उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियावर लष्करी कारवाईची धमकी

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, लष्करी कारवाई

प्योनग्यँग/सेउल – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँगने दक्षिण कोरियाला लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाबरोबरील सर्वच पातळ्यांवरील संपर्क तोडून टाकले होते. दक्षिण कोरियाच्या सीमेवरून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची हेटाळणी करणारे बलून्स सोडले जात आहेत आणि दक्षिण कोरियन सरकार या कारवाया थांबविण्यास अपयशी ठरले आहे, असा ठपका ठेऊन उत्तर कोरियाने हा निर्णय घेतला होता. याच मुद्द्यावरून आता उत्तर कोरियाने पुन्हा एकदा दक्षिण कोरियाला धमकावले आहे. यानंतर दक्षिण कोरियाने तातडीची सुरक्षाविषयक बैठक बोलाविली होती. दक्षिण कोरियातून सोडण्यात येणाऱ्या बलून्सला म्हणजे केवळ निमित्त असून अमेरिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी उत्तर कोरियाकडून या धमक्या देत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, लष्करी कारवाई

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाबरोबरील संपर्क तोडून आपण आक्रमक बनल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता हुकूमशहा किम जाँग उन यांच्या बहिणीने दक्षिण कोरियाला लष्करी कारवाईची धमकी देऊन कोरियन क्षेत्रातील तणाव वाढविला आहे. गेल्या दोन आठवड्यात किम यो जाँग यांनी दक्षिण कोरियाला दिलेली ही दुसरी धमकी आहे. दक्षिण कोरिया शत्रूदेश असल्याचे सांगून दक्षिण कोरियाविरोधात कोणती कारवाई करायची हे आपण उत्तर कोरियाच्या लष्कराच्या प्रमुखांवर सोपवत असल्याचे किम यो जाँगने म्हटले आहे.

किम यो जाँग सध्या उत्तर कोरियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली व्यक्ती असल्याचे सांगितले जाते. सत्ताधारी वर्कर्स पार्टीची पहिली उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यावर किम यो जाँग ही हुकूमशहा किम जाँग उन नंतरचा उत्तर कोरियाचा चेहरा बनली असून गेल्या महिन्यात किम जाँग उन यांच्या अनुपस्थितीत किम यो जाँगच कारभार सांभाळत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे किम यो जाँगकडून देण्यात आलेल्या लष्करी कारवाईच्या धमकीने साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

दक्षिण कोरियाच्या सीमेवरून बलून्समधून हुकूमशहा किम जाँग उन यांच्या विरोधात पत्रके पाठविली जातात हा मुद्दा उत्तर कोरिया केवळ निमित्त म्हणून वापरात आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेबरोबर दोन वर्षांपूर्वी अण्वस्त्रावरून चर्चा सुरु केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि हुकूमशहा किम जाँग उन यांची भेटही झाली. मात्र नंतरच्या काळात ही चर्चा फिस्कटली. अमेरिकेबरोबर अण्वस्त्रावरून चर्चा करण्यामागे अमेरिकेकडून टाकण्यात आलेल्या निर्बंधातून सुटका करून घेण्याचा उत्तर कोरियाचा हेतू होता. मात्र यामध्ये उत्तर कोरियाला यश आले नाही.

साध्य उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक बनली आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे उत्तर कोरियाला चीनला लागून असलेल्या आपल्या सीमा बंद कराव्या लागल्या होत्या. उत्तर कोरियाचा सर्व व्यापार चीनबरोबरच होतो, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. तसेच आपल्या देशात कोरोना नसल्याचे दावे उत्तर कोरियाकडून करण्यात येत असले, तरी यावर विश्लेषकांचा विश्वास नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या निर्बंधातून उत्तर कोरियाला सुटका हवी आहे. हुकूमशहा किम जाँग उन सध्या निराश असून अमेरिकेबरोबर पुन्हा चर्चा सुरु करण्यासाठी दक्षिण कोरियाला लक्ष्य केले जात असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

तसेच सध्या उत्तरकोरियातील परिस्थितीपासून जनतेचे लक्ष इतरत्र वाळविण्यासाठी दक्षिण कोरियाबरोबरील तणाव वाढविला जात असल्याचा दावा काही विश्लेषक करीत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info