अमेरिकेच्या अर्कान्सस प्रांतातील शासकीय इमारतीबाहेर बफोमेटचा पुतळा

अमेरिकेच्या अर्कान्सस प्रांतातील शासकीय इमारतीबाहेर बफोमेटचा पुतळा

लिटिल रॉक – अमेरिकेच्या अर्कान्सस प्रांताच्या शासकीय इमारतीच्या बाहेर ‘बफोमेट’च्या पुतळ्याचे अनावरण करून त्याच्या उपासकांनी खळबळ माजविली आहे. या शासकीय इमारतीच्या बाहेर ‘टेन कमांडमेंटस्’चा स्तंभ उभारण्यात आला असून इथेच ‘बफोमेट’च्या पुतळ्यालाही स्थान मिळावे, अशी त्याची उपासना करणार्‍यांची मागणी आहे. हा मुद्दा आपल्या उपासना स्वातंत्र्याशी जोडून बफोमेटचे उपासक आक्रमकपणे ही मागणी पुढे रेटत आहेत. तर त्यांना विरोध करणार्‍यांची निदर्शने सुरू झाली असून या निदर्शकांनी बफोमेटचा पुतळा इथून हटविण्याचा इशारा दिला होता. आधी ओक्लाहोमा राज्यातही बफोमेटच्या पुतळ्याबाबत असाच प्रकार घडला होता.

अर्कान्सास प्रांताच्या शासकीय इमारतीच्या बाहेर ‘टेन कमांडमेंटस्’चा स्तंभ उभारण्यात आला आहे. ज्यूधर्मिय व ख्रिस्तधर्मियांसाठी परमेश्‍वराचा आदेश असलेल्या या ‘टेन कमांडमेंटस्’चा हा स्तंभ या सरकारी इमारतीपासून हटविण्याची मागणी ‘सॅटॅनिक टेंपल’ अर्थात सैतानाच्या उपासकांकडून केली जात होती. सरकारी यंत्रणा धर्मनिरपेक्ष असावी व त्याचा कुठल्याही धर्माशी संबंध असता कामा नये, असे सांगून सॅटॅनिक टेंपलचे अनुयायी सातत्याने ही मागणी करीत होते. त्याला प्रतिसाद मिळत नाही, हे पाहून या अनुयायांनी आपले सैतानी दैवत असलेल्या ‘बफोमेट’चा पुतळा या ठिकाणी आणला.

गेल्या वर्षी सिनेटर जेसन रॅपर्ट यांनी ‘टेन कमांडमेंटस्’चा स्तंभ अर्कान्ससच्या शासकीय इमारतीबाहेर उभारले होते. पण याला 24 तास उलटण्याच्या आत ‘सॅटॅनिक टेंपल’च्या अनुयायाने आपली मोटार या ठिकाणी धडकावून हे स्तंभ पाडला होता. याच इसमाने गेल्या वर्षी ओक्लाहोमा राज्याच्या शासकीय इमारीबाहेरील ‘टेन कमांडमेंटस्’चा स्तंभ मोटारीने उडविला होता. अमेरिकेत कुठेही सरकारी इमारतीच्या बाहेर अशारितीने ‘टेन कमांडमेंटस्’ किंवा धार्मिक प्रतिकांना स्थान मिळता कामा नये, अशी ‘सॅटॅनिक टेंपल’च्या अनुयायांची आक्रमक मागणी आहे.

मात्र ही मागणी मान्य होत नाही, म्हणून त्यांनी आपले सैतानी दैवत ‘बफोमेट’चा साडेआठ फुटाचा पुतळा अर्कान्सासच्या शासकीय इमारतीबाहेर ठेवला आहे. जर या ठिकाणी ‘टेन कमांडमेंटस्’चा स्तंभ राहणार असेल, तर इथे बफोमेटचा पुतळाही ठेवावाच लागेल, असे त्याच्या उपासकांनी बजावले आहे. दरम्यान, या ठिकाणी बफोमेटच्या पुतळ्याचे अनावरण करताना, सैतानाच्या उपासकांबरोबरच नास्तिक देखील उपस्थित होते. त्याचवेळी बफोमेटच्या पुतळ्याला विरोध करण्यासाठी सिनेटर रॅपर्ट यांचे समर्थक देखील उपस्थित होते. त्यांनी निदर्शने करून बफोमेटच्या पुतळ्याला जोरदार विरोध केला.

अमेरिकेत ‘सॅटॅनिक टेंपल’चे अनुयायी उघडपणे बफोमेटच्या उपासनेचे समर्थन करीत असून यातील काहीजणांनी तर बफोमेट हा ‘टेन कमांडमेंटस्’पेक्षा अधिक प्रमाणात अमेरिकन असल्याचा दावाही केला आहे. यासाठी त्यांनी नियतकालिकांमध्ये लेखही प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या या मोहिमेला अमेरिकेत कडवा विरोध होत असून त्याविरोधात निदर्शनेही केली जात आहेत. मात्र हा मुद्दा आपल्या अभिव्यक्ती व उपासनेच्या स्वातंत्र्याशी जोडून आम्हाला बफोमेटच्याही उपासनेचे स्वातंत्र्य असल्याचे दावे ‘सॅटॅनिक टेंपल’च्या उपासकांकडून केले जात आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info