चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडून टाकू – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची धमकी

चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडून टाकू  – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची धमकी

वॉशिंग्टन – कोरोना साथीच्या मुद्यावर चीनने घेतलेल्या भूमिकेमुळे आपला दारुण अपेक्षाभंग झाला असून अमेरिका चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडून टाकेल अशी धमकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दाखविलेल्या आक्रमकतेला अमेरिकी नेते व संसद सदस्यांनी जबरदस्त समर्थन दिले आहे. अमेरिकेतील सिनेटरनी चीनला एकटे पडून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची कोंडी करण्यासाठी ‘१८ पॉईंट प्लॅन’ सादर केला. त्यात अमेरिकेने भारत, जपान व तैवानला चीनविरोधात अधिक बळ द्यावे, असे सुचविण्यात आले आहे.

कोरोनाव्हायरस म्हणजे चीनचे जैविक शस्त्र असून चीनने साऱ्या जगावर याचा प्रयोग केला आहे, असे थेट आरोप सुरू झाले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीच उघडपणे तसे संकेत दिले होते. अमेरिकेबरोबरच ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनीही या मुद्यावर चीनवरील दडपण वाढविले असून राजनैतिक पातळीवर संघर्ष सुरू केला आहे. चीनबरोबरील संबंध पूर्णपणे तोडण्याची धमकी देऊन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हा संघर्ष शिगेला पोहोचवल्याचे दिसत आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संबंध तोडण्याची धमकी देतानाच याने अमेरिकेचे नुकसान होणार नसून ५०० अब्ज डॉलर्सची बचतच होईल, असा टोला लगावला. कोरोना साथीच्या मुद्यावर चीनला पुन्हा एकदा धारेवर धरून, ट्रम्प यांनी चीनच्या राजवटीने ही साथ जाणूनबुजून पसरवली, असा आरोप केला. अमेरिकी  राष्ट्राध्यक्षांनी चीनविरोधात सुरू केलेल्या आक्रमक मोहिमेला सहकारी नेते व संसद सदस्यांकडून जबरदस्त समर्थन मिळू लागले आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेच्या संसदेत पाचहून अधिक चीनविरोधी प्रस्ताव सादर झाले आहेत.

फ्लोरिडाचे सिनेटर थोम टिलिस यांनी, ट्रम्प यांच्या संबंध तोडण्याच्या धमकीच्या एक पाऊल पुढे जाऊन चीनला एकटे पाडण्याचा आराखडाच सादर केला आहे. चीनला कोरोना साथीसाठी जबाबदार धरून अमेरिकेची अर्थव्यवस्था, आरोग्य व राष्ट्रीय सुरक्षा यांची काळजी घेणे हे आपल्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सिनेटर टिलिस यांनी स्पष्ट केले.

आपल्या १७ पानी योजनेत, सिनेटर टिलिस यांनी, सुरवातीलाच चीनने कोरोना साथीच्या मुद्यावर अमेरिकेला।व जगाला कसे अंधारात ठेवले याचे तपशील दिले आहेत. त्यानंतर पाच भागांमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला व महत्त्वाकांक्षेला कसे धक्के देता येतील, याची योजना मांडली आहे. या भागांमध्ये, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चीनपासून सुरक्षित ठेवणे, चीनवर निर्बंध लादणे, चीनच्या कारवायांची चौकशी करणे व चीनला उघडे पाडणे यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने आशियातील आपले लष्करी सामर्थ्य वाढवावे, असेही टिलिस यांनी आपल्या योजनेत म्हटले आहे. यात त्यांनी, ‘पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह’चा उल्लेख केला असून त्यात भारत, जपान, दक्षिण कोरिया, तैवान व व्हिएतनाम बरोबर संरक्षण सहकार्य वाढविण्याचा आणि या देशांना लष्करीदृष्ट्या अधिक सामर्थ्यशाली बनविण्याची शिफारस केली आहे. यासाठी २० अब्ज डॉलर्स निधीची तरतूद करण्याचेही प्रस्तावात म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेली धमकी व सिनेटर टिलिस यांच्यासह इतर अमेरिकी सदस्यांकडून सादर होणारे चीनविरोधी प्रस्ताव, अमेरिकेने चीनविरोधातील  राजनैतिक युद्ध नव्या पातळीवर नेण्याची तयारी केल्याचे स्पष्ट संकेत ठरतात. अमेरिकेव्यतिरिक्त युरोप व आशियाई देशही सध्या कोरोनाच्या मुद्यावरून चीनवर चांगलेच भडकलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेला चीनविरोधातील संघर्षात जागतिक पातळीवरही चांगले सहकार्य मिळते आहे. ही बाब चीनसाठी घातक ठरणार असून चीनचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे इरादे लवकरच धुळीला मिळालेले दिसू शकतात.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info