सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचे पाठबळ असलेल्या ‘चिनी हॅकर्स’चा अमेरिकी कंपन्यावर सायबरहल्ला

सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीचे पाठबळ असलेल्या ‘चिनी हॅकर्स’चा अमेरिकी कंपन्यावर सायबरहल्ला

बीजिंग – अमेरिकेच्या ऊर्जा व पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांवर जुलै महिन्यात झालेल्या सायबरहल्ल्यांमागे चीनचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनच्या सत्ताधारी राजवटीसाठी काम करणार्‍या ‘एपीटी १०’ या हॅकर्सच्या गटाने अमेरिकी कंपन्यांवर हल्ले चढविल्याची माहिती ‘प्रूफपॉईंट’ या सायबरसुरक्षा कंपनीने दिली.

फेब्रुवारी तसेच मार्च महिन्यात अमेरिकेतील महत्त्वाच्या कंपन्या तसेच नौदल अधिकार्‍यांच्या यंत्रणांवर सायबरहल्ले झाल्याचे समोर आले होते. या हल्ल्यांमध्ये कंपन्यांची संवेदनशील व गोपनीय माहिती चोरण्याचे तसेच संरक्षणविषयक गुपिते मिळविण्याचे प्रयत्न झाले होते.

याप्रकरणी थेट कोणत्याही देशाचे नाव घेण्यात आले नसले तरी त्यामागे चीनचाच हात असल्याचे संकेत मिळाले होते. या हल्ल्यांनंतर अमेरिकेतील खाजगी सायबर सुरक्षा कंपन्या तसेच देशातील ‘सायबर कमांड’ने पुढील काळातील हल्ल्यांसाठी योग्य सज्जता राखण्याचा इशारा दिला होता.

गेल्या काही महिन्यात व्यापारयुद्ध, साऊथ चायना सी, तैवान, हुवेई, इराणचा अणुकार्यक्रम यासारख्या अनेक मुद्यांवरून अमेरिका व चीनमधील तणाव सातत्याने वाढतो आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने चीनवर टीका केली असून व्यापारी तसेच चलनविषयक धोरणांना लक्ष्य केले आहे.

चीनबरोबर व्यापारी चर्चा सुरू असतानाही ट्रम्प यांनी चीनविरोधात आक्रमक वक्तव्ये करून त्या देशावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले होते. ट्रम्प यांच्या या वर्तनावर चीनमध्ये प्रचंड नाराजी आहे. अशा पार्श्‍वभूमीवर चीनकडून होणारे सायबरहल्ले अधिक लक्ष वेधून घेणारे ठरतात.

‘प्रूफपॉईंट’ या सायबरसुरक्षा कंपनीने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीनच्या ‘एपीटी १०’ या हॅकर्सच्या गटाचा उल्लेख केला आहे. हा गट चीनची गुप्तचर यंत्रणा असणार्‍या ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’साठी काम करीत असल्याचा दावाही सदर कंपनीने केला. यापूर्वी जून महिन्यातही चिनी हॅकर्सच्या या गटाने जगातील १० वेगवेगळ्या दूरसंचार कंपन्यांना लक्ष्य करून चिनी ग्राहकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता.

जुलै महिन्यात झालेल्या सायबरहल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या ऊर्जा कंपन्यांच्या संगणकयंत्रणांमध्ये ‘मालवेअर’ पाठविण्यात आल्याचे उघड झाले. या ‘मालवेअर’चा वापर सदर कंपन्यांकडील माहिती चोरण्यासाठी तसेच त्यांच्या कार्यपद्धतीतील दुवे शोधण्यासाठी करण्यात आल्याचे ‘प्रूफपॉईंट’च्या अहवालात सांगण्यात आले. या हल्ल्यात वापरण्यात आलेले काही घटक गेल्यावर्षी जपानमधील माध्यम कंपन्यांवर झालेल्या सायबरहल्ल्याशी मिळतेजुळते असल्याचा दावाही अमेरिकी कंपनीने केला आहे.

मे महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन व चिनी कंपन्यांकडून होणारे सायबरहल्ले रोखण्यासाठी ‘नॅशनल इमर्जन्सी’ची घोषणा केली होती. त्यानंतरही हे सायबरहल्ले झाल्याचे उघड झाल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला व राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका पुन्हा एकदा उघड झाला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info