इराणबरोबर युद्धाची शक्यता नाकारता येणार नाही – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

इराणबरोबर युद्धाची शक्यता  नाकारता येणार नाही – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

लंडन – ‘इराणशी चर्चा करूनच अमेरिकेला सार्‍या वादावर तोडगा काढायचा आहे. पण इराण हा सर्वात मोठा दहशतवादी देश असून अमेरिकेने इराणबरोबर युद्धाची शक्यता नाकारता येणार नाही’, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वास्तवाची जाणीव करून दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, इराणला सज्जड इशारे देत आहेत. त्याचवेळी या सर्वांनी अमेरिका इराणच्या विरोधात युद्ध सुरू करणार नाही, असेही संकेत दिले आहेत.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर वाटाघाटी करण्यासाठी अमेरिका तयार असल्याचे म्हटले होते. इराणला चर्चा करायची असेल तर अमेरिका चर्चेसाठीही तयार असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणकडून सकारात्मक प्रतिक्रियेची अपेक्षा व्यक्त केली होती. पण इराणच्या नेत्यांनी अमेरिकेचा वाटाघाटीचा प्रस्ताव फेटाळला. त्याचबरोबर काहीही झाले तरी इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात बदल होणार नसल्याचे जाहीर केले. तसेच आपल्या छुप्या क्षेपणास्त्रांचा साठा व्हिडिओद्वारे उघड करून इराणने अमेरिकेला चिथावणी दिली.

याबाबत ब्रिटनमधील वृत्तवाहिनीने विचारले असता, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा इराणबरोबर चर्चा करण्यासाठी अमेरिका तयार असल्याचे स्पष्ट केले. पण इराण हा प्रमुख दहशतवादी देश आहे, याचा विसर अमेरिकेला पडलेला नाही, असे ट्रम्प यांनी फटकारले. त्यामुळे इराणबरोबर युद्ध पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची आठवण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करून दिली. इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट असून यासाठी अमेरिका सर्व पर्यायांचा वापर करील, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी ठणकावले.

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अमेरिकेचा दबाव धुडकावून अणुकार्यक्रम सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिका व इराणमधील तणाव यापुढे अधिकच तीव्र होणार असल्याचे दिसत आहे.

अमेरिका आणि इराणबाबत वाढत असलेल्या या तणावावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. उभय देशांमधील तणाव कायम राहिला तर येत्या काळात त्याचे भीषण परिणाम समोर येतील, अशी भीती चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली. त्यामुळे दोन्ही देशांनी संयमी भूमिका स्वीकारावी, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी केले आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसात अमेरिका, रशिया व इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये विशेष बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अमेरिका रशियासमोर इराणचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे अमेरिकेच्या अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.

इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यावर अमेरिका-ब्रिटनचे एकमत

दहशतवादसमर्थक इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यावर अमेरिका आणि ब्रिटनच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये एकमत झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी एका संयुक्त पत्रकार बैठकीत ही माहिती जाहीर केली.

ब्रिटनच्या दौर्‍यावर असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान मे यांची भेट घेतली. या भेटीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली असून इराणबाबत उभय देशांचे नेत्यांमध्ये एकमत झाले. २०१५ साली पाश्‍चिमात्य देशांनी इराणबरोबर केलेल्या अणुकरारावर ब्रिटन आजही ठाम असल्याचे पंतप्रधान मे यांनी यावेळी सांगितले. पण करारात ठरल्याप्रमाणे इराण सर्व नियमांचे पालन न करता इराण अण्वस्त्रसज्जतेकडे पावले टाकत असेल तर ब्रिटन तसे होऊ देणार नाही, असे ब्रिटनच्या पंतप्रधान यावेळी म्हणाल्या.

त्याचबरोबर दहशतवाद समर्थक इराणला रोखण्यासाठी ब्रिटन अमेरिकेसोबत असेल, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान मे यांनी दिली.

 
English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info