चीन-अमेरिका संघर्षात दोघांचेही नुकसानच होईल – चीनचे पंतप्रधान ली केकिआंग यांची धमकी

चीन-अमेरिका संघर्षात दोघांचेही नुकसानच होईल – चीनचे पंतप्रधान ली केकिआंग यांची धमकी

बीजिंग – चीन व अमेरिका या दोन्ही देशांनी परस्परांच्या हितसंबंधांचा आदर राखून मतभेद सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. असे घडले नाही आणि चीन व अमेरिका दोन्ही देश संघर्षासाठी आमनेसामने खडे ठाकले, तर त्यात दोन्ही देशांचे नुकसानच होईल, असा इशारा चीनचे पंतप्रधान ली केकिआंग यांनी दिला. गेली काही वर्षे व्यापार, सायबरहल्ले, तैवान, साउथ चायना सी, हाँगकाँग या मुद्द्यांवर अमेरिका व चीनमध्ये सातत्याने खटके उडत असून कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर दोन देशांमधील तणाव शीतयुद्धापर्यंत पोहोचला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या पंतप्रधानांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

चीनने गेल्या काही वर्षात जागतिक महासत्ता होण्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आर्थिक व लष्करी बळाच्या जोरावर आक्रमक विस्तारवादाचे धोरण राबविले आहे. या धोरणानुसार सध्या जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला प्रत्येक क्षेत्रात आव्हान देण्याच्या हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या धोक्याची जाणीव असून त्यांनी चीनच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी अनेक आघाड्यांवर संघर्षाची भूमिका घेतली आहे.

ट्रम्प यांच्या आक्रमकतेमुळे चीनच्या इराद्यांना झटके बसले असले तरीही सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून माघारीचे कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. उलट आंतरराष्ट्रीय कायदे व नियम धुडकावत अमेरिकेसह शेजारी देशांना धमकावत संघर्ष छेडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान केकिआंग यांचा इशाराही याचाच भाग आहे.

चीनमधील एका पत्रकार परिषदेत पंतप्रधान केकिआंग यांनी, अमेरिकेबरोबर व्यापारी संघर्षाच्या मुद्द्यावर चीनची भूमिका स्पष्ट केली. ‘अमेरिका व चीन या दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून आर्थिक व व्यापारी संबंध असून दोन्ही देशांना त्याचा फायदा झालेला आहे. चीन व अमेरिकेमधील हे संबंध चांगले राहणे दोन्ही देशांच्या तसेच जगाच्याही हिताचे ठरेल. अमेरिकेने दोन्ही देशांमधील आर्थिक व व्यापारी संबंध प्रभावित करण्याचा प्रयत्न केला तर ते कोणाच्याही हिताचे ठरणार नाही आणि जगासाठी सुद्धा हानिकारक ठरेल’, असे चीनच्या पंतप्रधानांनी बजावले. त्याचवेळी केकिआंग यांनी सध्या चीन व अमेरिकेच्या संबंधात काही समस्या तसेच आव्हाने असल्याची कबुलीही दिली आहे.

चीनचे पंतप्रधान अमेरिकी नेतृत्वाला संघर्ष टाळण्याचे सल्ले देत असतानाच प्रत्यक्षात चीनची भूमिका मात्र संघर्ष भडकावा अशीच असल्याचे साऊथ चायना सी मधील नव्या घटनांवरून उघड झाले. चीनच्या लष्कराने गुरुवारी एक निवेदन प्रसिद्ध करून अमेरिकेच्या युद्धनौकेला साऊथ चायना सी क्षेत्रातून पिटाळून लावल्याचा दावा केला. यावेळी चिनी लष्कराच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेच्या साऊथ चायना क्षेत्रातील कारवाया चीनच्या सार्वभौमत्वाला धक्का देणाऱ्या तसेच चिथावणीखोर असल्याचा आरोपही केला.

मात्र चीनच्या या आरोपांना अमेरिकेने चोख प्रत्युत्तर दिले असून आपली युद्धनौका ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’च्या आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करुन गस्त घालत होती, असे म्हटले आहे. साऊथ चायना सी क्षेत्रातील ‘पॅरासेल आयलंड’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या भागात ही घटना घडली असून अमेरिकेची ‘युएसएस मस्टीन’ ही क्षेपणास्त्रसज्ज विनाशिका या भागात गस्त घालत होती. गेल्या महिन्यातही अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी स्प्रेटले व ‘पॅरासेल आयलंड या भागांमध्ये गस्त घातली होती.

अमेरिकी युद्धनौकांचा साऊथ चायना सीमधील हा वाढता वावर चीनच्या विस्तारवादी धोरणासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळेच चीनच्या नौदलाकडून वारंवार अमेरिकी युद्धनौकांचा पाठलाग करून बाहेर पिटाळण्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र अशा घटनानंतरही अमेरिकेने आपल्या युद्धनौकांची गस्त थांबविली नसून उलट आपल्या मित्रदेशांबरोबर या क्षेत्रातील संयुक्त नौदल सरावांचे प्रमाणही वाढविले आहे. अमेरिकेचे हे धोरण चीनच्या वर्चस्ववादी महत्वाकांक्षेला दिलेले उघड आव्हान ठरते.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info