निदर्शकांवर म्यानमारच्या लष्कराने केलेल्या कारवाईत ९१ जणांचा बळी

निदर्शकांवर म्यानमारच्या लष्कराने केलेल्या कारवाईत ९१ जणांचा बळी

नेप्यितौ/यांगून – म्यानमारच्या लष्कराने लोकशाहीवादी निदर्शकांविरोधात केलेल्या क्रूर कारवाईत ९० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. मंडाले व यांगूनसह देशातील ४० शहरांमध्ये झालेल्या कारवाईत हे बळी गेले असून, गेल्या दीड महिन्यातील ही सर्वात मोठी व पाशवी कारवाई ठरली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये सशस्त्र जवान निरपराध जनतेवर गोळ्या झाडत असतानाच राजधानी नैप्यितौमध्ये लष्कराकडून ‘आर्म्ड फोर्सेस डे’चे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये लष्कराविरोधात सुरू असणारे आंदोलन अधिकाधिक तीव्र रुप धारण करताना दिसत आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून सामान्य नागरिकांसह विविध धार्मिक गट तसेच बंडखोर संघटनाही आंदोलनात उतरल्याचे समोर आले आहे. आंदोलनाला मिळणारे हे वाढते समर्थन पाहून लष्कर बिथरले असून त्यांनी आपल्या कारवाईची व्याप्ती व तीव्रता अधिकच वाढविली आहे.

म्यानमारच्या लष्कराने काही दिवसांपूर्वी यांगून, मंडाले व जवळच्या भागांमध्ये केलेल्या भीषण कारवाईत एका दिवसात ६०हून अधिक जणांचा बळी गेला होता. मात्र शनिवारी म्यानमारच्या लष्कराने क्रौर्याच्या सर्व मर्यादा पार केल्याचे दिसून आले. शनिवारी पहाटेपासून म्यानमारी लष्कराने देशाच्या विविध शहरांमध्ये कारवाई हाती घेतल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावर उतरून विरोध करणार्‍या निदर्शकांबरोबरच घरात राहणार्‍या निरपराध नागरिकांना यात लक्ष्य करण्यात आले.

‘म्यानमार नाऊ’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये ९१ जणांचा बळी गेल्याचे उघड झाले आहे. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची गेल्या दीड महिन्यांमधील ही पहिलीच वेळ ठरली आहे.या घटनेनंतर लष्कराने आतापर्यंत केलेल्या कारवाईतील बळींची संख्या ४००वर जाऊन पोहोचल्याचे सांगण्यात येते. शनिवारची ही भीषण कारवाई म्हणजे लष्करासाठी ‘डे ऑफ शेम’ असल्याची टीका देशातील लोकशाहीवादी गटांनी केली आहे.

शनिवारी केलेल्या कारवाईला म्यानमार लष्कराकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्म्ड फोर्सेस डे’ची पार्श्‍वभूमी असल्याचे सांगण्यात येते. राजधानी नैप्यितौमध्ये जनरल मिन आँग हलेंग यांच्या उपस्थितीती लष्करी संचलन व इतर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमात निदर्शनांचा अडथळा होऊ नये म्हणून शनिवारी आक्रमक कारवाई हाती घेण्यात आली असावी, असा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे.

शनिवारच्या कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी लष्कराकडून आंदोलकांना उघड धमकीही देण्यात आली होती. शनिवारी ‘आर्म्ड फोर्सेस डे’च्या कार्यक्रमादरम्यान आंदोलन झाले तर निदर्शकांच्या डोक्यात व पाठीवर गोळ्या झाडल्या जातील, असा इशारा लष्कराशी निगडित वृत्तवाहिनीवरुन देण्यात आला होता. याआधी झालेल्या कारवाईत ज्यांचे बळी गेले आहेत त्यावरून आंदोलनात सहभागी होणार्‍या निदर्शकांनी योग्य तो धडा घ्यावा, असेही इशार्‍यात बजावण्यात आले होते.

दरम्यान, शनिवारी झालेल्या लष्करी कारवाईदरम्यान यांगूनमधील ‘अमेरिकन सेंटर’च्या इमारतीवरही गोळ्या झाडण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info