फिलिपाईन्सच्या हवाई दलाकडून चीनच्या घुसखोर जहाजांवर घिरट्या

फिलिपाईन्सच्या हवाई दलाकडून चीनच्या घुसखोर जहाजांवर घिरट्या

मनिला – गेल्या चार आठवड्यांपासून आपल्या सागरी क्षेत्रात घुसखोरी करणार्‍या चीनच्या सशस्त्र जहाजांवरुन फिलिपाईन्सच्या हवाई दलाने घिरट्या घातल्या आहेत. लवकरच या क्षेत्रात आपल्या नौदलाची तैनातीही वाढविण्यात येईल, अशी घोषणा फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेंझा यांनी केली. त्याचबरोबर चीनने त्वरीत आपल्या जहाजांना माघारी घ्यावे, असे नवे आवाहन संरक्षणमंत्री लॉरेन्झा यांनी केले. दरम्यान, फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत मिलिशिया जहाजांची घुसखोरी करणार्‍या चीनवर अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने टीकेची झोड उठविली होती. फिलिपाईन्सच्या सार्वभौम अधिकारांना आपला पाठिंबा असल्याचे या तिन्ही देशांनी म्हटले होते.

या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या सुमारे २२० जहाजांनी फिलिपाईन्सच्या ‘जुलियन फिलिप’ या द्विपाच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. फिलिपाईन्सच्या परवानगीशिवाय चीनच्या जहाजांनी आपल्या हद्दीत नांगर टाकल्याचा आरोप फिलिपाईन्सने दिवसांपूर्वी केला होता. या जहाजांचे नेतृत्व लष्करी प्रशिक्षण घेतलेले मिलिशिया अर्थात सशस्त्र दल असल्याचा आरोप फिलिपाईन्सच्या सरकारने केला होता. मिलिशिया जहाजे रवाना करून चीन या सागरी क्षेत्राचे लष्करीकरण करीत असल्याची टीकाही फिलिपाईन्सने केली. तसेच चीनने ही जहाजे माघारी घ्यावी, असे आवाहन फिलिपाईन्सने केले होते.

पण चार आठवडे उलटल्यानंतरही चीनने ही जहाजे या क्षेत्रातून माघारी घेतलेली नाहीत. या पार्श्‍वभूमीवर, सदर चिनी जहाजांवरून आपल्या लढाऊ विमानांची गस्ती सुरू केल्याची घोषणा संरक्षणमंत्री लॉरेंझा यांनी केली. ही गस्त दररोज सुरू असणार असून लवकरच फिलिपाईन्सच्या नौदलाच्या विनाशिका, गस्तीनौका देखील या क्षेत्रात तैनात केल्या जातील, अशी माहिती लॉरेंझा यांनी दिली. फिलिपाईन्स आपल्या सार्वभौम अधिकार आणि क्षेत्राच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा इशाराही संरक्षणमंत्री लॉरेंझा यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वी फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी २०१६ साली हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ‘साऊथ चायना सी’बाबत दिलेल्या निकालाची आठवण करून दिली. संबंधित सागरी क्षेत्रावर चीनने सांगितलेला अधिकार आंतरराष्ट्रीय न्यायालयाने धुडकावला होता. तसेच चीनने या सागरी क्षेत्राचे लष्करीकरण करू नये, अशी ताकीदही दिली होती, याकडे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी लक्ष वेधले होते. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने देखील फिलिपाईन्सच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले. मात्र चीनने या प्रकरणी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info