पाकिस्तान ‘पीओके’ची ‘आझादी’ काढून घेण्याच्या तयारीत

पाकिस्तान ‘पीओके’ची ‘आझादी’ काढून घेण्याच्या तयारीत

मुझफ्फराबाद – काश्मीरचा भूभाग अवैधरित्या बळकावून पाकिस्तानने याला ‘आझाद काश्मीर’ असे नाव दिले होते. पण आता मात्र पाकिस्तान काश्मीरची तथाकथित ‘आझादी’ हिरावून घेण्याच्या तयारीला लागला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधल्या आपल्या विभागांच्या कामकाजातून ‘आझाद काश्मीर’ वगळून केवळ काश्मीरचा असा उल्लेख पाकिस्तानच्या सरकारकडून केला जात आहे.

याआधी ‘पीओके’चे राष्ट्रपती व पंतप्रधानपद रद्द करण्याची तयारी पाकिस्तानने केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पीओकेचे पंतप्रधान राजा फारूख हैदर यांनी आपण या भूभागाचे अखेरचे पंतप्रधान ठरू शकतो, असा दावा नुकताच केला होता. त्यामुळे पाकिस्तान आपल्या ताब्यातील काश्मीरच्या भूभागाबाबत काहीतरी मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारताने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि हा केंद्र शासित प्रदेश बनविला होता. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात बर्‍याच हालचाली करून पाहिल्या. पण यातल्या कुठल्याही प्रयत्नांना यश न मिळाल्याने पाकिस्तानच्या सरकार आणि लष्करावरही सडकून टीका होत आहे.

‘पीओके’, आझादी, फारूख हैदर, काश्मीर, आक्रमण, पाकिस्तान, नागरिकत्त्व सुधारणा विधेयक

अशा परिस्थितीत काश्मीरबाबत काहीतरी केल्याची बाब पाकिस्तानी सरकारला आपल्या जनतेला दाखवावीच लागेल. त्याचीच तयारी सुरू असून काश्मीरची तथाकथित आझादी हिरावून घेण्यासाठी सुरू झालेले प्रयत्न याचाच भाग असल्याचे दिसते. प्रत्यक्षात पीओकेचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हाती कुठलीही सत्ता नसून पीओकेचा कारभार पाकिस्तानच्या सरकारकडूनच हाकला जातो. पाकिस्ताचे सरकार देखील लष्कराच्या इशार्‍याखेरीज पीओकेमध्ये कुठलाही निर्णय घेत नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानने पीओकेबाबत कुठलाही निर्णय घेतला तरी त्याने विशेष फरक पडण्यासारखी परिस्थिती नाही. तरीही पाकिस्तानी जनतेला दाखविण्यासाठी असा निर्णय पाकिस्तानच्या सरकार आणि लष्कराकडून घेतला जात असल्याचे दिसते.

यासाठी हालचाली सुरू असतानाच, पाकिस्तानचे बेताल रेल्वेमंत्री शेख रशिद यांनी भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली. भारताच्या संसदेने संमत केलेल्या नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाचा दाखला देऊन शेख रशिद यांनी भारताला हा युद्धाचा इशारा दिला. मात्र पाकिस्तानची माध्यमेच शेख रशिद यांच्या धमक्यांची खिल्ली उडवित आहेत. पाकिस्तानी रेल्वे धडपणे चालवू न शकणार्‍या नेत्याने अशी बेजबाबदार विधाने करू नये, असे शेरे पाकिस्तानचे पत्रकार आणि विश्‍लेषक मारत आहेत. त्याचवेळी काश्मीरसाठी दर शुक्रवारी एक तास रस्त्यावर उतरण्याच्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या चळवळीचे काय झाले? असा प्रश्‍न माध्यमांकडून विचारला जात आहे.

या सार्‍या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठीच पाकिस्तानचे सरकार व लष्कर ‘पीओके’च्या ‘आझाद काश्मीर’ या नावातून ‘आझाद’ काढून घेण्याच्या प्रयत्नात आहे. आपले सरकार देखील भारतासारखा आक्रमक निर्णय घेऊ शकते, असे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान इम्रान खान याद्वारे करीत आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराला देखील भारताच्या विरोधात काहीतरी केल्याचे समाधान यामुळे मिळू शकते. भारताच्या संसदेमध्ये कलम ३७० हटविण्याबाबतचे विधेयक सादर करण्यात आल्यापासूनच पाकिस्तानात गदारोळ माजला होता. यानंतर भारत ‘पीओके’वर हल्ला चढविणार असून सारे काश्मीर ताब्यात घेणार असल्याची चर्चा पाकिस्तानात सुरू झाली होती. भारताने आक्रमण केलेच तर त्याला तोंड देण्याची पाकिस्तानी लष्कराची तयारी आहे का, असे प्रश्‍न यानंतर विचारले जात होते.

अजूनही भारताच्या ‘पीओके’वरील हल्ल्याची शक्यता संपलेली नाही, असा इशारा पाकिस्तानचे लष्करी विश्‍लेषक देत आहेत. तर भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताकडून काश्मीर परत मिळविण्याचा मार्ग केवळ युद्ध हाच असल्याचे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info