रशियाकडून ‘डूम्स डे ड्रोन’ची चाचणी सुरू

रशियाकडून ‘डूम्स डे ड्रोन’ची चाचणी सुरू

मॉस्को – सुमारे तीनशे फूट उंचीची त्सुनामी निर्माण करून अख्खे शहर नष्ट करण्याची क्षमता असलेल्या ‘डूम्स डे’ ड्रोनच्या चाचण्या रशियाने सुरु केल्या आहे. रशियाच्या आघाडीच्या वृत्तसंस्थेने या चाचणीची माहिती प्रसिद्ध केली. हे ड्रोन कूठल्याही क्षणी युद्धाचे पारडे फिरवू शकते, असा दावा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दोन वर्षांपूर्वी केला होता. या पार्श्वभूमीवर डूम्स डे ड्रोनच्या या चाचणीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

२०१८ साली रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जगभरातील माध्यमांसमोर रशियाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडविले होते. भविष्यात महायुद्ध पेटले तर रशियाची काय तयारी असेल, याची झलक राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी यावेळी करून दाखविली होती. यामध्ये पाणबुडीतून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या पोसायडन या ड्रोनचाही समावेश होता. सुमारे दोन मेगा टन अणुस्फोटके वाहून नेणारे हे ड्रोन दहा हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. स्वयंचलित असणारा ड्रोन उत्तर अटलांटिक महासागर सहज पार करू शकेल, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर या ड्रोनच्या निर्मितीचे काही फोटो, व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते.

मंगळवारी रशियन वृत्तसंस्थेने ड्रोनच्या चाचणीची माहिती प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. आर्टिकमधील ‘व्हाईट सी’ या सागरी क्षेत्रात बेलगोरोड या पाणबुडीतून सदर ड्रोनची चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती या वृत्तसंस्थेने दिली. गेल्या दोन वर्षांमध्ये या ड्रोनमध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. सर्वात विध्वंसक असणारा हा ड्रोन शत्रूच्या हाती लागू नये किंवा हॅकर्स आणि सायबर दहशतवादी याचा गैरवापर करू नये, म्हणून डूम्स डे ड्रोन पूर्णपणे हॅक-फ्री केल्याचा दावा रशियन यंत्रणा करीत आहेत.

येत्या सप्टेंबर महिन्यात सदर ड्रोन रशियन नौदलात सामील होईल, असा दावा केला जातो. सुमारे ७० नॉट्स (सागरी मैल) इतक्या प्रचंड वेगाने प्रवास करणारा हा ड्रोन कुठलेही नौदल तळ किंवा कोट्यवधींची लोकसंख्या असलेल्या शहरालाही जलसमाधी देऊ शकतो. असे किमान डूम्स डे सोळा ड्रोन तयार करण्याची घोषणा रशियाने केली आहे. हे ड्रोन्स वाहून नेण्यासाठी रशियन नौदलाने याआधीच दोन पाणबुड्या तयार केल्या आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info