अफगाणी लष्कराच्या कारवाईत ५८ तालिबानी ठार

अफगाणी लष्कराच्या कारवाईत ५८ तालिबानी ठार

काबुल – अफगाणी लष्कराने कंदहार आणि फराह प्रांतात केलेल्या कारवाईत तालिबानच्या ५८ दहशतवाद्यांना ठार केले. यानंतर शनिवारी तालिबानने चढविलेल्या हल्ल्यात अफगाणी लष्कराच्या १२ जवानांचा बळी गेला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात घातपात?घडवून तालिबानने येथील शांतीचर्चा धोक्यात टाकल्याची टीका अमेरिकेने केली आहे. तरीही अफगाणिस्तानातील या संघर्षावर वाटाघाटीतून पर्याय काढण्याचे संकेत बायडेन प्रशासनाने दिले आहेत.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अफगाणी लष्कराने तालिबानचे वर्चस्व असलेल्या कंदहार प्रांतात मोठी कारवाई केली. येथील दांड, अरघांदाब आणि पंजवायी या जिल्ह्यांमधील तालिबानच्या ठिकाणांवर हल्ले चढवून किमान ५२ दहशतवाद्यांचा खातमा केला. या व्यतिरिक्त दहशतवाद्यांकडील १९ बॉम्बताब्यात घेतले व तीन बंकर्स नष्ट केले.

तर इराणच्या सीमेजवळ असलेल्या फराह प्रांतात अफगाणी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सनी तालिबानच्या मोटारीला लक्ष्य केले. या कारवाईत सहा तालिबानी जागीच ठार झाले. एका दिवसातील या कारवाईत अफगाणी लष्कराच्या चार जवानांचा बळी गेला. या कारवाईनंतर खवळलेल्या तालिबानने नानंगरहार प्रांतातील अफगाणी लष्कराच्या तळावर चढविलेल्या आत्मघाती हल्ल्यात आठ सुरक्षा जवानांचा बळी गेल्याची माहिती अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी दिली. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

अफगाण सरकारबरोबर वाटाघाटी करणारी तालिबान अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले घडवून संघर्षबंदीच्या कराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप अफगाण सरकार करीत आहे. गेल्या वर्षभरात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वेगाने वाढ झाली असून अफगाणी सुरक्षा यंत्रणांना तालिबान लक्ष्य करीत असल्याचा आरोप अफगाण सरकार करीत आहे. तालिबानने देखील अमेरिकेवर संघर्षबंदीच्या उल्लंघनाचा आरोप करून इराणबरोबर चर्चा सुरू केली आहे.

अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. अफगाणिस्तानातील या हिंसाचारामुळे येथील अमेरिकी लष्कराची माघार लांबणीवर पडू शकते, असे अत्यंत महत्त्वपूर्ण संकेत किरबाय यांनी दिले आहेत.

English  https://worldwarthird.com/index.php/2021/01/30/58-talibani-killed-afghanistan-military-action-hindi/

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info