रशियापासून सुरक्षेसाठी युक्रेनला अण्वस्त्रसज्ज बनावेच लागेल -जर्मनीतील युक्रेनच्या राजदूताचा इशारा

रशियापासून सुरक्षेसाठी युक्रेनला अण्वस्त्रसज्ज बनावेच लागेल -जर्मनीतील युक्रेनच्या राजदूताचा इशारा

बर्लिन/किव्ह – ‘नाटोने युक्रेनला आपले सदस्य करुन घ्यावे. यामुळे युरोपच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी युक्रेनला योगदान देता येईल. अन्यथा अण्वस्त्रसज्ज होण्याशिवाय युक्रेनकडे दुसरा पर्याय नाही. अण्वस्त्रसज्ज बनल्यानंतरच युक्रेनला आपल्या सुरक्षेची हमी मिळेल’, असा इशारा जर्मनीतील युक्रेनच्या राजदूतांनी दिला.

रशियासमर्थक बंडखोरांनी युक्रेनच्या पूर्वेकडील भागावर हल्ले सुरू केले आहेत. तर रशियाची मानवरहीत लष्करी वाहने देखील युक्रेनच्या सीमेजवळ दाखल होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अशा परिस्थितीत, युक्रेनच्या राजदूतांनी रशियासह नाटोला हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

जर्मनीतील युक्रेनचे राजदूत अँड्रीय मेलनिक यांनी जर्मन रेडिओवाहिनीशी बोलताना, रशिया क्रिमिआप्रमाणे युक्रेनच्या पूर्वेकडील भागांचे लचके तोडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला. रशियासमर्थक बंडखोर आणि युक्रेनच्या लष्करात डोनेट्स्क आणि लुहान्स्क भागात संघर्ष सुरू असल्याची माहिती मेलनिक यांनी दिली. रशियाची ही आक्रमकता रोखण्यासाठी, युरोपिय देशांना रशियाच्या विरोधात सामर्थ्यशाली करण्यासाठी युक्रेनला नाटोचा सदस्य करणे आवश्यक असल्याचे मेलनिक यांनी सुचविले.

काही दिवसांपूर्वी नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांच्याबरोबर झालेल्या भेटीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या लष्करी संघटनेत आपल्या देशाला सामील करून घ्यावे, अशी मागणी केली होती. युक्रेनच्या या मागणीवर रशियाने संताप व्यक्त केला होता. युक्रेनला नाटोत सामील केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे रशियाने धमकावले होते. यावर युक्रेनला सदस्यत्व करायचे की नाही, हे रशिया नाही, तर नाटो ठरविल, असे सांगून नाटोच्या प्रमुखांनी रशियावर टीका केली होती. तर दोन दिवसांपूर्वी फ्रान्स व जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या बैठकीतही यावर चर्चा झाली.

अण्वस्त्रसज्ज

मात्र नाटो युक्रेनच्या समावेशाबाबत फारशी गंभीर नाही, अशी नाराजी युक्रेनकडून व्यक्त केली जाते. या पार्श्‍वभूमीवर, जर्मनीतील युक्रेनच्या राजदूतांनी नाटोला उद्देशून अण्वस्त्रसज्जतेचा इशारा दिल्याचे दिसत आहे. याशिवाय रशिया क्रिमिआमध्ये अण्वस्त्रे साठविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप युक्रेनचे संरक्षणमंत्री अँड्री टारान यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. या अण्वस्त्रांचा साठा करण्यासाठी रशिया क्रिमिआमध्ये बांधकाम करीत असल्याचे संरक्षणमंत्री अँड्री यांनी बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर, अण्वस्त्रसज्ज होण्याबाबत युक्रेनने दिलेल्या या इशार्‍याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते.

१९९१ साली सोव्हिएत रशियाचे तुकडे झाल्यानंतर स्वतंत्र झालेल्या युक्रेनकडे तीन हजार अण्वस्त्रे होती. अमेरिका, रशियानंतर सर्वाधिक अण्वस्त्रे असणारा युक्रेन हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश होता. पण १९९४ साली अण्वस्त्रप्रसारबंदी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर युक्रेनने आपली तीन हजार अण्वस्त्रे रशियाच्या हवाली केली होती. या मोबदल्यात अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने युक्रेनच्या सीमेचा आदर करण्याचे मान्य केले होते. अशा परिस्थितीत, युक्रेनने पुन्हा अण्वस्त्रसज्ज होण्याबाबत दिलेला इशारा रशिया, अमेरिकेसह, युरोपिय देशांच्या चिंता वाढविणारा ठरू शकतो.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info