भारतावरील हल्ल्यांसाठी पाकिस्तानने ‘जैश’चा वापर केला – माजी हुकूमशहा मुशर्रफ यांची निर्लज्ज कबुली

भारतावरील हल्ल्यांसाठी पाकिस्तानने ‘जैश’चा वापर केला – माजी हुकूमशहा मुशर्रफ यांची निर्लज्ज कबुली

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने भारतात घातपात घडविण्यासाठी ‘जैश-ए-मोहम्मद’चा वापर केला होता, अशी निर्लज्ज कबुली माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी दिली. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांचा हा कबुलीजबाब आला आहे. यामुळे पाकिस्तानात ‘जैश’चे अस्तित्वच नाही, असा दावा करणारे पाकिस्तानचे लष्कर पुन्हा एकदा तोंडघशी पडले. यामुळे सध्या आपली कातडी वाचविण्यासाठी दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानकडून सुरू असलेली कारवाई म्हणजे निव्वळ देखावा असल्याचेही मुशर्रफ यांच्या या विधानातून स्पष्ट होत आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने अनेकवार आपली भाषा बदलली आहे. या हल्ल्याचे पुरावे दिले तर दहशतवादी संघटनांवर कारवाई करू, अशी ग्वाही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली. भारताने हे पुरावे सादर केल्यानंतर पाकिस्तानने भारताला शांत करण्यासाठी व आपल्यावरील आंतरराष्ट्रीय दडपण कमी करण्यासाठी दहशतवाद्यांवरील कारवाईचा देखावा सुरू केला. यानुसार जवळपास १२२ जणांना दहशतवाद्यांना व संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून यात ‘जैश’प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या जवळच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. तसेच कट्टरपंथीयांच्या काही मदरशांवरही कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानकडून सांगितले जाते.

मात्र ही कारवाई सुरू असताना ‘जैश’सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या संघटनेचा प्रमुख असलेल्या अझहरला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची धमक पाकिस्तानच्या यंत्रणांमध्ये नाही. उलट त्याला सुरक्षितता बहाल करून पाकिस्तानने त्याचे भारताच्या संभाव्य कारवाईपासून रक्षण करण्याची तयारी केली आहे.

पाकिस्तान असे का करीत आहे, हे या देशाचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या वक्तव्यांवरून उघड होत आहे. मुशर्रफ यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन ‘जैश’ तसेच इतर दहशतवादी संघटनांचा भारतात घातपात घडविण्यासाठी ‘आयएसआय’ने वापर केला, अशी निर्लज्जपणे कबुली दिली. ही कबुली देऊनही ‘जैश’ ही दहशतवादी संघटनाच असल्याचा दावाही मुशर्रफ यांनी केला. तसेच ‘जैश’ने आपल्यावर जीवघेणा हल्ला चढविला होता, याचीही आठवण करून देऊन सध्या पाकिस्तानात ‘जैश’च्या विरोधात सुरू असलेली कारवाई योग्यच ठरते, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर या कारवाईवर मुशर्रफ यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्या कारकिर्दीत ही कारवाई करता आली नाही, कारण तो काळ वेगळा होता, असा बचाव मुशर्रफ यांनी केला. मात्र मुशर्रफ यांनी उघड केलेल्या या माहितीमुळे सध्या पाकिस्तान करीत असलेल्या कारवार्ईवरही प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

‘जैश’प्रमुख अझहर याची ध्वनीफीत नुकतीच प्रसिद्ध झाली होती. यात त्याने भारताच्या दडपणाखाली येऊन पाकिस्तानचे सरकार दहशतवादी संघटनांवर करीत असलेल्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर पाकिस्तानातील धर्मबांधव भडकल्यास उद्रेक होईल, अशी धमकीही त्याने पाकिस्तानला दिली आहे. राष्ट्राध्यक्ष असताना मुशर्रफ यांच्यावर हल्ले चढवूनही आपल्यावरील कारवाई टाळणार्‍या ‘जैश’च्या पाकिस्तानातील सामर्थ्यावर यामुळे प्रकाश पडला आहेच. त्यामुळे सध्याची ‘जैश’वरची कारवाई केवळ टीका बंद करण्यासाठीच असून याला काडीचाही अर्थ नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आपल्या देशात ‘जैश’चे अस्तित्त्वच नाही, म्हणून नकारघंटा वाजविणार्‍या पाकिस्तानी लष्कराकडून यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया अपेक्षित नाही. त्याचवेळी या लष्कराच्या तालावर नाचणारे बाहुले अशी ख्याती मिळविणार्‍या पंतप्रधान इम्रान खान यांच्या आश्‍वासनावरही भारताला विसंबून राहता येणार नाही, हे मुशर्रफ यांनी दिलेल्या कबुलीजबाबावरून स्पष्ट होत आहे.

‘जैश’ दुसर्‍या ‘पुलवामा’च्या तयारीत

‘जैश-ए-मोहम्मद’ दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट आखत असल्याचा इशारा भारताच्या गुप्तचर विभागाने दिला. ‘जैश’चा हा हल्ला ‘पुलवामा’सारखा मोठा असू शकतो, असेही गुप्तचर विभागाने बजावले आहे. येत्या तीन ते चार दिवसात अशा दहशतवादी हल्ल्याची शक्यता असून दक्षिण काश्मीरमधल्या काझीगंद आणि अनंतनाग येथे चोरीची ‘एसयुव्ही’ वापरून हा हल्ला घडविण्याची तयारी ‘जैश’ने केली आहे. गुरुवारी जम्मूमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यानंतर गुप्तचर विभागाने ‘जैश’च्या भयंकर कटाबाबतची ही माहिती प्रसिद्ध केली असून यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा अधिकच वाढविण्यात आली आहे.

English   हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info