‘साऊथ चायना सी’तील चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर – अमेरिका सिंगापूरला ‘एफ-३५’ पुरविणार

‘साऊथ चायना सी’तील चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर – अमेरिका सिंगापूरला ‘एफ-३५’ पुरविणार

वॉशिंग्टन – आग्नेय आशियातील सर्वात महत्त्वाचा देश असणारा सिंगापूर अमेरिकेच्या ‘एफ-३५’ या जगातील अतिप्रगत लढाऊ विमानांनी सज्ज होणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सिंगापूरबरोबरच्या या संरक्षण सहकार्याची घोषणा केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हालचालींविरोधात अमेरिकेने सिंगापूरला अतिप्रगत लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन मोठी सामरिक हालचाल केल्याचे बोलले जाते.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ‘ली हिएन लूंग’ यांच्याशी चर्चा करून उभय देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेल्याचे स्पष्ट केले होते. ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेच्या पार्श्‍वभूमीवर, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी अमेरिकेकडे लष्करी सहकार्याची मागणी केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील सिंगापूरला लष्करी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते.

उभय देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेने सिंगापूरला १२ ‘एफ-३५बी’ ही अतिप्रगत लढाऊ विमानाची नौदल आवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे. जगातील या एकमेव ‘फिफ्थ जनरेशन’ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी सिंगापूर २.७५ अब्ज डॉलर्स मोजणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सिंगापूरबरोबरच्या या सहकार्याची घोषणा केली. सिंगापूरच्या नौदलातील जुन्या ‘एफ-१६’ लढाऊ विमानांची बदली म्हणून ‘एफ-३५बी’ या विमानांना तैनात केले जाईल.

‘व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग’साठी प्रसिद्ध असलेल्या या विमानांच्या खरेदीमुळे सिंगापूरच्या नौदलाची क्षमता वाढेल, असे बोलले जाते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंजुरीनंतर अमेरिकन काँग्रेसकडून यावर शिक्कामोर्तब होणे शिल्लक आहे. पुढच्या तीन महिन्यात अमेरिकन काँग्रेसचा यावर निर्णय अपेक्षित आहे. सिंगापूरला ‘एफ-३५बी’चे सहाय्य अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

आग्नेय आशियातील सर्वात आघाडीची वायुसेना म्हणून सिंगापूरचा उल्लेख केला जातो. पण मलाक्काचे आखात आणि साऊथ चायना सी या दोन अतिमहत्त्वाच्या सागरी क्षेत्रांच्या मधोमध असलेल्या सिंगापूरचे नौदल तितक्या ताकदीचे नाही. पर्शियन आखाताशी जोडणार्‍या मलाक्काच्या आखातातून चीनच्या इंधन व व्यापारी जहाजांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होतो.

अशा परिस्थितीत, अमेरिकेने सिंगापूरला ‘एफ-३५’ची नौदल आवृत्ती पुरवून चीनला मोठे आव्हान दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. याआधी अमेरिकेने आग्नेय आशियातील फिलिपाईन्स, व्हिएतनाम या देशांना लढाऊ विमाने तसेच विनाशिकांचे सहाय्य पुरविले आहे. तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांना ‘एफ-३५बी’ या विमानांची विक्री केली आहे. यामध्ये आता सिंगापूरचा देखील समावेश झाला आहे.

अमेरिकेच्या या निर्णयावर चीनकडून जहाल प्रतिक्रिया उमटू शकते. आग्नेय आशियाई देशांनी या क्षेत्राच्या बाहेरील देशाकडून आपले संरक्षण होईल, या भ्रमात राहू नये, असे चीनने याआधीच बजावले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info