चीनच्या नौदलात दोन प्रगत आण्विक पाणबुड्या दाखल

चीनच्या नौदलात दोन प्रगत आण्विक पाणबुड्या दाखल

बीजिंग – चीनच्या नौदलात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज दोन प्रगत आण्विक पाणबुड्या दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. हॉंगकॉंग स्थित दैनिकाने चिनी लष्करी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिल्याचे स्पष्ट केले. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या संसदीय अहवालात, चिनी नौदलाच्या व त्यातही नव्या पाणबुड्यांचा वाढत्या सामार्थ्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नव्या प्रगत पाणबुड्यांचा समावेश लक्ष वेधणारा ठरतो.

गेल्याच आठवड्यात चिनी नौदलाच्या ७१व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर संचलन आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान पाणबुड्यांचा समावेश करण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. चीनच्या या दोन्ही प्रगत पाणबुड्या ‘जीन क्लास’ (टाईप ०९४) प्रकारातील असून त्यांचा व्हिडिओदेखील चिनी नौदलाने प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये दोन्ही प्रगत पाणबुड्यांवरून ‘जेएल-२’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचे दाखविले आहे.

या प्रगत पाणबुड्यांमध्ये अत्याधुनिक रडार व सोनार तंत्रज्ञानाचा समावेश असून टोर्पेडोज व क्षेपणास्त्रांची संख्याही वाढविण्यात आल्याची माहिती चिनी लष्करी सूत्रांनी दिली. हॉंगकॉंगच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ दैनिकाने दिलेल्या वृत्तात, नव्या पाणबुड्यांचा समावेश चिनी नौदलाची खोल समुद्रातील युद्धक्षमता वाढविणारा असल्याचे म्हटले आहे. नव्या प्रगत पाणबुड्यांमध्ये १६ ‘जेएल-२’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात असून त्यांची क्षमता तब्बल सात हजार किलोमीटर्सपर्यंत मारा करण्याची आहे.

नव्या प्रगत पाणबुड्यांचा समावेश चिनी नौदलकडून गेली काही वर्षे सुरू असलेल्या आक्रमक विस्तारीकरणाचा भाग मानला जातो. गेल्याच वर्षी चीनच्या नौदलात स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘शॅंडोंग’ सामील झाली होती. त्याव्यतिरिक्त नव्या विनाशिकेचाही समावेश करण्यात आला असून, ‘न्यूक्लिअर अटॅक सबमरीन’ विकसित करण्याचे कामही सुरू आहे. नव्या पाणबुड्यांचा समावेशानंतर चीनच्या नौदलातील पाणबुड्यांची संख्या ६६ झाली असून येत्या दशकभरात १० किंवा त्याहून अधिक पाणबुड्यांची भर पडेल, असे संकेत अमेरिकी संसदेच्या अहवालात देण्यात आले आहेत.

चिनी नौदलाचा हा आक्रमक विस्तार ‘साऊथ चायना सी’सह ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रावर वर्चस्व मिळविण्याच्या महत्वाकांक्षी धोरणाचा भाग मानला जातो.

सारे जग कोरोनाविरोधात लढत असल्याचा फायदा घेऊन चीनने ‘साऊथ चायना सी’वर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही दिवसांपूर्वी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीनच्या गस्तीनौकांनी व्हिएतनामच्या मच्छिमार जहाजाला धडक दिली होती. त्यापूर्वी या सागरी क्षेत्रात चीन व मलेशियाची जहाजे आमनेसामने आली होती. या घटना ‘साऊथ चायना सी’ मधील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत देणाऱ्या आहेत. साथीचे संकट असतानाही चीन आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आक्रमक हालचाली करीत असून त्यामुळे ‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावरुन चीनला होणारा विरोध अधिकच तीव्र होऊ लागला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info