पाकिस्तान तुर्कीच्या अणुबॉम्बसाठी सहाय्य करीत आहे – अमेरिकेच्या दैनिकाचा ठपका

पाकिस्तान तुर्कीच्या अणुबॉम्बसाठी सहाय्य करीत आहे – अमेरिकेच्या दैनिकाचा ठपका

वॉशिंग्टन – तुर्कीचे कुर्दांवरील हल्ले रोखू न शकलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तुर्कीला अणुबॉम्ब बनविण्यापासून व इराणच्या मार्गाने पुढे जाण्यापासून रोखू शकतील का? असा प्रश्‍न ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी दैनिकाने केला आहे. तुर्कीची महत्त्वाकांक्षा केवळ सिरियापुरती मर्यादित नसून हा देश अणुबॉम्ब तयार करण्याच्या तयारीला लागला आहे, असे सांगून या दैनिकाने ट्रम्प प्रशासनाला सावधानतेचा इशारा दिला. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे जनक आणि अणुतंत्रज्ञानाचा काळाबाजार चालविणार्‍या ए. क्यू. खान यांच्याबरोबरील तुर्कीचे संबंध असल्याचा ठपका या बातमीत ठेवण्यात आला आहे.

  

अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा धाब्यावर बसवून पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांनी इराण, उत्तर कोरिया आणि लिबिया या देशांना अणुतंत्रज्ञान पुरविले होते. पंधरा वर्षांपूर्वी ही बाब सिद्ध झाली होती व पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञ खान यांनी आपला गुन्हा काबूल देखील केला होता. पण कालांतराने आपण देशाच्या धोरणानुसार काम करीत होतो. मात्र ही बाब जगजाहीर झाल्याने आपण हा गुन्हा कबूल केला आणि पाकिस्तानला वाचविले, असे ए. क्यू. खान म्हणाले होते. अण्वस्त्रप्रसारासारख्या भयंकर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतरही ए. क्यू. खान व पाकिस्तानवर कारवाई झाली नव्हती. कारण अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धासाठी अमेरिकेला त्या काळी पाकिस्तानचे सहकार्य आवश्यक होते.

यासाठी अमेरिकेच्या तत्कालिन बुश प्रशासनाने पाकिस्तानच्या या अपराधांकडे दुर्लक्ष केले. पण १५ वर्षानंतरही पाकिस्तान तुर्कीला अणुबॉम्ब विकसित करण्यासाठी सहाय्य करीत असल्याचे उघड?झाले आहे. याआधी इराण, उत्तर कोरिया व लिबिया या देशांना अणुतंत्रज्ञान पुरविणार्‍या पाकिस्तानचा तुर्की हा चौथा ग्राहकदेश आहे का? असा सवाल करण्यात येत आहे. तसेच ए. क्यू. खान यांच्याशी तुर्कीचे संबंध वाढत असल्याची बाब लक्षात आणून देऊन ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने हा सवाल केला आहे. याबरोबरच पाकिस्तानला अणुतंत्रज्ञान व आवश्यक अणुबॉम्बसाठी आवश्यक असलेले साहित्य मिळविण्यासाठी तुर्कीने सहाय्य केले होते, याचाही दाखला या दैनिकाने दिला आहे.

या बातमीमुळे पाकिस्तानकडून अण्वस्त्रप्रसारबंदीचे उल्लंघन होत असल्याची अत्यंत गंभीर बाब पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. काही दिवसांपूर्वीच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी आपल्या आण्विक महत्त्वाकांक्षा जगजाहीर केल्या होत्या. काही देशांकडे अण्वस्त्रे आहेत आणि तुर्की अण्वस्त्रे मिळवू शकत नाही, ही बाब आपण स्वीकारणार नसल्याचे एर्दोगन म्हणाले होते. अर्थातच आपली आण्विक महत्त्वाकांक्षा साध्य करण्याची पूर्ण तयारी झाल्यानंतरच तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी ही विधाने केल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी भारताचा विरोध पत्करून काश्मीर प्रश्‍नी पाकिस्तानची बाजू घेणार्‍या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबतीतला संशय अधिकच वाढविला आहे.

भारतासारख्या देशाला दुखावून काश्मीर प्रश्‍नावर पाकिस्तानची बाजू घेण्याची तयारी जगातील प्रमुख देशांनीही दाखविली नव्हती. इस्लामधर्मिय देश देखील काश्मीर प्रश्‍नावर भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला अनुकूल ठरणारी विधाने केली त्यामागे ‘आण्विक राजकारण’ असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. तुर्की हा नाटोचा सदस्यदेश असून नाटोच्या कुठल्याही देशावर आक्रमण झाल्यास नाटोचे सदस्यदेश ते आपल्यावरील आक्रमण मानतात व त्याला नाटोकडून प्रत्युत्तर दिले जाते. अशी भक्कम सुरक्षा असतानाही, तुर्की अण्वस्त्रे संपादन करण्याच्या दिशेने पुढे चालला आहे, ही बाब लक्षणीय ठरते.

ही बाब नाटोच्या विरोधात जाणारी असून पुढच्या काळात तुर्कीला याचा फटका बसू शकतो. त्याचवेळी तुर्कीला अणुतंत्रज्ञान तसेच संवेदनशील आण्विक साहित्याचा पुरवठा करण्याचा पाकिस्तानवरील आरोप सिद्ध झाला, तर त्याचे विघातक परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. अमेरिका व आंतरराष्ट्रीय समुदायाला यावेळी पाकिस्तानकडून केल्या जाणार्‍या अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्याच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. म्हणूनच ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिलेल्या या वृत्ताचे फार मोठे पडसाद उमटतील, असे संकेत मिळत आहेत.

 English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info