ख्रिस्तीधर्म व इस्लाममध्ये युद्ध पेट घेईल

ख्रिस्तीधर्म व इस्लाममध्ये युद्ध पेट घेईल

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचा इशारा

इस्तंबूल – ‘‘ख्रिस्तधर्मियांचा ‘क्रॉस’ आणि इस्लामधर्मियांची ‘चंद्रकोर’ यांच्यात युद्ध पेट घेईल’’, असा इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दिला आहे. आपल्या देशातील सात प्रार्थनास्थळे बंद करून ४० धर्मगुरुंची हकालपट्टी करण्याचा निर्णय ऑस्ट्रियाने घेतला होता. त्यावर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी ही जहाल प्रतिक्रिया नोंदविली आहे. ऑस्ट्रियाचा हा निर्णय जगाला ख्रिश्‍चन व इस्लाम या धर्मांमधील युद्धाच्या दिशेने पुढे नेणारा असल्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी बजावले आहे.ख्रिस्तीधर्म व इस्लाम

इस्तंबूल येथे एका सभेत बोलताना तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी ऑस्ट्रियाने घेतलेल्या या निर्णयाची निर्भत्सना केली. हा निर्णय विद्वेषी, इस्लामविरोधी आणि भेदभावपूर्ण असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ठेवला. तसेच ऑस्ट्रिया इस्लामधर्मियांना आपल्या देशातून बाहेर काढत असताना, आम्ही स्वस्थ बसू शकत नाही, असे एर्दोगन यांनी बजावले आहे. ऑस्ट्रियाच्या या कारवाईला तुर्कीकडून नक्कीच प्रत्युत्तर मिळेल, असा दावा एर्दोगन यांनी इस्तंबूलमधील या सभेत दिला.

ऑस्ट्रियाने घेतलेल्या या निर्णयामुळे ख्रिस्तधर्म व इस्लाममध्ये युद्ध पेट घेईल. हा निर्णय याच दिशेने जगाला पुढे नेत आहे, असे एर्दोगन यांनी बजावले. याला तुर्की नक्कीच प्रत्युत्तर देईल पण त्याचे तपशील जाहीर करता येणार नाही, असे सूचक उद्गार एर्दोगन यांनी काढले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर सेबॅस्टियन कर्झ यांनी देशातील इस्लामधर्मियांच्या सात प्रार्थनास्थळांवर बंदीचा तसेच ४० धर्मगुरुंची हकालपट्टीचा निर्णय घोषित केला होता. ऑस्ट्रियाच्या सामाजिक व्यवस्थेला आव्हान देणारी पर्यायी व्यवस्था आणि इस्लामधर्माचा राजकीय वापर तसेच कट्टरपंथीयांना विरोध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे चॅन्सेलर कर्झ म्हणाले होते.

ख्रिस्तीधर्म व इस्लामऑस्ट्रियातून हकालपट्टी करण्यात आलेले हे ४० धर्मगुरू तुर्कीच्या ‘तुर्कीश-इस्लामिक कल्चर असोसिएशन्स’चे सदस्य असल्याचे सांगितले जाते. यामुळे तुर्कीकडून यावर आक्रमक प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रिया आणि तुर्कीमध्ये निर्माण झालेल्या या वादाला आणखी एक बाजू असल्याचे उघड होत आहे. ऑस्ट्रियामध्ये साडेतीन लाखाहून अधिक तुर्कवंशिय असून यापैकी एक लाख १७ हजार तुर्कीचे नागरिक आहेत. त्यांच्यासाठी आपण ऑस्ट्रियाशी लढा देऊ, असे संकेत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन देत आहेत.

याआधीही तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी अशा स्वरुपाची जहाल विधाने करून धर्मयुद्धाचे इशारे दिले होते. यामध्ये युरोपिय देशांमध्ये लाखोंच्या संख्येने निर्वासित घुसविण्याच्या धमकीचा समावेश होता. तसेच जगभरातील सर्वच इस्लामधर्मिय देशांनी इस्रायलच्या विरोधात आपले लष्कर तैनात करावे, असे आवाहन एर्दोगन यांनी केले होते.

इस्लामधर्मिय देशांकडे असलेल्या लष्कराच्या एकूण संख्याबळाची व संरक्षणसाहित्यांची माहिती देऊन, इस्रायलचे लष्करी बळ यापुढे खूपच तोकडे पडेल, असे तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी सुचविले होते. यानंतर दोन धर्मांमधील युद्धाचा इशारा देऊन तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा खळबळ माजविल्याचे दिसते आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info