शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच ब्रिटनच्या परराष्ट्र, संरक्षणविषयक धोरणात मोठे फेरबदल – पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू’ची घोषणा

शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच ब्रिटनच्या परराष्ट्र, संरक्षणविषयक धोरणात मोठे फेरबदल – पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू’ची घोषणा

लंडन, दि. २७ (वृत्तसंस्था) – ‘जागतिक पातळीवर प्रचंड वेगाने बदल घडत असताना ब्रिटननेही बदलांबरोबर पुढे जायला हवे. त्यासाठी ब्रिटनच्या वर्तमानातील तसेच येणार्‍या अनेक दशकांमधील राष्ट्रीय हितसंबंधांचा विचार करून त्यावर आधारलेले परराष्ट्र धोरण आखणे गरजेचे आहे आणि त्याचवेळी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची व त्याचा वापर करण्याची आवश्यकता आहे’, अशा स्पष्ट शब्दात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘ब्रेक्झिट’नंतर जागतिक स्तरावर ब्रिटनची भूमिका निश्‍चित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली.

शीतयुद्धानंतर प्रथमच ब्रिटनच्या सरकारकडून संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्र व विकास विभागाच्या धोरणांचा व्यापक आढावा घेण्यात येणार आहे. या योजनेला ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू’ असे नाव देण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी व ‘टास्क फोर्स’ची नियुक्ती करण्यात येणार आहे. यापूर्वी ब्रिटनमध्ये संरक्षण तसेच परराष्ट्र धोरणाचा एकत्रित आढावा घेण्याचे काम झाले असले तरी त्यात फक्त संरक्षण विभागाचा सहभाग होता. मात्र ‘ब्रेक्झिट’च्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान जॉन्सन यांनी ब्रिटनचे सध्याचे तसेच भविष्यातील संरक्षण, परराष्ट्र, अंतर्गत सुरक्षा व विकास धोरण एकत्रितरित्या आखण्याची तयारी केली असून ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू’ त्याचाच भाग आहे.

पंतप्रधान जॉन्सन यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात शीतयुद्धाचा स्पष्ट उल्लेख करून नवे धोरण शीतयुद्ध संपल्यानंतरचा सर्वात मोठा बदल असेल, अशी ग्वाही दिली आहे. ब्रिटनने येणार्‍या दशकातील संधींचा फायदा घेऊन सरकारचा प्राधान्यक्रम पूर्ण करण्यासाठी हालचाली करायला हव्यात, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली. ब्रिटन उर्वरित जगाशी कसे जुळवून घेईल अथवा घेऊ शकतो त्यासाठी हा क्षण निर्णायक असून त्या अनुषंगाने प्राधान्यक्रम निश्‍चित करणे आवश्यक ठरेल, असे जॉन्सन यांनी बजावले.

Johnson, Integrated Review, Boris Johnson, defence policy, post-Brexit, United Kingdom, GDPआपल्या निवेदनात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पाच मुद्यांचा उल्लेख केला आहे. त्यातील पहिला मुद्दा जगातील ब्रिटनची भूमिका निश्‍चित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना हा असून त्यात राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरणासाठी दीर्घकालीन धोरणात्मक उद्दिष्टे स्पष्ट करणे यावर भर देण्याचा उल्लेख आहे. दुसर्‍या मुद्यात, सहकारी व मित्रदेशांबरोबरील सहकार्यावर भर देण्यात आला असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी ब्रिटनचे योगदान ठरविणे महत्त्वाचे असल्याचे म्हंटले आहे.

तिसर्‍या मुद्यात ब्रिटनच्या क्षमता, उद्दिष्टे व धोके निश्‍चित करण्याची बाब समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर ब्रिटनचे प्रशासन व यंत्रणांमधील सुधारणा यावर भर देण्यात आला आहे. तर अखेरच्या व पाचव्या मुद्यात पुढील दशकात ब्रिटन आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे सक्रिय राहिल याचा अत्यंत स्पष्ट आराखडा तयार करण्याचा उल्लेख आहे. त्याचवेळी ब्रिटनची आण्विक क्षमता आणि संरक्षणखर्चासाठी ‘जीडीपी’च्या दोन टक्क्यांहून अधिक तरतूद यापासून कोणत्याही प्रकारे फारकत घेण्यात येणार नसल्याचा ठाम निर्धार पंतप्रधान जॉन्सन यांनी यावेळी व्यक्त केला.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info