‘कौलालंपूर समिट’चे आयोजन करणार्‍या तुर्की-इराण-कतार-मलेशियाला ‘ओआयसी’मार्फत सौदीचा इशारा

‘कौलालंपूर समिट’चे आयोजन करणार्‍या तुर्की-इराण-कतार-मलेशियाला ‘ओआयसी’मार्फत सौदीचा इशारा

रियाध, दि. २५ (वृत्तसंस्था) – इस्लामधर्मिय देशांचे नवे संघटन उभे करण्यासाठी तुर्की, इराण, कतार आणि मलेशियाने एकत्र येऊन ‘कौलालंपूर समिट’चे आयोजन केले होते. आपले हे संघटन ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ला (ओआयसी) आव्हान देणारे नसेल, असा दावा या देशांनी केला होता. पण ‘ओआयसी’चे नेतृत्त्व करणारा सौदी अरेबिया मात्र याकडे आव्हान म्हणूनच पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारचे नवे गट तयार करणे इस्लामधर्मियांच्या हिताचे नाही, असा इशारा ‘ओआयसी’चे महासचिव ‘युसेफ अल-ओथायमीन’ यांनी दिला आहे.

मलेशियातील ‘कौलालंपूर समिट’मध्ये तुर्की, इराण, कतार आणि मलेशिया या देशांनी अप्रत्यक्षपणे ‘ओआयसी’ला लक्ष्य केले होते. ही संघटना इस्लामधर्मियांची एकजूट करून त्यांना नेतृत्त्व देण्यात अपयशी ठरल्याचा सूर या परिषदेत लावण्यात आला होता. त्याची गंभीर दखल सौदी अरेबियाने घेतल्याचे दिसत आहे. ‘ओआयसी’चे महासचिव युसेफ अल-ओथायमीन यांनी अशा प्रकारचे गट तयार करून त्यांच्या भेटीगाठी घेणे ‘ओआयसी’ला कमकुवत करण्याचा प्रयत्न ठरतो, अशी टीका केली आहे.

  

‘ओआयसी’ ही इस्लामधर्मिय देशांचे प्रतिनिधित्त्व करणारी एकमेव संघटना असून याला आव्हान देणे म्हणजे इस्लामधर्मिय देशांचे संघटन कमकुवत करणे ठरते. ते इस्लामधर्माच्या हिताचे नाही, असा इशारा अल-ओथायमीन यांनी दिला. ‘ओआयसी’ने याबाबत स्पष्टपणे भूमिका घेतल्यानंतर, इस्लामधर्मिय देशांमध्ये नेतृत्त्वाचा वाद पुन्हा उफाळून वर आल्याचे दिसू लागले आहे. कौलालांपूर समिटच्या आयोजकांपैकी एक असलेल्या पाकिस्तानने यात सहभागी होऊ नये, असा इशारा सौदी अरेबियाने दिला होता. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान?खान यापासून दूर राहिले, अशी चर्चा होती.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी उघडपणे सौदीवर हा आरोप करून पाकिस्तानी पंतप्रधानांच्या ‘कौलालंपूर समिट’मधील अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानला सौदीकडून दिले जाणारे अर्थसहाय्य तसेच इंधनविषयक सवलती काढून घेण्याची धमकी दिली होती. तसेच सौदीमध्ये लाखो पाकिस्तानी कामगार आहेत. त्यांना पाकिस्तानात धाडून त्यांच्याजागी बांगलादेशी कामगारांना नियुक्त करण्याचा इशाराही सौदीने दिला होता, अशी चर्चा पाकिस्तानचेच विश्‍लेषक करीत आहेत.

यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे पाय जमिनीवर आले आणि त्यांनी कौलालंपूर परिषदेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सार्वभौम नाही, दुसर्‍या देशाच्या इशार्‍याने पाकिस्तान काम करते, हे जगासमोर आल्याची खंत हे विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. शिवाय इतकी कणखर भूमिका घेण्याची धमक नव्हती, तर मग पंतप्रधान इम्रान?खान यांनी ‘कौलालंपूर समिट’साठी पुढाकार का घेतला? असा सवाल हे विश्‍लेषक विचारत आहेत.

सौदीने पाकिस्तानवर टाकलेल्या दडपणाची बाब जगजाहीर झाल्यानंतर, तुर्की, इराण, कतार आणि मलेशियाच्या वेगळा गट स्थापन करण्याच्या प्रयत्नांकडे सौदी अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे उघड झाले आहे. पुढच्या काळात सौदी अरेबिया आपल्या नेतृत्त्वाला आव्हान देणार्‍या तुर्की, इराण, कतार आणि मलेशियाला धडा शिकविण्यासाठी पावले उचलण्याची दाट शक्यता या समोर येत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info