तुर्कीचे कंत्राटी सैनिक व दहशतवादी लिबियात दाखल – लिबियन बंडखोरांचा आरोप

तुर्कीचे कंत्राटी सैनिक व दहशतवादी लिबियात दाखल – लिबियन बंडखोरांचा आरोप

बैरूत – लिबियन पंतप्रधान ‘फएझ अल-सराज’ यांच्या सरकारला पाठिशी घालणार्‍या तुर्कीने लिबियामध्ये कंत्राटी सैनिक (मर्सिनरिज्) आणि दहशतवादी धाडले आहेत. लिबियातील बंडखोर नेते जनरल खलिफा हफ्तार यांच्या गटाने हा आरोप केला. या मर्सिनरिज् आणि दहशतवाद्यांच्या सहाय्याने तुर्की लिबियामध्ये मोठा नरसंहार घडविण्याच्या तयारीत असल्याचा ठपकाही या बंडखोरांनी ठेवला.

जनरल हफ्तार यांच्या ‘लिबियन नॅशनल आर्मी’ (एलएनए) या बंडखोर संघटनेचे प्रवक्ते खालिद अल-महजौब यांनी स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना तुर्की लिबियातील गृहयुद्ध भडकविण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी लिबियाच्या मिस्राता विमानतळावर प्रवासी विमान उतरले. तुर्कीतून आलेल्या या विमानातून कंत्राटी सैनिक (मर्सिनरिज्) आणि दहशतवाद्यांचा मोठा गट मिस्रातामध्ये दाखल झाला. लिबियन पंतप्रधान सराज यांच्या राजवटीला सहाय्य करण्यासाठी हे दहशतवादी लिबियात दाखल झाल्याचा दावा ‘एलएनए’चे प्रवक्ते महजौब यांनी केला.

तुर्की लिबियातील सराज यांच्या राजवटीबरोबरच कट्टरपंथी व दहशतवादी गटांना देखील सहाय्य करीत असल्याचा आरोप गेल्या काही आठवड्यांपासून होत आहे. याआधीही तुर्कीने सराज राजवटीसाटी लष्करी सहाय्य रवाना केले होते. यामध्ये आत्मघाती हल्ले चढविणारे ड्रोन्स, ड्रोनभेदी लेझर यंत्रणा व इतर शस्त्रसाठ्याचा समावेश होता. गेल्या महिन्यात लिबियातील एका हल्ल्यात तुर्कीने सराज समर्थक सैनिकांच्या सहाय्याने ‘एलएनए’ बंडखोरांच्या ड्रोनवर लेझरचा हल्ला चढविला होता. त्यानंतर लिबियन बंडखोरांनी तुर्की आणि लिबियातील सराज यांच्या राजवटीवर जोरदार टीका केली.

लिबियातील ‘गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल अकॉर्ड’ हे आघाडी सरकार इजिप्त व तुर्कीतील ‘मुस्लिम ब्रदरहडू’शी जवळीक ठेवून असल्याचा आरोप याआधी झाला होता. सराज राजवटीला पाठिंबा देणार्‍यांमध्ये ‘लिवा अल-सुमूद सलाह बदी’ ह्या कट्टरपंथीय नेत्याचाही समावेश आहे. या बदी याची हत्या करणार्‍याला ‘५० लाख लिबियन दिनार’चे (सुमारे ३६ लाख डॉलर्स) ईनाम लिबियन बंडखोरांनी घोषित केले आहे.

लिबियातील राजवटीविरोधात संघर्ष पुकारणार्‍या जनरल हफ्तार यांच्या बंडखोर संघटनेला रशिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (युएई), इजिप्त व इतर काही अरब देशांचे समर्थन आहे. त्यामुळे लिबियातील गृहयुद्धात तुर्की आणि अरब देश एकमेकांच्या विरोधात खडे ठाकले आहेत. त्यामुळे लिबियातील या गृहयुद्धाची तीव्रता वाढली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info