चीनकडून अमेरिकेला ‘लष्करी अपघाता’चा इशारा

चीनकडून अमेरिकेला ‘लष्करी अपघाता’चा इशारा

बीजिंग – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील गस्तीसाठी स्पाय प्लेन आणि विनाशिका रवाना करणार्‍या अमेरिकेला चीनने धमकावले आहे. अमेरिकेने सदर सागरी क्षेत्रातील प्रक्षोभक कारवाया रोखल्या नाही तर चीन आणि अमेरिकेत ‘लष्करी अपघाता’ची शक्यता नाकारता येत नाही, अशी धमकी चीनने दिली. काही तास आधी चीनने या सागरी क्षेत्रात विमानवाहू युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन अमेरिकेच्या युद्धनौकांना इशारा दिला होता. त्यामुळे क्षेपणास्त्र चाचणीनंतर चीनने अमेरिकेला लष्करी अपघाताविषयी दिलेल्या धमकीचे गांभीर्य वाढले आहे. चीनच्या या क्षेपणास्त्र चाचणीनंतर सदर सागरी क्षेत्रातील अमेरिकेच्या लष्करी हालचाली देखील अधिक आक्रमक होतील, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

‘लष्करी अपघाता'

जपान, दक्षिण कोरिया, तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया या देशांना व्यापणार्‍या सागरी क्षेत्रात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून एकाच वेळी तीन युद्धसराव सुरू आहेत. यामध्ये साऊथ चायना सी, तैवानचे आखात व ‘यल्लो सी’ यांचा समावेश आहे. तीन वेगवेगळ्या क्षेत्रात हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर कसे देता येईल यासाठी हा अभ्यास सुरू असल्याचे चीनच्या लष्कराने म्हटले आहे. या लाईव्ह फायर’ युद्धसरावासाठी चीनने नो फ्लाय झोनची घोषणा केली होती. पण चीनचा हा युद्धसराव म्हणजे सदर सागरी क्षेत्रावरील आपली पकड मजबूत करण्याचा तसेच अमेरिकेला आव्हान देण्याचा प्रयत्‍न असल्याचा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत. चीनच्या या युद्धसरावामुळे सदर सागरी क्षेत्रातील तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या यू-२ या स्पाय प्लेनने सदर सागरी क्षेत्रातून गस्त घातल्याने चीनचा पारा चढला होता.

‘लष्करी अपघाता'

त्यातच गेल्या चोवीस तासात अमेरिकेने सदर सागरी क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामासंबंधी चीनच्या २४ कंपन्यांवर निर्बंधांची घोषणा केली. त्याचबरोबर अमेरिकेच्या ‘युएसएस मार्टिन’ या युद्धनौकेने या सागरी क्षेत्रातून गस्त घातल्याने चीन अधिकच खवळला आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील या गस्तीचे समर्थन केले आहे. तसेच ही गस्त अमेरिकेच्या वेळापत्रकावर आधारित होती, असे एस्पर यांनी म्हटले आहे. पण साऊथ चायना सी’च्या संपूर्ण सागरी क्षेत्रावर आपलाच अधिकार असल्याचा दावा करणार्‍या चीनने यावर संताप व्यक्त करुन अमेरिकेला संघर्षाचे संकेत दिले आहेत. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या ‘सदर्न कमांड’चे प्रवक्ते कर्नल ली हुआमिन यांनी शुक्रवारी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील अमेरिकेच्या लष्करी हालचालींवर टीका केली. ‘अमेरिकेच्या विनाशिकेने चीनच्या परवानगीशिवाय या क्षेत्रातून प्रवास केला असून चीनच्या नौदलाने अमेरिकेच्या युद्धनौकेला पिटाळून लावले’, असा दावा कर्नल हुआमिन यांनी केला.

‘लष्करी अपघाता'

त्याचबरोबर, “आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचा आधार घेऊन अमेरिकेने चीनचे सार्वभौम अधिकार, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले तर ‘लष्करी अपघात’ घडू शकतो”, अशी धमकी कर्नल हुआमिन यांनी दिली. तर अमेरिकेच्या चिथावणीला आणि दबावाला आपण भीत नसल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. लष्करी दबावाला बळी पडून चीन अमेरिकेच्या तालावर नाचणार नसून चीन अमेरिकेला योग्य ते प्रत्युत्तर देईल, असा इशारा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिला होता. या इशार्‍याबरोबर चीनने साऊथ चायना सी’तील युद्धसरावावेळी चार क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. यामध्ये डाँगफेंग श्रेणीतील ‘डिएफ-२१डी’ व ‘डिएफ-२६बी’ या विमानवाहू युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांचा समावेश होता. अमेरिकेची विनाशिका या सागरी क्षेत्रात गस्त घालत असताना चीनने सदर क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन अमेरिकेला धमकावल्याचा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत.

‘लष्करी अपघाता'

‘साऊथ चायना सी’च्या वादग्रस्त सागरी क्षेत्रातील युद्धसरावात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन चीनने या क्षेत्रातील शांती व सुरक्षा धोक्यात टाकल्याची टीका अमेरिकेने केली आहे. चीन दावा करीत असलेले साऊथ चायना सी’चे क्षेत्र वादग्रस्त असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे या वादग्रस्त सागरी क्षेत्रातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी ही आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे उल्लंघन करणारा असल्याची टीका अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने केली आहे.

दरम्यान, अमेरिका व चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात लष्करी सामर्थ्याचे जबरदस्त प्रदर्शन सुरू असून, त्यातून संघर्षाची ठिणगी पडू शकते, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे. यापैकी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील या दोन्ही देशांच्या लष्करी हालचाली तणाव वाढविणार्‍या ठरत आहेत.

English    हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info