लिबियन बंडखोरांचे शरणार्थी शिबिरांवरील हल्ले युद्धगुन्हा ठरतो – संयुक्त राष्ट्रसंघाची टीका

लिबियन बंडखोरांचे शरणार्थी शिबिरांवरील हल्ले युद्धगुन्हा ठरतो – संयुक्त राष्ट्रसंघाची टीका

न्यूयॉर्क/त्रिपोली – ‘जनरल खलिफा हफ्तार’ यांच्या आदेशानंतर लिबियन बंडखोरांनी त्रिपोलीजवळ चढविलेल्या हवाई हल्ल्यात एका शरणार्थी शिबिराला लक्ष्य केले असून यामध्ये ८० जणांचा बळी गेला. लिबियन बंडखोरांच्या या कारवाईवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शरणार्थी शिबिरांवर हल्ले चढवून बंडखोरांनी युद्धगुन्हा केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने केला. दरम्यान, बंडखोरांकडून शरणार्थी शिबिरांवर नव्याने हल्ले चढविण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लिबियन बंडखोर, हल्ले, शरणार्थी शिबिर, खलिफा हफ्तार, संयुक्त राष्ट्रसंघ, शरणार्थी, न्यूयॉर्क, त्रिपोली, अमेरिकालिबियातील सरकारच्या हातून राजधानी त्रिपोलीचा ताबा घेण्यास अपयश मिळाल्यामुळे खवळलेले बंडखोर नेता ‘जनरल खलिफा हफ्तार’ यांनी सरकार समर्थकांवर हवाई हल्ले चढविण्याचे फर्मान सोडले होते. बंडखोरांनी बुधवारपर्यंत त्रिपोलीजवळच्या ‘तजोरा’ भागात चढविलेल्या हवाई हल्ल्यात किमान ८० जणांचा बळी गेला तर ७० जण जखमी झाले. ‘तजोरा’ येथील शरणार्थी शिबिरावर बंडखोरांनी हल्ले चढविल्याचा आरोप लिबियन सरकार व मानवाधिकार संघटना करीत आहेत. या शिबिरात किमान दीडशेहून अधिक शरणार्थी होते.

ठार झालेल्यांमध्ये बहुतांश आफ्रिकन देशांमधले शरणार्थी होते. लिबियन शरणार्थींबरोबरच इतर आफ्रिकी देशांमधून लिबियात दाखल झालेल्या शरणार्थींचाही यामध्ये समावेश होता. ‘तजोरा’ शरणार्थी शिबिरातून युरोपमध्ये दाखल होण्यासाठी हे निर्वासित या ठिकाणी आले होते. हफ्तार यांच्या बंडखोरांनी जाणूनबुजून शरणार्थी शिबिराला लक्ष्य केल्याचा आरोप मानवाधिकार संघटना करीत आहेत. तर या हल्ल्याशी आपला संबंध नसून आपल्या लढाऊ विमानांनी सरकारी ठिकाणांवर हल्ले चढविल्याचा खुलासा बंडखोरांकडून केला जातो. अशा परिस्थितीत बंडखोरांनी या शरणार्थी शिबिराला लक्ष्य केल्यानंतर जगभरातून टीकेची झोड उठली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने लिबियासाठी नियुक्त केलेले विशेषदूत ‘घासम सलामे’ यांनी या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली. हफ्तार यांच्या बंडखोरांनी शरणार्थी शिबिरांवर चढविलेले हल्ले गंभीर युद्धगुन्हा ठरत असून यासाठी लिबियातील बंडखोर संघटनेवर बंदी टाकण्याचे आवाहन विशेषदूत सलामे यांनी केले. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव गुतेरस यांनी देखील या हल्ल्याची दखल घेऊन सुरक्षा परिषदेने एकमताने हफ्तार बंडखोरांवरील बंदीची मागणी पारित करावी, असे सुचविले. पण लिबियन बंडखोरांवरील या बंदीच्या निर्णयातून अमेरिकेने माघार घेतल्यामुळे जनरल खलिफा हफ्तार यांच्या संघटनेवरील कारवाई तुर्तास टळली आहे.

दरम्यान, शरणार्थी शिबिरावरील या हल्ल्यानंतर बंडखोर त्रिपोलीमध्ये नवे हल्ले चढवतील, असा दावा केला जातो. लिबियन बंडखोर सरकारी व लष्करी ठिकाणांवरील हल्ले थांबविणार नसल्याचा इशाराही लिबियन सूत्रांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर इतर शरणार्थी शिबिरातील निर्वासितांच्या सुरक्षेचा प्रश्‍न नव्याने उपस्थित झाला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info