अमेरिका व युरोपच्या अंतराळसंस्था पृथ्वीवरून पाठविण्यात येणार्‍या पहिल्या ‘प्लॅनेटरी डिफेन्स मिशन’साठी सज्ज

अमेरिका व युरोपच्या अंतराळसंस्था पृथ्वीवरून पाठविण्यात येणार्‍या पहिल्या ‘प्लॅनेटरी डिफेन्स मिशन’साठी सज्ज

वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असणार्‍या लघुग्रहांचा वाढता धोका लक्षात घेऊन त्याला रोखण्यासाठी वेगाने तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेची अंतराळसंस्था ‘नासा’ व युरोपिय महासंघाची अंतराळसंस्था ‘इएसए’ यासाठी एकत्र आल्या आहेत. येत्या तीन वर्षात पृथ्वीवरून पहिले ‘प्लॅनेटरी डिफेन्स मिशन’ धाडण्यात येईल, अशी माहिती दोन्ही अंतराळसंस्थांशी निगडीत सूत्रांनी दिली.

गेल्या काही वर्षात परग्रहवासिय, उडत्या तबकड्या, ‘डीप स्पेस’ व अंतराळातील खनिजसंपत्ती याबाबतची नवनवी माहिती सातत्याने समोर येत आहे. अमेरिकेच्या नौदलानेही नुकतेच परग्रहावरून आलेल्या ‘उडत्या तबकड्या’संदर्भातील (युएफओ) वृत्ताला दुजोरा दिला होता. अमेरिकेच्या नेवाडा भागात असणार्‍या ‘एरिआ ५१’ भागातील परग्रहवासियांचा मुद्दाही गेल्या आठवड्यात चर्चेत आला होता. अमेरिकेच्या हवाईदलप्रमुखांनी याबाबत बोलताना, काही गोष्टी गोपनीय राहणे आवश्यक आहे व सरकारला तसे करण्याचा अधिकार आहे, असे सांगून त्याबाबतचे गूढ अधिकच वाढविले होते.

या पार्श्‍वभूमीवर अंतराळातून पृथ्वीवर धडकणार्‍या घटकांविरोधात संरक्षण करण्यासाठी सुरू झालेल्या हालचाली लक्ष वेधून घेणार्‍या ठरतात. अमेरिकेची अंतराळसंस्था ‘नासा’ने पृथ्वीवर काही लघुग्रह तसेच अंतराळातील इतर घटक धडकू शकतात, असे इशारे वारंवार दिले आहेत. यातील काही गोष्टी पृथ्वीवर मोठा हाहाकार उडविणार्‍या ठरतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्याविरोधात पृथ्वीच्या बचावासाठी पावले उचलणे गरजेचे असून युरोपिय महासंघाबरोबर आखण्यात आलेली मोहीम त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.

लघुग्रहापासून पृथ्वीचा बचाव करणे हे प्राथमिक उद्दिष्ट ठेऊन आखण्यात आलेल्या मोहिमेला ‘अ‍ॅस्टरॉईड इम्पॅक्ट अ‍ॅण्ड डिफ्लेक्शन अ‍ॅसेसमेंट’(एआयडीए) असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत पुढील तीन वर्षात ‘नासा’ व युरोपची ‘इएसए’ ही अंतराळसंस्था दोन उपग्रह यंत्रणा प्रक्षेपित करणार आहे. ‘नासा’च्या यंत्रणेला ‘डार्ट’ असे नाव देण्यात आले असून ‘इएसए’ची यंत्रणा ‘हेरा’ म्हणून ओळखण्यात येणार आहे.

पृथ्वीच्या नजिकच्या कक्षेत फिरणार्‍या ‘डिडिमॉस बी’ या लघुग्रहाला लक्ष्य करण्यात येणार आहे. ‘नासा’ची ‘डार्ट’ यंत्रणा २०२१ साली प्रक्षेपित करण्यात येणार असून २०२२ साली लक्ष्यावर धडक देईल, असे सांगण्यात येते. युरोपच्या अंतराळसंस्थेची यंत्रणा त्यानंतर प्रक्षेपित करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपूर्ण मोहिमेचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र उपग्रहदेखील अंतराळात धाडण्यात येईल, अशी माहिती या मोहिमेशी निगडित अधिकार्‍यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी जपानच्या अंतराळसंस्थेने पृथ्वीच्या जवळ येण्याची शक्यता असणार्‍या एका लघुग्रहावर अंतराळयान उतरविण्याची मोहीम यशस्वी करून दाखविली होती.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info