अमेरिका रशियाविरोधात छुपे सायबरहल्ले चढविणार – अमेरिकी दैनिकाचा दावा

अमेरिका रशियाविरोधात छुपे सायबरहल्ले चढविणार – अमेरिकी दैनिकाचा दावा

वॉशिंग्टन – गेल्या वर्षी अमेरिकेच्या सरकारी विभागांवर झालेल्या मोठ्या सायबरहल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचे उघड झाले होते. रशियाच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी अमेरिकी प्रशासनाने केली असून रशियन नेटवर्क्सवर छुपे सायबरहल्ले चढविले जातील, असे संकेत अमेरिकी अधिकार्‍यांकडून देण्यात आले आहेत. अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने यासंदर्भात दावा करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

अमेरिकेतील ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘फायर आय’ व ‘सोलरविंड्स’सारख्या खाजगी कंपन्या रशियन सायबरहल्ल्याचे लक्ष्य झाल्याचे गेल्या वर्षी समोर आले होते. या कंपन्यांच्या माध्यमातून रशियन हॅकर्सनी अमेरिकेतील महत्त्वाच्या सरकारी विभागांच्या नेटवर्क्सवर सायबरहल्ले चढविले होते. त्यात संरक्षण, ऊर्जा, अर्थ व व्यापार विभागाचा समावेश होता. अमेरिकेतील ‘न्यूक्लिअर नेटवर्क्स’नाही त्याचा फटका बसल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती.

‘हा एक अतिशय मोठा हल्ला आहे आणि जी माहिती हाती आली आहे त्यानुसार या हल्ल्यामागे रशियाचा हात आहे, असे ठामपणे सांगता येईल’, या शब्दात अमेरिकेचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकेवर झालेल्या सायबरहल्ल्यामागे रशियाचा हात असल्याची स्पष्ट कबुली दिली होती. अमेरिकेच्या प्रमुख गुप्तचर तसेच तपासयंत्रणांकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या ज्यो बायडेन यांनी प्रशासनाला प्रत्युत्तर देण्याची योजना सादर करण्याचे निर्देश दिले होते.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन व राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार अ‍ॅन न्यूबर्गर यांच्याकडे यासंदर्भातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. न्यूबर्गर यांची ‘सायबर अ‍ॅण्ड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज्’ या विभागाच्या सुरक्षा उपसल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांनी यापूर्वी ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’त अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते आपल्या अनुभवाचा वापर करून रशियातील महत्त्वाच्या नेटवर्क्सना लक्ष्य करतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तसेच गुप्तचर यंत्रणा व लष्कराशी संबंधित यंत्रणांचा त्यात समावेश असेल असे सांगितले जाते.

येत्या तीन आठवड्यांच्या कालावधीत ही कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. छुप्या सायबरहल्ल्याबरोबरच आक्रमक निर्बंध लादण्याचाही विचार असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने नॅव्हॅल्नी प्रकरणावरून रशियावर कठोर निर्बंधांची घोषणाही केली होती. त्यात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निकटवर्तियांचा समावेश होता.

रशियाच्या सायबरहल्ल्यानंतर चीनकडूनही मोठा सायबरहल्ला झाल्याचे समोर आले आहे. हा सायबरहल्ला ‘अ‍ॅक्टिव्ह थे्रट’ असल्याचे बायडेन प्रशासनाकडून बजावण्यात आले असले तरी त्याविरोधात अद्याप कारवाईचे संकेत देण्यात आलेले नाहीत.

English  English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info