अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या बरोबरीने सौदीही सिरियावर हल्ला चढविण्यास तयार – क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान

अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या बरोबरीने सौदीही सिरियावर हल्ला चढविण्यास तयार – क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान

पॅरिस – दौमा येथील रासायनिक हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेने सिरियाच्या विरोधात प्रस्ताव मांडला होता. पण रशियाने यावेळीही नकाराधिकाराचा वापर करून अमेरिकेचा  प्रयत्न उधळला. या वर्षी रशियाने चार वेळा नकाराधिकाराचा वापर करून सिरियाला वाचविले आहे. आत्तापर्यंत रशियाने सिरियासाठी 12 वेळा नकाराधिकारांचा वापर केला आहे. मात्र यावेळच्या रशियाच्या नकाराधिकारावर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या तिन्ही देशांनी सिरियाबाबत चर्चा सुरू केली असून ही सिरियावरील हल्ल्याची तयारी असल्याचा दावा केला जातो. 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सिरियातील रासायनिक हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून यासाठी अस्साद राजवटीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन पुढच्या काळात सिरियन राजवटीला कोणते शासन करायचे, याबाबतचा निर्णय घेईल, असा दावा मॅक्रॉन यांनी केला होता. याला एक दिवसाचा कालावधी उलटत नाही तोच,   अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये सिरियाबाबत चर्चा पार पडली. या चर्चेत सिरियावरील हल्ल्याचा मुद्दा अग्रक्रमावर होता, असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सध्या फ्रान्सच्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद संबोधित करताना, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सिरियन राजवटीच्या विरोधात कठोर आणि संघटितपणे कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे परखड मत व्यक्त केले. 

यामुळे सिरियावरील कारवाईत केवळ अमेरिकाच नाही तर फ्रान्स आणि ब्रिटनही सहभागी होतील, असे दिसत आहे. त्याचवेळी या तीन मित्रदेशांबरोबर सौदीही सिरियावरील हल्ल्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आपल्या मित्रदेशांनी सिरियावर हल्ला चढविल्यास सौदीही मित्रदेशांच्या बरोबर असेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे  अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व सौदी अरेबिया यांची आघाडी सिरियन राजवटीला कुठल्याही क्षणी लक्ष्य करू शकेल, असे दिसते. या युद्धात सौदीच्या बरोबरीने आखातातील सौदीचे मित्रदेशही सहभागी होऊ शकतात. यामध्ये संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, कुवैत व बाहरीन या देशांचाही समावेश असू शकतो. त्यामुळे सिरियावरील या लष्करी कारवाईची तीव्रता कितीतरी पटींनी वाढू  शकते. 

दरम्यान, सिरियावरील हल्ल्याची शक्यता वाढल्याचे दावे माध्यमांकडून केले जात असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी आपले नियोजित दौरे रद्द करून टाकल्याचे वृत्त आहे. 

युरोकंट्रोलचा इशारा

युरोपातील हवाई वाहतुकीचे नियंत्रण करणार्‍या युरोकंट्रोल या संस्थेने भूमध्य सागरातून प्रवास करणार्‍या विमानांना खबरदारीचा इशारा दिला आहे. पुढच्या 72 तासांमध्ये सिरियावर हवाई हल्ले होऊ शकतात. त्यामुळे भूमध्य सागराच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार्‍या विमानांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे युरोकंट्रोलने बजावले आहे.

युरोकंट्रोलप्रमाणे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनीही आपल्या प्रवासी वाहतूक करणार्‍या विमान कंपन्यांना सिरियन हवाई क्षेत्रात शिरण्याबाबत इशारे दिले होते. बुधवारी केवळ एका विमानाने सिरिया आणि लेबेनॉनच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्याची जोखीम पत्करल्याची माहिती उघड झाली आहे.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)

leave a reply