हॉंगकॉंग मुद्द्यावरून चीन व आंतरराष्ट्रीय समुदायादरम्यान तणाव चिघळला

हॉंगकॉंग मुद्द्यावरून चीन व आंतरराष्ट्रीय समुदायादरम्यान तणाव चिघळला

हॉंगकॉंग/वॉशिंग्टन/लंडन – हॉंगकॉंग कायद्याच्या अंमलबजावणीवरुन चीन व आंतरराष्ट्रीय समुदायादरम्यान निर्माण झालेला तणाव अधिकच चिघळू लागला आहे. अमेरिका व ब्रिटनने चीनविरोधात नव्या कारवाईचे संकेत दिले असून कॅनडाने हॉंगकॉंगबरोबर केलेला करार स्थगित केल्याची जाहीर केले. त्याचवेळी चीनने हॉंगकॉंग मुद्द्यावरून ब्रिटनकडून करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात नवा इशारा दिला आहे. चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून हॉंगकॉंग कायद्याअंतर्गत करण्यात येणार्‍या कारवाईची व्याप्तीही सातत्याने वाढविण्यात येत असून आता सोशल मीडिया व पुस्तकांवर बंदीचे संकेत देण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, हॉंगकॉंगसाठी तयार केलेल्या ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’वर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर बुधवार १ जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. या कायद्यानुसार, चीनच्या विरोधात करण्यात येणारे कोणतेही कृत्य बेकायदेशीर व राष्ट्रविरोधी ठरवण्यात आले असून, असे कृत्य करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार अटक केलेल्या हॉंगकॉंगच्या नागरिकांवर कोणतेही स्थानिक कायदे लागू होणार नाहीत. नव्या कायद्याअंतर्गत दाखल होणारे खटले गुप्त पद्धतीने चालविण्याची परवानगीही संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे.

त्यानंतर हॉंगकॉंगमध्ये अनेक जणांना नव्या कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे. हॉंगकॉंग प्रशासनाकडून दररोज नवे नियम व तरतुदींची जाहीर करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी हॉंगकॉंगमध्ये झालेल्या चीन विरोधी आंदोलनादरम्यान ‘लिबरेट हॉंगकॉंग’ ही घोषणा लोकप्रिय झाली होती. मात्र नव्या कायद्यानुसार ही घोषणा चीनविरोधी असून अशी घोषणा देणाऱ्यांवर खटले चालविण्यात येतील असे जाहीर करण्यात आले. हॉंगकॉंग मधील लोकशाहीवादी नेते व कार्यकर्त्यांनी लिहिलेली पुस्तकेही शाळा व स्थानिक ग्रंथालयातून गायब करण्यात आली आहेत. हॉंगकॉंगमधील इंटरनेटवरही निर्बंध लादण्यात आले असून चीनच्या राजवटीला आक्षेपार्ह वाटणारी माहिती काढून टाकण्याचे अधिकार पोलिस व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

हॉंगकॉंगमधील या घटनांवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी तीव्र टीकास्त्र सोडले. ‘मुक्त हॉंगकॉंगला उद्ध्वस्त करण्याची चीनच्या कम्युनिस्ट राजवटीची कारवाई वेगाने सुरू आहे. आतापर्यंत स्वतंत्र कायदे व नियम, अभिव्यक्तिस्वातंत्र्य व मुक्त विचारसरणी यामुळे हॉंगकॉंगची भरभराट सुरू होती. मात्र यापुढे हे चित्र दिसणार नाही’, या शब्दात चीनला धारेवर धरून हॉंगकॉंगमध्ये सुरू झालेली दडपशाही जॉर्ज ऑरवेल यांच्या कादंबरीतील वर्णनाप्रमाणे आहे, असा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

प्रसिद्ध साहित्यिक जॉर्ज ऑरवेल यांनी ‘१९८४’ या कादंबरीत, एकाधिकारशाही असलेल्या सत्ताधारी राजवटीकडून आपल्या नागरिकांवर करण्यात येणारी टेहळणी व दडपशाहीचे वर्णन केले आहे. हॉंगकॉंगमधील कारवायांसाठी चीनच्या राजवटीवर ठपका ठेवतानाच परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी अमेरिका नव्या कारवाईच्या तयारीत असल्याचे वक्तव्य केले असून त्यात चिनी ॲप्सवरील बंदीचा समावेश असू शकतो, असे संकेत दिले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री नव्या कारवाईचे संकेत देत असतानाच ब्रिटननेही हॉंगकॉंग मुद्द्यावरून चीनविरोधात आक्रमक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. चीनने हॉंगकॉंग कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर ब्रिटनने तात्काळ प्रतिक्रिया देताना हॉंगकाँगच्या नागरिकांना ब्रिटनचे नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ आता मानवाधिकारांचे उल्लंघन व इतर मुद्द्यांवरून चीन तसेच हॉंगकॉंगमधील अधिकाऱ्यांवर निर्बंध टाकण्याची तयारी सुरू असल्याचे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी सांगितले. ब्रिटनकडून सुरू झालेल्या या हालचालींवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

‘ब्रिटनकडून हॉंगकॉंग मुद्यावर करण्यात येणारी वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहेत. ब्रिटनच्या हालचाली हॉंगकॉंग कारभारातील हस्तक्षेप असून तो खपवून घेतला जाणार नाही. ब्रिटनला त्याचे परिणाम भोगावे लागतील’, असा गंभीर इशारा चीनचे ब्रिटनमधील राजदूत लिऊ शाओमिंग यांनी दिला. अमेरिका व ब्रिटन पाठोपाठ कॅनडानेही हॉंगकॉंग मुद्द्यावरून कारवाई सुरू केली आहे. कॅनडा सरकारने हॉंगकॉंगला करण्यात येणार्‍या निर्यातीवर निर्बंध लादले असून हॉंगकॉंग प्रशासनाबरोबर केलेला प्रत्यार्पण करार स्थगित केल्याची घोषणा केली. कॅनडाच्या कारवाईवर चीनकडून प्रतिक्रिया उमटली असून चीनच्या राजवटीने, आपल्या नागरिकांना कॅनडात प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

चीनने हॉंगकॉंगमध्ये सुरु केलेल्या कारवाया व त्याचे समर्थन करताना जगातील प्रमुख देशांविरोधात घेतलेली भूमिका, यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून जबरदस्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. पुढील काळात त्याचे गंभीर परिणाम चीनला सहन करावे लागतील, असे संकेत आताच मिळू लागले आहेत. त्यामुळे हॉंगकॉंगच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय समुदाय व चीनमध्ये सुरू झालेला संघर्ष अधिकच चिघळू शकतो.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info