अलास्का ते ‘ब्लॅक सी’पर्यंत रशियन विमानांच्या आक्रमक हालचाली

अलास्का ते ‘ब्लॅक सी’पर्यंत रशियन विमानांच्या आक्रमक हालचाली

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेबरोबर नव्या शीतयुद्धासाठी तयार असल्याचा इशारा देणार्‍या रशियाने त्याची रंगीत तालीम सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी रशियन बॉम्बर्स, लढाऊ विमाने तसेच टेहळणी विमानांनी आर्क्टिक क्षेत्रातील अलास्कापासून ते ‘ब्लॅक सी’च्या हवाईहद्दीपर्यंत आक्रमक हालचाली करून आपले सामर्थ्य दाखवून दिले. एकाच दिवसात रशियाच्या नऊ विमानांनी अशा प्रकारे धडक मारण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर अमेरिकेच्या युरोपियन कमांडने ‘हायेस्ट ऍलर्ट’ जारी केल्याचे जाहीर केले आहे.

अमेरिकेतील सत्ताबदलानंतर राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेल्या ज्यो बायडेन यांनी रशियाविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. युक्रेन, नॉर्ड स्ट्रीम२ इंधनवाहिनी, ऍलेक्सी नॅव्हॅल्नी प्रकरण व सायबरहल्ले यासारख्या मुद्यांवरून बायडेन प्रशासन सातत्याने रशियाला लक्ष्य करीत आहे. गेल्या महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा उल्लेख खुनी असा करून त्यांना त्याची किंमत मोजणे भाग पडेल, असा इशाराही दिला होता. नाटोच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाला लक्ष्य केले होते.

या पार्श्‍वभूमीवर, रशियाने आर्क्टिकपासून ते ‘ब्लॅक सी’पर्यंत आपले सामर्थ्य दाखविण्याचा केलेला प्रयत्न लक्ष वेधून घेणारा ठरतो. गेल्या काही वर्षांमध्ये रशियन विमाने, युद्धनौका तसेच पाणबुड्यांच्या युरोपिय देशांनजिकच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्याचे े सातत्याने समोर आले होते. युक्रेनच्या क्रिमिआ प्रांतावर ताबा मिळविल्यानंतर अमेरिका व युरोपने लादलेले निर्बंध आणि त्याचवेळी सुरू केलेल्या लष्करी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर ही बाब ठळकपणे दिसून आली होती. अमेरिका व नाटोकडून यासंदर्भात वारंवार इशारे देण्यात आल्यानंतरही रशियाने आपल्या हालचालींचे समर्थन केले होते.

सोमवारी रशियाने ‘नॉर्थ सी’मधील नॉर्वेच्या हद्दीनजिक एकापाठोपाठ एक अशी चार ‘बॉम्बर्स’ पाठविल्याचे समोर आले. सुरुवातीला दोन ‘टीयु-९५ बिअर बॉम्बर्स’ नॉर्थ सीच्या दक्षिण भागानजिक आढळली. या बॉम्बर्सच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नॉर्वेने आपली ‘एफ-१६’ लढाऊ विमाने रवाना केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर ब्रिटननेही आपले ‘टायफून जेट’ नॉर्वेच्या दिशेने रवाना केले. रशियन बॉम्बर्सच्या हालचाली टिपण्यासाठी बेल्जियमनेही आपली लढाऊ विमाने धाडल्याची माहिती नाटोने दिली.

या घटनेनंतर काही वेळाने रशियाची दोन ‘टीयु-१६० बॉम्बर्स’ नॉर्वेजवळच्या आंतरराष्ट्रीय हद्दीत दिसून आली. त्यांना रोखण्यासाठी नॉर्वेने पुन्हा ‘एफ-१६’ विमाने धाडली. त्याचवेळी बाल्टिक सी क्षेत्रात इटलीच्या लढाऊ विमानांनी रशियाच्या ‘आयएल-३८ मेरिटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट’ला रोखल्याची घटनाही समोर आली. नाटोच्या रडार्सनी ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्राच्या हद्दीत तीन रशियन ‘मिलिटरी एअक्राफ्ट’च्या हालचाली टिपल्या. या विमानांवर नजर ठेवण्यासाठी रोमानिया, बल्गेरिया तसेच तुर्कीने आपली लढाऊ विमाने रवाना केल्याची माहिती नाटोकडून देण्यात आली.

नाटोची रडार्स नॉर्थ सी ते ब्लॅक सी क्षेत्रात रशियन विमानांच्या हालचालींची नोंद घेत असतानाच, अलास्काच्या हद्दीनजिक रशियन विमानाच्या हालचाली टिपण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या ‘नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड’ने दिली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info