उत्तर कोरियन हुकूमशहांनी अण्वस्त्रबंदी मान्य करावी अन्यथा गद्दाफीप्रमाणे विनाशासाठी तयार रहावे – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावले

उत्तर कोरियन हुकूमशहांनी अण्वस्त्रबंदी मान्य करावी अन्यथा गद्दाफीप्रमाणे विनाशासाठी तयार रहावे – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावले

वॉशिंग्टन – ‘‘अमेरिकेची मागणी मान्य करून उत्तर कोरियाने अण्वस्त्रबंदी करावी. असे झाले तर एक देश म्हणून उत्तर कोरिया आणि कोरियन हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ देखील सुखी राहतील. अन्यथा उत्तर कोरियन हुकूमशहा किम जाँग-उन यांचे भविष्य लिबियाचे हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्यापेक्षा वेगळे असू शकत नाही. गद्दाफीप्रमाणे उत्तर कोरियन हुकूमशहांचा देखील दुर्दैवी अंत होईल’’, असा सज्जड इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या या अमेरिकाविरोधी भूमिकेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘शी जिनपिंग’ जबाबदार असल्याचा ठपका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला.

अण्वस्त्रबंदीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ यांच्यात १२ जून रोजी सिंगापूर येथे ऐतिहासिक बैठक होणार होती. या आठवड्याच्या सुरुवातीला व्हाईट हाऊसने यासंदर्भात घोषणा केली होती. दक्षिण कोरिया, जपान या देशांनीही सदर बैठकीचे स्वागत केले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियन हुकूमशहांमध्ये होणारी ही बैठक पूर्व आशियातील शांती व स्थैर्यासाठी सहाय्यक ठरेल, असे बोलले जात होते. तसेच ही बैठक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाला मिळालेले फार मोठ यश ठरेल, असे दावे केले जात होते.

पण दोन दिवसांपूर्वी उत्तर कोरियन राजवटीने या बैठकीवर प्रश्‍न उपस्थित केले. उत्तर कोरिया एकतर्फी अण्वस्त्रबंदी मान्य करणार नाही, असे उत्तर कोरियन राजवटीने बजावले. ‘उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रबंदीच्या मोबदल्यात अमेरिकेने आर्थिक सहाय्य देण्याचे मान्य केले. पण उत्तर कोरिया या अर्थसहाय्यासाठी अण्वस्त्रबंदी करणार नाही’, असे उत्तर कोरियाने ठणकावले होते. तसेच येत्या काही दिवसात अमेरिका आणि दक्षिण कोरियात होणार्‍या युद्धसरावावर उत्तर कोरियाने आक्षेप घेतला होता.

उत्तर कोरियाच्या या निर्णयावर गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेतून पडसाद उमटत आहेत. ‘पुढच्या महिन्यात होणार्‍या बैठकीतून माघार घेतल्याचे उत्तर कोरियाने अद्याप म्हटलेले नाही. त्यामुळे अमेरिका अजूनही या बैठकीबाबत आशावादी आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रबंदीच्या मागणीवरही अमेरिका ठाम आहे’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केली.

तर उत्तर कोरियाबरोबर होणार्‍या बैठकीविषयी अमेरिका एकाचवेळी आशावादी आणि वास्तववादी देखील असल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी उत्तर कोरियाला इशारा दिला होता. तसेच पुढच्या महिन्यात उत्तर कोरियाशी वाटाघाटी करताना ‘लिबिया मॉडेल’चा नमूना तयार असल्याचे सूचक उद्गार बोल्टन यांनी काढले. या लिबिया मॉडेलबाबत बोल्टन यांनी खुलासा करण्याचे टाळले होते. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी याचा स्पष्टपणे उल्लेख करून उत्तर कोरियाला धमकावले.

‘२०११ साली लिबियातील गद्दाफी राजवटीला पराभूत करण्यासाठी विशेष योजना आखली होती. याानंतर गद्दाफी यांची राजवट नामशेष झाली होती. आत्ताही उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रबंदी मान्य करून घेण्यासाठी अमेरिका प्रयत्न करील. उत्तर कोरियातील किम जाँग-उन यांच्या राजवटीने अण्वस्त्रबंदी केली तर भविष्यात किमच उत्तर कोरियाचे नेतृत्व करतील, त्यांना संरक्षण कवच मिळेल आणि उत्तर कोरिया श्रीमंत होईल. पण जर उत्तर कोरियाने अण्वस्त्रबंदी करण्यास नकार दिला तर तर किम यांनाही गद्दाफीसारख्या भविष्याचा सामना करावा लागेल’, अशी धमकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली.

त्याचबरोबर गेल्या आठवड्यात उत्तर कोरियन राष्ट्रप्रमुखांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर उत्तर कोरियाच्या भूमिकेत बदल झाला, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले. उत्तर कोरियाबाबतच्या चीनच्या हालचालींवर अमेरिकेची करडी नजर असल्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला. याआधीही ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या बेताल कारवायांसाठी चीनला जबाबदार धरले होते.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/997866155711741952
https://www.facebook.com/WW3Info/posts/395798654161958