डॉलरला हद्दपार करण्यावर एकमत झाल्याने युरोपिय देश इराणबरोबर युरोमध्ये इंधनव्यवहार करणार; अमेरिकेकडून जहाल प्रतिक्रिया अपेक्षित

डॉलरला हद्दपार करण्यावर एकमत झाल्याने युरोपिय देश इराणबरोबर युरोमध्ये इंधनव्यवहार करणार; अमेरिकेकडून जहाल प्रतिक्रिया अपेक्षित

ब्रुसेल्स – अमेरिकेने इराणवर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांना प्रत्युत्तर देण्याची तयारी युरोपिय देशांनी केली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांची पर्वा न करता युरोपिय देश इराणबरोबरचा इंधन व्यवहार कायम ठेवणार असून या व्यवहारातून अमेरिकेच्या डॉलरला हद्दपार करून युरोमध्ये हा व्यवहार करण्याचा निर्णय झाला आहे. काही वृत्तसंस्थांनी सूत्रांचा हवाला देऊन याबाबतची माहिती उघड केली. युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख फे्रडरिका मोघेरिनी यांनी केलेले विधान सूत्रांनी केलेल्या दाव्याला दुजोरा देत आहे. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांवर व्यवहार्य तोडगा काढण्यावर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, युरोपिय महासंघ आणि इराणमध्ये एकमत झाल्याचे मोघेरिनी यांनी म्हटले आहे.

डॉलरइराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर कडक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांचा इराणबरोबर व्यापार करणार्‍या कंपन्या आणि देशांनाही फटका बसणार आहे. यामुळे इराणमध्ये गुंतवणूक व व्यापारी करार करणार्‍या ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व युरोपिय महासंघाचे जबर नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अणुकरारातून बाहेर पडू नये, यासाठी या देशांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. तरीही अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयावर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व युरोपिय महासंघ तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

युरोपिय महासंघाच्या कौन्सिलचे अध्यक्ष जंकर यांनी अमेरिकेची जागा युरोपिय महासंघाने घ्यावी, असे आवाहन केले आहे. तर मंगळवारी ब्रुसेल्स येथे पार पडलेल्या बैठकीनंतर, युरोपिय महासंघ, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व इराणमध्ये अमेरिकेच्या निर्बंधातून मार्ग काढण्यासाठी व्यवहार्य उपाययोजना हाती घेण्यावर एकमत झाल्याचा दावा युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख फे्रडरिका मोघेरिनी यांनी केला. या उपाययोजना कोणत्या याबद्दलचे तपशील मोघेरिनी यांनी जाहीर केलेले नाहीत. पण या प्रश्‍नावर अमेरिकेबरोबर संबंध तोडण्याच्या भ्रमातही युरोपिय महासंघ नाही, असे मोघेरिनी यांनी स्पष्ट केले.

मोघेरिनी याबाबत सावध भूमिका घेत असल्या तरी जंकर यांनी आधी केलेली विधाने व ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणबरोबरील अणुकराराच्या बाजूने घेतलेली भूमिका निराळेच संकेत देत आहे. इराणबरोबरच्या इंधन व्यवहारातून डॉलरला वगळून हा व्यवहार युरोमध्ये करण्याचा निर्णय झाल्याची माहिती काही अग्रगण्य वृत्तसंस्थांनी दिली. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या बातमीमुळे नजिकच्या काळात फार मोठी उलथापालथ होऊ शकते. रशिया व चीन या देशांनी आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या डॉलरच्या मक्तेदारीला आव्हान देणारे निर्णय घेतले होते. त्यानंतर महासंघाने इराणबरोबरील व्यापारासाठी युरोचा वापर केला तर त्याचे फार मोठे पडसाद उमटू शकतात.

इंधनाच्या खरेदी-विक्रीसाठी अमेरिकेच्या डॉलरचाच वापर सुरू झाल्यानंतर डॉलर आंतरराष्ट्रीय चलन बनले. पेट्रो-डॉलर ही अमेरिकेच्या चलनाची नवी ओळख बनली. यामुळे अमेरिका जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राखून आहे. या व्यवस्थेला आव्हान देऊ पाहणार्‍या देश आणि नेत्याला अमेरिकेने संपविल्याचा दावा विश्‍लेषकांकडून केला जातो. इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसेन यांनी आपल्या देशाच्या इंधनाची डॉलरऐवजी युरोमध्ये विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेने हल्ला चढवून त्यांची राजवट उलथली होती, याचा दाखला विश्‍लेषक देत आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर, डॉलरला थेट आव्हान देऊन आंतरराष्ट्रीय चलन म्हणून डॉलरचे स्थान डळमळीत करण्याचा युरोपिय देशांचा प्रयत्न अमेरिका खपवून घेण्याची अजिबात शक्यता नाही. या प्रश्‍नावर युरोपिय देशांबरोबरचे अमेरिकेचे संबंध तुटेपर्यंत ताणले जाऊ शकतात. त्याचवेळी या व्यवहाराला उत्तेजन देणार्‍या इराणवर अमेरिका पुढच्या काळात अधिकच कठोर कारवाई करील, असे संकेत मिळू लागले आहेत.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/997054929217957888
https://www.facebook.com/WW3Info/posts/394675420940948