रशियासाठी धोकादायक असलेल्या कोणत्याही हल्ल्याला अणुहल्ल्याने प्रत्युत्तर मिळेल – राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन

रशियासाठी धोकादायक असलेल्या कोणत्याही हल्ल्याला अणुहल्ल्याने प्रत्युत्तर मिळेल – राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन Russia reserves the right to respond to any conventional attack with a nuclear strike: President Vladimir Putin

मॉस्को – रशियाच्या अस्तित्वाला धोका ठरू शकेल अशा कोणत्याही हल्ल्याला यापुढे अणुहल्ल्याने प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला. गेल्या आठवड्यात रशियात झालेल्या एका बैठकीत पुतीन यांनी रशियाच्या नव्या अण्वस्त्र विषयक धोरणाला मान्यता दिली. अमेरिका अण्वस्त्रांव्यतिरिक्त इतर प्रगत शस्त्रांच्या सहाय्याने रशियावर हल्ला चढवून त्याचे नुकसान करू शकेल, अशी चिंता रशियाने तयार केलेल्या नव्या धोरणात व्यक्‍त करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे अमेरिका व चीनसह रशियानेही अण्वस्त्रसज्जतेला वेग दिल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळत आहे.

रशिया, अणुहल्ला

रशियाच्या ‘न्यूक्लिअर डिटरंट पॉलिसी’मध्ये प्रथमच अण्वस्त्रांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पारंपारिक प्रकारे केलेल्या हल्ल्याला अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकेकडून वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित प्रगत शस्त्रे विकसित करण्यात येत असून ही शस्त्रे रशियाच्या प्रमुख लष्करी तळांना नष्ट करू शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन नव्या धोरणाची आखणी करण्यात आली आहे.

रशिया किंवा त्याच्या सहकारी देशावर अण्वस्त्रहल्ला किंवा सर्वसंहारक शास्त्रांच्या सहाय्याने हल्ला झाल्यास आणि शत्रु देशाने पारंपारिक शस्त्रांच्या सहाय्याने हल्ला चढवून रशियाचे अस्तित्वच धोक्यात आणल्यास; अशा हल्ल्यांना रशिया आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर देईल, असा स्पष्ट उल्लेख नव्या धोरणात आहे. त्याचवेळी रशिया किंवा त्याच्या मित्रदेशावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या सहाय्याने हल्ला होणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यास रशिया त्याला आण्विक हल्ल्याने प्रत्युत्तर देईल असेही धोरणात नमूद करण्यात आले. रशियन सरकारसाठी संवेदनशीलदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जागा तसेच लष्करी तळांवर हल्ल्याचाही नव्या धोरणात समावेश करण्यात आला आहे.

रशियाचे हे नवे धोरण अमेरिकेकडून गेल्या काही वर्षात संरक्षण सज्जतेसाठी सुरु असलेल्या आक्रमक हालचालींचा परिणाम असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने रशियाचा सीमेनजिक उभ्या केलेल्या ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स’, सातत्याने वाढत असलेली लष्करी तैनाती, आणि ‘स्पेस बेस्ड वेपन्स’ रशियासाठी मोठे धोके असल्याचा उल्लेख धोरणात आहे.

रशिया, अणुहल्ला

गेल्याच महिन्यात अमेरिका नव्या अणुचाचणीची तयारी करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ही तयारी रशिया व चीनच्या वाढत्या आण्विक क्षमतांना प्रत्युत्तर देण्यासाठी असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्याचवेळी चीन सरकारने अमेरिकेला शह देण्यासाठी किमान एक हजार अण्वस्त्रांनी सज्ज रहावे, अशी मागणी करण्यात आल्याचेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर रशियाकडून नवे आण्विक धोरण जाहीर होणे लक्षवेधी ठरते.

गेल्या दोन वर्षात रशियाकडून सातत्याने प्रगत अण्वस्त्रे तसेच क्षेपणास्त्रांच्या आधुनिक आवृत्त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी अमेरिकेबरोबरील ‘आयएनएफ’ हा क्षेपणास्त्र करार तुटल्यानंतर या चाचण्यांना अधिकच वेग आला आहे. रशिया सध्या वेगवान तसेच क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांना सहज चकवा देऊ शकणार्‍या ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रांचा विकास व निर्मितीवर विशेष भर देत असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही त्याबाबत वारंवार ग्वाही दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्रे संरक्षणदलात तैनात केल्याचीही घोषणा केली होती.

प्रगत व हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची सज्जता असतानाही रशियाने नवे आण्विक धोरण जाहीर करून अण्वसत्रे वाढविण्याचे संकेत दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शस्त्रस्पर्धा अधिकच भडकण्याची शक्यता आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info