हाँगकाँगमध्ये पुन्हा व्यापक निदर्शनांना सुरुवात – प्रशासनाला निर्वाणीचा इशारा असल्याचा आंदोलकांचा दावा

हाँगकाँगमध्ये पुन्हा व्यापक निदर्शनांना सुरुवात – प्रशासनाला निर्वाणीचा इशारा असल्याचा आंदोलकांचा दावा

हाँगकाँग – आम्ही आता मृत्यू येईपर्यंत हाँगकाँगच्या स्वातंत्र्यासाठी लढू, असा निर्वाणीचा इशारा देत रविवारपासून हाँगकाँगच्या आंदोलकांनी नव्या व्यापक निदर्शनांना सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीत मिळालेले यश व आंतरराष्ट्रीय स्तरावरून चीनच्या राजवटीवर वाढता दबाव या पार्श्‍वभूमीवर हाँगकाँगमधील आंदोलकांनी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा निश्‍चय केल्याचे रविवारच्या निदर्शनांवरून दिसून येत आहे. त्याचवेळी सुरक्षायंत्रणांनीही निदर्शने रोखण्यासाठी ‘वेगवेगळ्या’ पर्यायांची तयारी सुरू केली असून पोलिसांच्या काही पथकांकडे ‘एआर-१५ रायफल्स’ आढळल्याचे वृत्त समोर आले आहे.

हाँगकाँगच्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असून या कालावधीत त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढताना दिसत आहे. हे चीनच्या सत्ताधारी राजवटीला हाँगकाँगमधून मिळालेले अनपेक्षित आव्हान असून त्यावरून कम्युनिस्ट पार्टीतही मतभेद निर्माण झाले आहेत. हाँगकाँगमधील सलग सहा महिने सुरू असणारी निदर्शने हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाचे अपयश असल्याची दबकी चर्चा चीनच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचवेळी सत्ताधारी राजवटीतील एक गट हाँगकाँगमध्ये निर्णायक कारवाई करून प्रकरण संपविण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहे.

चीनने हाँगकाँगमधील स्थानिक प्रशासनामागे आपली संपूर्ण ताकद उभी केली आहे. मात्र तरीही प्रशासन आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले असून हाच मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला अडचणीत आणताना दिसत आहे. अमेरिका व ब्रिटनसारख्या देशांनी हाँगकाँगच्या मुद्यावर कठोर भूमिका स्वीकारली असून निर्बंधांचीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चीनसमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

दुसर्‍या बाजूला आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतरही त्याची तीव्रता कायम ठेऊन हाँगकाँगमधील जनतेने एक नवा धडा घालून दिल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटली आहे. त्यामुळे या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढताना दिसत असून जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यासारख्या देशांमधूनही हॉगकाँगला समर्थन मिळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर रविवारपासून आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला असून शहरातील सर्वात मोठा लोकशाहीवादी गट यात सहभागी झाला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info