कोरोनाव्हायरस’पेक्षाही चीनचा धोका अधिक भयंकर – संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी राजदूत निक्की हॅले यांचा इशारा

कोरोनाव्हायरस’पेक्षाही चीनचा धोका अधिक भयंकर – संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी राजदूत निक्की हॅले यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना चीनचे वर्तन गुन्हेगारी स्वरूपाचे होते व यासाठी या देशाला लक्ष्य करायलाच हवे. मात्र चीनचा धोका इतक्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. साऱ्या पॅसिफिक क्षेत्राला चीनपासून धोका आहे व याला उत्तर देण्याची जबाबदारी एकट्या अमेरिकेची नाही. ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारतानेही चीनपासून असलेला धोका ओळखला आहे. युरोपिय देश मात्र याबाबत खूपच मागे आहेत’,अशा थेट शब्दात संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी चीनवर नवा हल्ला चढविला.

कोरोनाव्हायरसच्या मुद्यावरुन जागतिक स्तरावरील चीनविरोधी वातावरण अधिकच तीव्र होत चालले आहे. यात अमेरिकेने विशेष पुढाकार घेतला असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व अधिकारी चीनला सातत्याने लक्ष्य करीत आहेत. सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीने चीनच्या मुद्यावर स्पेशल टास्क फोर्सही स्थापन केला आहे. पक्षाच्या माजी नेत्यांनीही चीनविरोधात आक्रमक टीका सुरू केली असून, निक्की हॅलेंसारख्या नेत्या त्यात आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वीच हॅले यांनी ‘स्टॉप कम्युनिस्ट चायना’ नावाने ऑनलाईन मोहिमही सुरू केली होती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये लिहिलेल्या लेखातून हॅले यांनी ही मोहीम अधिकच आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत.

‘युद्ध न करता कम्युनिस्ट राजवटींचा पराभव करायचा असेल तर आपले सामर्थ्य त्यांच्यापेक्षा जास्त आहे, हे दाखवून देणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे’ या ब्रिटनचे माजी पंतप्रधान व मुत्सद्दी विन्स्टन चर्चिल यांच्या उद्गारांनी सुरुवात करुन हॅले यांनी आपले लक्ष्य चीनची कम्युनिस्ट राजवट असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेतले गेले नव्हते.

मात्र अमेरिकी नेतृत्वाने चर्चिल यांचा सल्ला मानल्याचे हॅले यांनी लेखात नमूद केले आहे. रशियन संघराज्यातील कम्युनिझम पाश्चात्यांच्या अधिक प्रभावी आर्थिक, राजनैतिक व लष्करी बळाच्या जोरावरच पराभूत झाला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘वुहानमधून सुरू झालेल्या साथीने जगभरात लाखो लोकांचे बळी घेतले असून अर्थव्यवस्थांचे अपरिमित नुकसान केले आहे. मात्र खोटेपणा व सर्व लपवण्याची प्रवृत्ती यामुळे चीन याची जबाबदारी कधीच घेणार नाही. पण ही फसवणूक म्हणजे चीनच्या कम्युनिझमचा सर्वात मोठा धोका आहे, असे समजू नका. हे फक्त एक लक्षण आहे. एखादा विषाणू व आजाराची साथ कोणत्याही देशातून सुरु होऊ शकते. पण चीनपासून असणारे धोके मात्र इतर कोणत्या देशाकडून येणार नाहीत’, या शब्दात हॅले यांनी चीनच्या धोक्याचा पुनरुच्चार केला.

यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी राजदूत असणाऱ्या निक्की हॅले यांनी साथ सुरू असतानाही चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून कशा निंदनीय कारवाया सुरू आहेत याची जंत्रीच सादर केली. हॉंगकाँगमधील लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना केलेली अटक, साऊथ चायना सीमध्ये शेजारी देशांच्या नौकांवर केलेले हल्ले, गुप्तपणे घेतलेल्या अणुचाचण्या ही केवळ एका महिन्यात चीनच्या सत्ताधारी राजवटीने दाखवलेल्या आक्रमकतेची व दडपशाहीची झलक आहे, असा दावा हॅले यांनी यावेळी केला.

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आपल्या नागरिकांची टेहळणी करण्यासाठी तैनात केलेली यंत्रणा, झिंजिआंगमध्ये अल्पसंख्याक समुदायावर सुरू असलेली दडपशाही यांचा उल्लेख करून हॅले यांनी चीनची कम्युनिस्ट राजवट देशातील जनतेचाही विचार करीत नाही, याकडे लक्ष वेधले. आर्थिकदृष्ट्या चीन संपन्न झाल्यास त्याची राजकिय व्यवस्था अधिक मोकळी होईल, हा पश्चिमी देशांचा समज खोटा ठरला आहे, हे कडवट वास्तव हॅले यांनी लेखातून परखडपणे मांडले.
याचे कारण चीनची कम्युनिस्ट पार्टी, पार्टीची देशातील सर्व यंत्रणांवर असणारी भक्कम पकड आणि फक्त पार्टी मजबूत होण्यासाठी आखण्यात तसेच राबविण्यात येणारी धोरणे, हेच असल्याचे हॅले यांनी लक्षात आणून दिले. चीन ही वेगळ्या प्रकारची धोकादायक ठरणारी सत्ता असून त्याचा मुकाबला कऱण्यासाठी चर्चिल यांच्या सल्ल्याप्रमाणे तयारी सुरू करणे हाच शांतीचा मार्ग ठरेल, अशी स्पष्ट भूमिका हॅले यांनी अखेरीस मांडली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info