चीनच्या राजवटीने हाँगकाँगवर केलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर तैवानी जनतेत चीनविरोधात तीव्र असंतोषाची भावना आहे. त्यामुळे तैवानचे नेतृत्त्व अमेरिकेबरोबर किंवा त्याच्याशिवाय आपले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकेल, असे ‘द स्ट्रॅटेजिस्ट’च्या लेखात बजावण्यात आले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info