इराणकडून अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ल्याचे संकेत

इराणकडून अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ल्याचे संकेत

दुबई – इराणच्या वेगवान गस्तीनौकांच्या ताफ्यापासून अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका सुरक्षित नसल्याचे संकेत इराणने दिले आहेत. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती होर्मुझच्या आखातात उतरवून इराणने हा इशारा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. काही तासांपूर्वीच अमेरिकेची ’युएसएस निमित्झ’ युद्धनौका पर्शियन आखातात दाखल झाली. त्यानंतर इराणने ही हालचाल केल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून उघड होत आहे.

विमानवाहू युद्धनौका, इराण, अमेरिका

अमेरिकेतील ’मॅक्सार टेक्नोलॉजीज्’ या गटाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्समध्ये इराणने होर्मुझच्या आखातात अमेरिकेच्या निमित्झ या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती उतरविली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंदर अब्बास येथे ही प्रतिकृती तैनात होती. टगबोटीच्या सहाय्याने सदर प्रतिकृती होर्मुझच्या आखातात दाखल होताच, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‍सची गस्तीनौका वेगाने सदर युद्धनौकेच्या प्रतिकृतीच्या दिशेने प्रवास करतानाचा फोटो समोर आला आहे. इराणचे सरकार तसेच माध्यमांनी या बातमीवर प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. २०१५ साली इराणने होर्मुझच्या आखातात केलेल्या युद्धसरावावेळी अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती उद्ध्वस्त केली होती. यावेळी देखील इराण युद्धसरावाद्वारे सदर प्रतिकृती उद्ध्वस्त करुन अमेरिकेला इशारा देईल, असा दावा केला जातो.

विमानवाहू युद्धनौका, इराण, अमेरिका

अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ’युएसएस निमित्झ’ ही काही तासांपूर्वीच हिंदी महासागराचा प्रवास करुन पर्शियन आखातात दाखल झाली आहे. सदर युद्धनौका होर्मुझच्या आखातातून प्रवास करणार का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण इराणने निमित्झची प्रतिकृती या सागरी क्षेत्रात उतरविल्यानंतर या क्षेत्रातील तणावात वाढ झाल्याचे बोलले जाते. याआधीच इराणच्या गस्तीनौकांनी अमेरिका व मित्रदेशांच्या युद्धनौकांचा धोकादायक पाठलाग केल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी इराणच्या गस्तीनौकेला अमेरिकी युद्धनौकेला जवळपास टक्कर दिली होती. अमेरिकेने इराणच्या या प्रक्षोभक कारवाईवर सडकून टीका केली होती. तसेच पुन्हा अशी आगळिक केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे बजावले होते. यानंतर पर्शियन आखातातील तणावात भर पडली होती.

गेल्या आठवड्यात सिरियाच्या हवाई हद्दीत अमेरिकेच्या लढाऊ विमानाने इराणच्या प्रवासी विमानाजवळून गस्त घातली होती. यावर संताप व्यक्त करून इराणने अमेरिकेला धमकावले होते. त्यानंतर इराणने अमेरिकेच्या युद्धनौकेची प्रतिकृती उतरविल्याचे काही विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. काही आठवड्यांपूर्वी इराणने “अंडरग्राऊंड मिसाईल सिटी”ची घोषणा केली होती. किनारपट्टीजवळील या क्षेपणास्त्रांचा वापर पर्शियन आखातातील परदेशी जहाजांना लक्ष्य केले जाईल, अशी धमकी इराणने दिली होती. त्यामुळे पर्शियन आखातातील घडामोडींकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info