तुर्कीच्या सिरियातील हल्ल्यांमुळे कुर्दांच्या ताब्यातील – ‘आयएस’च्या सुमारे ८०० दहशतवाद्यांचे पलायन

तुर्कीच्या सिरियातील हल्ल्यांमुळे कुर्दांच्या ताब्यातील – ‘आयएस’च्या सुमारे ८०० दहशतवाद्यांचे पलायन

लंडन  – सिरियाच्या ‘एइन इस्सा’ येथील कुर्दांच्या ताब्यात असलेल्या शिबिरावर तुर्कीसंलग्न गटाने चढविलेल्या हल्ल्याचा फायदा घेऊन ‘आयएस’च्या ७८५ दहशतवाद्यांनी आपल्या कुटुंबासहीत पलायन केले. कुर्द बंडखोरांनी हा आरोप केला असून दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्यतिरिक्त ‘आयएस’च्या दहशतवाद्यांना कैद केलेल्या ‘कामिश्‍ली’ येथील तुरुंगावरही हवाई तसेच बॉम्ब हल्ले झाले आहेत.

‘आयएस’च्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी तुर्की हल्ले करीत असल्याचा आरोप कुर्दांनी याआधी केला होता. अमेरिकन लष्कर व कुर्दांच्या सशस्त्र संघटनांनी सिरियातील दहशतवादविरोधी कारवाईअंतर्गत ‘आयएस’च्या १२ हजार दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर या ‘आयएस’ दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना देखील कुर्दांच्या ताब्यातील भागात शिबिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले होते. पण अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर ‘आयएस’च्या दहशतवाद्यांच्या कारागृहाची तसेच कुर्दांच्या ठिकाणांची सुरक्षा हा चिंतेचा विषय बनला आहे. यापुढे सिरियातील ‘आयएस’च्या कैद्यांची जबाबदारी आमची नसेल, असे कुर्दांच्या नेत्यांनी सार्‍या जगाला बजावले आहे.

गेल्या चोवीस तासात कुर्दांच्या नियंत्रणात असलेले ‘आयएस’च्या दहशतवाद्यांचे कारागृह व ‘आयएस’ दहशतवाद्यांच्या कुटुंबियांच्या शिबिरांवर हल्ले वाढले आहेत. राक्का जवळील ‘एइन इस्सा’ या शहरातील कुर्दांनी घेरलेल्या शिबिरावर तुर्कीसंलग्न कंत्राटी सैनिकांनी हल्ले चढविले. या हल्ल्याचा फायदा घेऊन ‘आयएस’च्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी कुर्द सुरक्षारक्षकांवर हल्ले चढवून सदर शिबिरातून पलायन केले. ‘आयएस’चे किमान ७४५ दहशतवादी पसार झाल्याचा आरोप कुर्दांनी केला आहे. तर ‘अल हवाल’ येथील शिबिरातही दंगली आणि सुरक्षा रक्षकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, ‘आयएस’चे दहशतवादी आणि कुटुंबियांना युरोपिय देशांपर्यंत पोहोचविणारे एजंट्स देखील बेपत्ता झाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे ‘आयएस’च्या दहशतवाद्यांकडून युरोपिय देशांना फार मोठा धोका निर्माण?झाल्याचे दिसू लागले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info