तैवानचे ‘मिराज’ सहा मिनिटात चिनी विमानांचा वेध घेतील – तैवानच्या लष्कराचा इशारा

तैवानचे ‘मिराज’ सहा मिनिटात चिनी विमानांचा वेध घेतील – तैवानच्या लष्कराचा इशारा

तैपेई – ‘चीनच्या कुठल्याही आक्रमकतेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी तैवान सज्ज आहे. तैवानच्या वायुसेनेतील ‘मिराज २०००’ विमाने सहाव्या मिनिटाला चीनच्या घुसखोर विमानांचा वेध घेतील’, असे तैवानच्या लष्कराने बजावले. येत्या वर्षअखेरीपर्यंत चीनचे लष्कर तैवानचा ताबा घेतील, अशा धमक्या चीनकडून दिल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर, तैवानने देखील चीनविरोधात आपली तयारी असल्याचे ठणकावले आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या संरक्षणदलांना तैवानचा ताबा घेण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, तैवानच्या लष्कराकडूनही चीनला प्रत्युत्तर देण्याचे इशारे दिले जात आहेत.

दोन दिवसांपूर्वी तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या लढाऊ विमानांची सज्जतेची घोषणा केली. तैवानची ‘मिराज २०००’ लढाऊ विमाने सहा मिनिटात भरारी घेऊन चीनच्या घुसखोर विमानांचा वेध घेऊ शकतात, असा इशारा तैवानच्या लष्कराने दिला. तसेच तैवानची वायुसेना २४ तास हवाई कारवाईसाठी सज्ज असल्याचेही जाहीर केले. आपल्या लढाऊ विमानांची क्षमता दाखविण्यासाठी तैवानच्या लष्कराने ‘सिंचू हवाईतळा’वर आंतरराष्ट्रीय माध्यमांना आमंत्रित केले होते. यावेळी तैवानच्या वायुसेनेच्या ताफ्यातील ‘मिराज’ विमानांनी आपल्या हवाई कवायतींचे कौशल्य दाखविले.

तैवानकडे फ्रान्सच्या बनावटीची ‘मिराज’ तसेच अमेरिकन बनावटीची ‘एफ-१६’ लढाऊ विमाने आहेत. आपल्या वायुसेनेची क्षमता वाढविण्यासाठी तैवानने अमेरिकेबरोबर ‘एफ-३५’ लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत चर्चाही केली आहे. पण चीनच्या विरोधामुळे हे सहकार्य रखडले असून तैवानने ‘एफ-१६’ विमानांचे अत्याधुनिकीकरण हाती घेतले आहे.

तैवानची वायुसेना लढाऊ विमानांची क्षमता आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर उघड करीत असताना तैवानच्या लष्करानेही जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. स्वदेशी बनावटीचे ‘स्काय बो ३’ क्षेपणास्त्र विमानभेदी असल्याचा दावा केला जातो. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ या क्षेपणास्त्राची चाचणी पाहण्यासाठी उपस्थित होत्या.

दरम्यान, तैवान हा आपलाच सार्वभौम भूभाग असल्याचा दावा करून चीनने लष्करी सामर्थ्याच्या जोरावर तैवानचा ताबा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. चीनच्या नेतृत्वाने आपल्या लष्कराला तसे आदेश दिले असून तैवानला सहकार्य करणार्‍या अमेरिकेलाही धमकावले आहे. तसेच तैवानने या वर्षअखेरीपर्यंत ‘वन चायना पॉलिसी’ मान्य केली नाही तर तैवानला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी चीनने दिली होती. पण चीनच्या या धमकीला तैवानने फारशी किंमत न देता चीनविरोधी लष्करी हालचाली सुरू ठेवल्या आहेत.

चिनी लढाऊ विमानांच्या तैवानजवळून घिरट्या

चीनच्या ‘सुखोई-३०’ लढाऊ विमान आणि शांक्सी ‘व्हाय-८’ या टेहळणी विमानानी तैवानच्या हवाईहद्दीजवळून घिरट्या घातल्या आहेत. तैवान आणि फिलिपाईन्समधील हवाईहद्दीतून चीनच्या विमानांनी घिरट्या घालून आपल्या सार्वभौमत्वाला चिथावणी दिल्याचा आरोप तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला. चीनच्या या विमानांना पिटाळून लावण्यासाठी तैवानने आपली लढाऊ विमाने रवाना केली.  चीनच्या आक्रमकतेला तैवानने देखील तसेच प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी तैवानच्या हवाईहद्दीजवळून चीनच्या लढाऊ आणि टेहळणी विमानांनी गस्त घातली होती.  

चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ची लढाऊ विमाने किमान दोन तास तैवानच्या हवाईहद्दीजवळ घिरट्या घालत होती. चीनच्या या प्रक्षोभक कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानने आपली लढाऊ विमाने रवाना केली होती.

English हिंदी 

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info