हमासबरोबर संघर्षबंदी करण्याच्या निर्णयाविरोधात इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा राजीनामा

हमासबरोबर संघर्षबंदी करण्याच्या निर्णयाविरोधात इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा राजीनामा

जेरूसलेम – हमासने इस्रायलवर चढविलेले ४०० हून अधिक रॉकेटहल्ले आणि इस्रायलच्या हमासवरील घणाघाती हवाई हल्ल्यानंतर, दोन दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबला आहे. इस्रायल-हमासमध्ये ही संघर्षबंदी झाली असली तरी त्यामुळे इस्रायलमध्ये अंतर्गत राजकीय संघर्ष पेटला आहे. इस्रायलने मान्य केलेली ही संघर्षबंदी म्हणजे दहशतवाद्यांसमोर पत्करलेली शरणांगती ठरते, असे सांगून संरक्षणमंत्री एविग्दोर लिबरमन यांनी राजीनामा दिला आहे.

गाझापट्टीच्या सीमेजवळ सैन्य व रणगाड्यांची तैनाती वाढवून इस्रायलने हमासविरोधात संघर्ष पुकारणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे इस्रायल व हमासमध्ये मोठा संघर्ष भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण गाझापट्टीतून रॉकेट हल्ले सुरू असतानाही, मंगळवारी दुपारी इस्रायलच्या सुरक्षा समितीने हमासबरोबरच्या संघर्षबंदीची घोषणा करून मोठा धक्का दिला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. पण पुढच्या काही तासातच इस्रायलचे संरक्षणमंत्री लिबरमन तसेच सरकारमधील काही नेते या निर्णयाच्या विरोधात असल्याचे उघड झाले. तर इस्रायलची जनता देखील रस्त्यावर उतरून हमासबरोबरच्या या संघर्षबंदीच्या निर्णयाविरोधात निदर्शने करीत होती. काही ठिकाणी संतप्त इस्रायली जनतेने जाळपोळ करून नेत्यान्याहू यांच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला.

बुधवारी सकाळी लिबरमन यांनी आपल्या संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. ‘या संघर्षबंदीमुळे आपल्याला तात्पुरती शांतता मिळाली असेल. पण यामुळे इस्रायलची कायमस्वरूपी सुरक्षेला भेगा गेल्या आहेत. या संघर्षबंदीसाठी इस्रायलने दीर्घकालिन हिंसाचाराला आमंत्रित केले आहे’, असा इशारा लिबरमन यांनी दिला. त्याचबरोबर इस्रायलच्या सुरक्षेसाठी संसदेतने निवणूका जाहीर कराव्या, अशी मागणी लिबरमन यांनी केली.

इस्रायलचे शिक्षणमंत्री व ‘ज्यूईश होम पार्टी’चे प्रमुख नफाली बेनेट यांनी पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याकडे संरक्षणमंत्रीपदाची मागणी केली आहे. आपली मागणी मान्य केली नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा बेनेट यांनी दिला. बेनेट यांच्या पाठोपाठ कायदामंत्री आयलेट शाकेद आणि पर्यावरणमंत्री झिव्ह एल्किन यांनीही नेत्यान्याहू यांच्या संघर्षबंदीच्या निर्णयावर टीका केली होती.

दरम्यान, हमासने इस्रायलबरोबरील संघर्षबंदीचे स्वागत करून संरक्षणमंत्री लिबरमन यांचा राजीनामा हा आपला विजय ठरतो, असा दावा केला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info