इराण इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत

इराण इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत

तेहरान/तेल अविव – 8 एप्रिल रोजी इस्रायलने सिरियामधील इराणच्या तळावर हल्ला चढवून इराणच्या जवानांचा बळी घेतला होता. इस्रायलला या हल्ल्याची जबर किंमत चुकती करण्यास भाग पाडू, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बजावले आहे. इराणकडून इस्रायलला दिल्या जाणार्‍या या धमक्या पोकळ नाहीत. खरोखरच इराण इस्रायलमध्ये हल्ले चढविण्याची तयारी करीत आहे, असा दावा इस्रायलचे लष्करी अधिकारी करू लागले आहेत. त्यामुळे इराण व इस्रायलमध्ये घनघोर युद्ध पेट घेईल, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.

इस्रायलने 8 एप्रिल रोजी सिरियाच्या होम्स शहरातील लष्करी तळावर हल्ला चढवून 14 जणांचा बळी घेतला होता. यात इराणच्या सात जवानांचाही समावेश असल्याचे उघड झाले होते. यानंतर खवळलेल्या इराणने इस्रायलला धमकी दिली होती. मंगळवारीही इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ‘बहारम घास्सेमी’ यांनी इस्रायलला या हल्ल्यावरून इशारा दिला. या हल्ल्याची इस्रायलला जबर किंमत चुकती करावी लागेल. इराण या हल्ल्याला योग्य ते प्रत्युत्तर देणारी कारवाई करील, असे घास्सेमी म्हणाले. इराणकडून दिल्या जात असलेल्या या धमक्या पोकळ नाहीत. तर इराण इस्रायलमध्ये हल्ल्याची जोरदार तयारी करीत आहे. यासाठी सिरियातील आपल्या तैनातीचा वापर करण्याची तयारी इराणने केली आहे, असा दावा इस्रायलचे वरिष्ठ लष्करी अधिकारी करीत आहेत.

याआधी इराण व इस्रायल यांच्यात अप्रत्यक्ष युद्ध सुरू होते. हिजबुल्ला तसेच आपल्या प्रभावाखाली असलेल्या इतर संघटनांचा वापर करून इराणने इस्रायलला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. पण आता मात्र इराण स्वतःहून इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत आहे. फेब्रुवारी महिन्यात इराणच्या ड्रोनने इस्रायली सीमेचे उल्लंघन केले होते. केवळ टेहळणी करणे हा या उल्लंघनामागील हेतू नव्हता. तर त्यामागे इराणचे सुनियोजित कारस्थान होते, असा दावा इस्रायलचे लष्करी अधिकारी करीत आहेत.

होम्सवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने सिरियातील आपल्या लष्करी प्रभावाचा वापर करून इस्रायलला जेरीस आणणारे हल्ले चढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सिरियामध्ये इराणचे कडवे लष्करी पथक ‘कुदस् फोर्स’ कार्यरत असून याचे नेतृत्त्व मेजर जनरल कासिम सुलेमानी करीत आहेत. इराक व सिरियामध्ये इराणच्या बाजूने उभे राहणार्‍या राजवटींना वाचविण्यासाठी लढणारा कणखर सेनानी अशी मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची ओळख आहे. त्यांचा अनुभव व युद्धकौशल्य याला त्यांच्या शत्रूंकडूनही दाद मिळते, असे सुलेमानी यांच्याबद्दल बोलले जाते.

अशा लष्करी अधिकार्‍याकडून इस्रायलवरील हल्ल्याची तयारी सुरू असून लवकरच इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेवरून इराणचे हल्ले सुरू होतील, असा दावा इस्रायली माध्यमे करू लागली आहेत.

हिजबुल्लाह तसेच इतर दहशतवादी संघटनांचा वापर करून इराणने आजवर इस्रायलवर हल्ले चढविण्याचा प्रयत्न केला. पण आता इराण दुसर्‍या कुणाचाही वापर न करता स्वतःच इस्रायलवर हल्ला चढविण्याची तयारी करीत आहे, असे इस्रायली संरक्षणदलाचे ब्रिगेडियर जनरल रोनेन मॅनेलिस यांनी म्हटले आहे. तर सोमवारी हिजबुल्लाहचा उपप्रमुख नईम कासिम यानेही लवकरच इराण इस्रायलला धडा शिकविणार असल्याचा दावा केला होता.

English  हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/986699773775433730
https://www.facebook.com/WW3Info/posts/384376795304144