कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या बँकांची बुडीत कर्जे विक्रमी स्तरावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या बँकांची बुडीत कर्जे विक्रमी स्तरावर

बीजिंग – कोरोना साथीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेलाही जबरदस्त फटका बसल्याचे समोर येत असून चीनमधील बँकांची बुडीत कर्जे विक्रमी स्तरावर गेली आहेत. मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत चीनमधील व्यावसायिक बँकांवर असलेले बुडीत कर्ज तब्बल ३६७ अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचल्याची माहिती सरकारी यंत्रणेने दिली. कोरोनाव्हायरसची साथ सुरू असताना अवघ्या तीन महिन्यांच्या काळात चिनी बँकांवरील बुडीत कर्जाचा बोजा तब्बल २८ अब्ज डॉलर्सनी वाढल्याचे सरकारी माहितीतून स्पष्ट झाले.

जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोना साथीचे तीव्र परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली असून बहुतांश देश आर्थिक मंदीच्या छायेत आहेत. जपान व जर्मनी या देशांनी काही दिवसांपूर्वीच मंदीची घोषणा केली असून लवकरच युरोप व अमेरिकाही मंदी जाहीर करतील, असे संकेत देण्यात येत आहेत. पण त्याचवेळी जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा चीन आपल्या अर्थव्यवस्थेचे वास्तव जगासमोर मांडण्याचे टाळत होता.

गेल्या आठवड्यात चीनच्या संसद अधिवेशनात पंतप्रधान ली केकियांग यांनी यावर्षी आर्थिक विकास दराचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले नाही, असे सांगितले होते. पंतप्रधान केकियांग यांचे हे वक्तव्य म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेत गडबड असल्याची कबुली मानली जाते. या कबुलीनंतर चीनच्या सरकारी यंत्रणेने बुडित कर्जाचा बोजा विक्रमी स्तरावर दिल्याची माहिती देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

चीनच्या ‘बँकिंग अँड इन्शुरन्स रेग्युलेटरी कमिशन’ने नुकताच तिमाही अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनच्या व्यवसायिक बँकिंग क्षेत्रावरील बुडीत कर्जाचा बोजा ३४० अब्ज डॉलर्स इतका होता. मार्च २०२० च्या अखेरीस हाच बोजा ३६७.७ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे. चीनमध्ये सुमारे १३४ प्रमुख व्यावसायिक बँका असून बुडीत कर्जांचे प्रमाण सुमारे अडीच टक्के नोंदविण्यात आले आहे. त्याचवेळी देशातील ग्रामीण बँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण तब्बल पाच टक्‍क्‍यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.

चीनमधील एकूण बँकिंग क्षेत्राचा विचार करता बुडीत कर्जांची सरासरी दोन टक्के आहे. मात्र व्यावसायिक तसेच ग्रामीण बँकांनी ही सरासरी आधीच ओलांडल्याचे दिसत आहे अर्थतज्ञ व विश्लेषकांच्या मते चीनमधील बँकांनी दाखविलेले हे प्रमाणही फक्त कागदोपत्री दाखविलेली आकडेवारी असून प्रत्यक्षातील कर्जाचा बोजा त्याहून कितीतरी पट अधिक असू शकतो.

अवघ्या तीन महिन्यात बुडीत कर्जाच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ कोरोना साथीचा परिणाम असल्याचा दावा चीनच्या सरकारी यंत्रणा करीत आहेत.मात्र जागतिक स्तरावरील वित्तसंस्था तसेच विश्लेषकांनी चीनच्या अर्थव्यवस्थेतील कर्जाचा बोजा व बुडीत कर्जाचे प्रमाण ही नवी बाब नसल्याकडे सातत्याने लक्ष वेधले आहे.

गेल्या दशकात आलेल्या आर्थिक मंदीनंतर चीनने आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बँकांना प्रचंड प्रमाणात कर्ज वाटण्याची मोकळीक दिली होती. सत्ताधारी राजवटीकडून आलेल्या आदेशानंतर चीनमधील बँकांनी भरमसाठ प्रमाणात कर्जांचे वाटप केले होते. या कर्जवाटपात सरकारी कंपन्या तसेच प्रशासकीय यंत्रणांचा मोठा प्रमाणात समावेश होता. त्यांच्याकडून कर्जांच्या परतफेडीकडे करण्यात आलेले दुर्लक्ष चीनच्या बँकिंग क्षेत्राच्या दुरवस्थेसाठी कारणीभूत ठरत आहे.

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरोधात छेडलेले व्यापार युद्ध व त्यानंतर आता आलेली कोरोनाची साथ या पार्श्वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेत सातत्याने घसरण सुरू झाली आहे. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट ही माहिती सातत्याने लपविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र कोरोनाच्या मुद्द्यावर चीन विरोधात जागतिक स्तरावरील रोष वाढत असून आंतरराष्ट्रीय दडपणही येऊ लागले आहे.

त्याचवेळी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थानी आत्तापर्यंत चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्याचेही संकेत दिले आहेत. या बदलाचा मोठा झटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. त्यामुळे चीनने आपल्या अर्थव्यवस्थेतील नकारात्मक घटक हळूहळू जनतेसमोर आणण्यास सुरुवात केल्याचे दिसते.

एखाद्या देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती त्या देशातील बँकांच्या अवस्थेवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असल्याचे मानले जाते. बँकांच्या बुडीत कर्जात होणारी वाढ त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक बाब ठरते. आर्थिक उद्योगधंदे व व्यापार ठप्प पडल्यानंतर कर्जाची परतफेड करता येत नाही आणि पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था घसरू लागते. मागच्या काही वर्षांपासून चीनमध्ये हा कल दिसू लागला होता.आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था व अर्थतज्ज्ञांनी चीनच्या बँका बुडीत निघतील,अशी चिंता व्यक्त केली होती.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर ही प्रक्रिया अधिकच गतिमान बनली असून चिनी बँकांचा समोर असलेले आव्हान अधिकच भयंकर बनले आहे. मात्र जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या बँकिंग क्षेत्र व अर्थव्यवस्थेसमोरील संकट केवळ चीनपुरते मर्यादित राहणार नाही तर त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होतील , असे काही अर्थतज्ज्ञांनी याआधीच बजावले होते. त्यामुळे चीनमधील या घडामोडी जगातील चिंतेत नवी भर घालणाऱ्या ठरत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info