अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी – रशियाचा युरोपबरोबरील व्यापार ‘युरो’मध्ये करण्याचा प्रस्ताव

अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी – रशियाचा युरोपबरोबरील व्यापार ‘युरो’मध्ये करण्याचा प्रस्ताव

मॉस्को/ब्रुसेल्स – अमेरिकेने युरोप व रशियावर टाकलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने युरोपिय देशांबरोबरील व्यापार ‘युरो’ चलनात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रशियाचे अर्थमंत्री तसेच उपमंत्र्यांनी यासंदर्भात वक्तव्य केले असून हा रशियाकडून अमेरिकी डॉलरचे वर्चस्व कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी रशियाने इंधनाचा सर्वात मोठा आयातदार असणार्‍या चीनबरोबरील इंधन व्यापार ‘युआन’ चलनात करण्याचा निर्णय घेतला होता.

रशियाने गेल्या काही वर्षात अर्थव्यवस्थेतून अमेरिकी डॉलरचा प्रभाव कमी करण्यासाठी आक्रमक व योजनाबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रशियाने सोन्याच्या राखीव साठ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ केली असून राखीव गंगाजळीतील सोन्याचा हिस्सा विक्रमी स्तरावर नेला आहे. त्याचवेळी अमेरिकी कर्जरोख्यांमधील गुंतवणूकही विकण्यास सुरुवात केली असून गेल्या सहा महिन्यात रशियाने 80 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जरोखे विकल्याचे समोर आले आहे.

सोन्यातील गुंतवणूक व अमेरिकेच्या कर्जरोख्यांची विक्री याबरोबरच रशियाने, चीनसह जगातील आघाडीच्या देशांबरोबर स्थानिक चलनांमध्ये व्यापार करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे चीनच्या युआन तसेच ‘युरो’ चलनातील गुंतवणूक वाढविली आहे. गुंतवणूक वाढवितानाच त्या चलनांमधील व्यवहार वाढविण्याचेही उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून त्यासाठीच ‘युरो’च्या वापराचा प्रस्ताव समोर आल्याचे दिसते.

रशियाचे अर्थमंत्री अँतोन सिल्युआनोव यांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या एका मुलाखतीत युरोपिय देशांबरोबरील व्यवहारात ‘युरो’चा वापर सुरू करण्याचे संकेत दिले होते. इंधन व्यापारात अमेरिकी डॉलरव्यतिरिक्त चलनाचा वापर करणे हे रशियासह युरोपिय देशांच्याही हिताचे आहे, असे सिल्युआनोव यांनी म्हटले आहे. यापूर्वी युरोपिय महासंघाकडून सुरू होणार्‍या पर्यायी ‘पेमेंट सिस्टिम’मध्ये सहभागी होण्याची तयारीही रशियाने दर्शविली होती. त्यामुळे ‘युरो’चे व्यवहार करणे दोन्ही देशांसाठी सहज होईल, असे मानले जाते.

रशियन अर्थमंत्र्यांपाठोपाठ उपमंत्री व्लादिमिर कोलिचेव यांनीही ‘युरो’चा वापर रशिया व युरोपिय भागीदार देशांसाठी फायद्याचा ठरेल, असे संकेत दिले आहेत. ‘छोट्या कालावधीसाठी तसेच मध्यम मुदतीसाठी युरोपिय देशांबरोबर स्थानिक चलनात व्यवहार सुरू करण्याची उत्तम संधी आहे. रशिया इंधनाचे व्यवहार युरो चलनात करु शकतो. यामुळे युरोचे राखीव चलन म्हणून असलेले स्थान मजबूत होण्यास मदत होईल’, असे कोलिचेव यांनी सांगितले.

अमेरिकेने रशियन कंपन्या व बँकांवर निर्बंध टाकल्यास युरोपिय देशांना व्यवहार करण्यात अडचणी येणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. सध्या ज्या कंपन्या निर्बंधांमुळे आर्थिक अडचणीत आल्या आहेत त्यांचीही त्यातून सुटका होऊ शकते, असेही रशियन उपमंत्र्यांनी पुढे नमूद केले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही रशियन अर्थव्यवस्थेतून अमेरिकी डॉलर संपविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची उघड कबुली दिली होती. अमेरिकेकडून सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम टाळण्यासाठी अशा स्वरुपाची पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info