इस्रायलकडे इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट करण्याचे सामर्थ्य – इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशारा

इस्रायलकडे इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट करण्याचे सामर्थ्य – इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशारा

तेल अविव – ‘हल्ला चढवून इराणचा अणुप्रकल्प पूर्णपणे नष्ट करण्याचे सामर्थ्य इस्रायलकडे आहे. हे सामर्थ्य प्राप्त करीत असताना, त्याचा प्रत्यक्षात वापर करण्याची तयारीही इस्रायलने ठेवलेली होती’, असा सज्जड इशारा इस्रायलच्या इराण विभागाचे प्रमुख मेजर जनरल ताल कल्मन यांनी दिला. अण्वस्त्रसज्ज इराणप्रमाणे सिरिया, लेबेनॉन आणि गाझातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून देखील इस्रायलच्या सुरक्षेला धोका असल्याचा दावा मेजर जनरल कल्मन यांनी केला. या धोक्याविरोधात इस्रायल लष्करी कारवाईचा पर्याय नेहमीच समोर असतो, असेही कल्मन यांनी स्पष्ट केले.

इराण आणि धोरणात्मक पातळीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी इस्रायलने गेल्या वर्षी ‘स्ट्रॅटेजी अँड थर्ड-सर्कल डायरेक्टोरेट’ या विभागाची स्थापना केली होती. या विभागाची जबाबदारी मेजर जनरल ताल कल्मन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इराणच्या अणुप्रकल्पाला लक्ष्य करण्याची योजना मेजर जनरल कल्मन यांनी इस्रायली परराष्ट्र मंत्रालय, गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ आणि ऍटोमिक एनर्जी कमिशन यांच्याबरोबर समन्वय साधून तयार करण्यात आली आहे. क्षेत्रीय परिस्थितीनुसार, यामध्ये वेळोवेळी बदल करून ही योजना इस्रायलच्या नेतृत्वासमोर सादर केली जाते, अशी माहिती कल्मन यांनी इस्रायली वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

‘इराणविषयक योजना मांडताना चार बाबींचा विचार करावा लागतो. यामध्ये इराणमधील कट्टरपंथी राजवटीचे महत्त्व ध्यानात घ्यायला हवे. कारण इराणमध्ये ही कट्टरपंथी राजवट असेपर्यंत इस्रायलच्या सुरक्षेला कायम धोका असेल. त्यानंतर इराणचा अणुकार्यक्रम, या देशाचे लष्करी सामर्थ्य आणि सर्वात शेवटी या क्षेत्रातील देशांमध्ये इराणने आपला वाढविलेला प्रभाव यांचाही विचार करावा लागतो’, असे कल्मन यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या निर्बंधांसमोर इराणची राजवट कोसळेल, अशी इस्रायलला अपेक्षा होती. पण ते शक्य झाले नसल्याचे मेजर जनरल कल्मन यांनी स्पष्ट केले. तर इराणचा अणुप्रकल्प नष्ट करण्याचे सामर्थ्य आणि सज्जता इस्रायलकडे असल्याचा दावा इस्रायलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला. पण इराणकडून असलेला धोका मोठा आहे, याची जाणीव आपल्या देशाला असल्याचे मेजर जनरल कल्मन यांनी स्पष्ट केले.

इराणच्या लष्करी सामर्थ्याचा विचार करीत असताना, या देशाचे रणगाडे, तोफा, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, ड्रोन्स यांची मोजदाद करणे योग्य ठरणार नाही. कारण इस्रायलच्या सुरक्षेला धोका ठरणार्‍या इराणचे लष्करी सामर्थ्य या देशाच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही. इराणचे हे लष्करी सामर्थ्य इस्रायलच्या सीमेपर्यंत पोहोचले आहे. सिरिया, लेबेनॉनपर्यंत इराणची क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, जवान पोहोचले असून येत्या काळात गाझापट्टीतही इराणचे लष्करी सामर्थ्य पोहोचू शकते, असा इशारा मेजर जनरल कल्मन यांनी दिला. पण आपल्या सुरक्षेला असलेल्या या धोक्याविरोधात लष्करी कारवाईचा पर्याय इस्रायलसमोर नेहमीच उपलब्ध आहे, असा महत्त्वाचा इशारा कल्मन यांनी दिला.

दरम्यान, गेल्या तीस वर्षांमध्ये इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यात इस्रायलला यश मिळाले आहे. पण येत्या काळात इराण अण्वस्त्रसज्ज झाला तर आखातात अण्वस्त्रस्पर्धा भडकेल. इस्रायलचे शेजारी असलेले सौदी अरेबिया, युएई, इजिप्त, तुर्की सारखे आर्थिक समृद्धी असलेले देश देखील अण्वस्त्रनिर्मितीच्या स्पर्धेत उतरतील, असा दावा कल्मन यांनी केला.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info