केनियातील दहशतवादी हल्ला हा ट्रम्प यांच्या ‘जेरुसलेम’च्या निर्णयावर प्रतिक्रिया-‘अल शबाब’चा दावा

केनियातील दहशतवादी हल्ला हा ट्रम्प यांच्या ‘जेरुसलेम’च्या निर्णयावर प्रतिक्रिया-‘अल शबाब’चा दावा

नैरोबी – केनियाची राजधानी नैरोबीतील हॉटेलवर झालेला हल्ला हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेरुसलेमबाबत घेतलेल्या निर्णयाला दिलेले प्रत्युत्तर होते, असा दावा ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेने केला आहे. मंगळवारी ‘अल शबाब’ने नैरोबीतील ‘ड्युसिटडी२’ या हॉटेलवर चढविलेल्या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरांसह २१ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्याने ‘अल शबाब’ ही दहशतवादी संघटना आफ्रिकेतील आपली व्याप्ती वाढवित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी संध्याकाळी ‘अल शबाब’ने चढविलेल्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिका व ब्रिटनच्या नागरिकांसह २१ जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यात ‘अल शबाब’च्या पाच दहशतवादांचाही समावेश आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन स्फोट घडवून ‘अल शबाब’च्या दहशतवाद्यांनी हॉटेल ‘ड्युसिटडी२’मध्ये प्रवेश केला. त्यानंतर एका हल्लेखोराने आत्मघाती स्फोट घडविला व त्यापाठोपाठ इतर दहशतवाद्यांनी ‘एके-४७’च्या सहाय्याने गोळीबार सुरू केला.

अनेक तासांच्या चकमकीनंतर केनियन सुरक्षायंत्रणांनी हॉटेलमधील दहशतवाद्यांचा खात्मा करून पर्यटक तसेच कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर हॉटेलच्या परिसरातून शस्त्रसाठा तसेच काही बॉम्ब्स जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. या दहशतवादी हल्ल्यानंतर केनियन यंत्रणांनी राजधानी नैरोबीसह आजूबाजूच्या परिसरात आक्रमक मोहीम हाती घेतली असून गेल्या २४ तासात हल्ल्याशी संबंधित नऊ संशयितांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

अमेरिका, युरोपसह आफ्रिकी सुरक्षायंत्रणा व लष्कर गेली दशकभर ‘अल शबाब’विरोधात व्यापक मोहीम राबवित आहेत. मात्र ‘अल शबाब’च्या शेकडो दहशतवाद्यांना ठार केल्यानंतरही या संघटनेचे सामर्थ्य वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात वारंवार दिसून आले आहे. सोमालियातील लोकशाहीवादी सरकारच्या विरोधात संघर्ष करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या दहशतवादी संघटनेने केनियासह इतर आफ्रिकी देशांमध्येही मोठे दहशतवादी हल्ले चढविले आहेत.

सोमालियात अमेरिकेकडून ‘अल शबाब’विरोधात व्यापक कारवाई सुरू असून त्यासाठी केनियाकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या सहा वर्षात ‘अल शबाब’ने केनियावर सातत्याने दहशतवादी हल्ले चढविले असून मंगळवारी झालेला हल्ला तिसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे.

२०१३ साली ‘अल शबाब’ने केनियाच्या ‘वेस्टगेट मॉल’मध्ये चढविलेल्या हल्ल्यात सुमारे ७० जणांचा बळी गेला होता. त्यानंतर २०१५ साली केनियातील प्रसिद्ध ‘गॅरिसा युनिव्हर्सिटीत’ करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला होता. हा हल्ला केनियातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. या हल्ल्यानंतर ‘अल शबाब’विरोधात मोठी कारवाई होऊनही ही दहशतवादी संघटना अधिक आक्रमक व मोठे हल्ले घडविण्यात यशस्वी ठरत असल्याचे नैरोबीतील हॉटेलवर झालेल्या हल्ल्यातून दिसून येत आहे.

 English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info