चीन व रशियाने अंतराळक्षेत्राचे रूपांतर युद्धभूमीत केले आहे – अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर

चीन व रशियाने अंतराळक्षेत्राचे रूपांतर युद्धभूमीत केले आहे – अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर
वॉशिंग्टन – ‘चीन व रशियाने एकेकाळी शांततापूर्ण क्षेत्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अंतराळक्षेत्राचे रूपांतर युद्धभूमीत केले आहे. किलर सॅटेलाईट्स, डायरेक्टेड एनर्जी वेपन्स व अधिकाधिक घातक शस्त्रांनी हे दोन्ही देश अमेरिकेची अवकाशातील यंत्रणा खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंतराळातील सज्जतेच्या माध्यमातून चीन व रशिया अमेरिकेच्या  संरक्षणक्षेत्रातील वर्चस्वाला आव्हान देत आहेत’, असा आरोप अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी केला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या  अहवालात, अंतराळ क्षेत्रातील चीनच्या महत्त्वाकांक्षांकडे लक्ष वेधण्यात आले होते.
मार्क एस्पर
अमेरिकेत झालेल्या ‘एअरफोर्स असोसिएशन’च्या व्हर्च्युअल बैठकीत संरक्षण मंत्री एस्पर यांनी चीन व रशियाच्या अंतराळातील कारवायांची जाणीव करून दिली. गेल्या काही वर्षांत चीन व रशिया या दोन्ही देशांनी अंतराळक्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. मे महिन्यात चीनने आपल्या ‘स्पेस स्टेशन’साठी ‘लॉंग मार्च ५बी’ हे रॉकेट अवकाशात सोडले होते. त्यापूर्वी चीनने ‘अँटी सॅटेलाईट मिसाईल्स’ विकसित केल्याची माहितीही समोर आली होती. चंद्रावर तसेच मंगळावर अंतराळवीर धाडण्याच्या मोहिमांनाही वेग देण्यात आला असून अंतराळात तळ उभारण्यासाठीही चीन हालचाली करीत आहे.
चीनच्या अंतराळातील हालचालींना रशियाची साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनकडून सुरू असलेल्या अनेक मोहिमांमध्ये रशियन कंपन्या तसेच तज्ज्ञांचा समावेश आहे. दोन्ही देशांमध्ये अंतराळक्षेत्रात झालेले करार याला पुष्टी देणारे आहेत. जुलै महिन्यात रशियाने गुप्तपणे उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन खळबळ उडवली होती. या सर्व कारवायांची  अमेरिकेने गंभीर दखल घेतली असल्याचे संरक्षणमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून दिसून येते. चीन व रशियाच्या अंतराळातील हालचालींविरोधात अमेरिकेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचेही एस्पर यांनी स्पष्ट केले.
मार्क एस्पर
 ‘अमेरिकेचा संरक्षण विभाग अंतराळातील वर्चस्वासाठी प्रगत तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करीत आहे. संरक्षण विभागाच्या इतिहासात अंतराळसज्जतेसाठी सर्वात मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यात हायपरसोनिक वेपन्स, डायरेक्टेड एनर्जी सिस्टिम व स्वयंचलित तंत्रज्ञानाचा समावेश आहे’, असे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या दोन वर्षात अमेरिकेची अंतराळातील सज्जता वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकी संरक्षणदलाची सहावी कमांड म्हणून ‘स्पेस फोर्स’ची स्थापना आणि त्यासाठी केलेली ७० अब्ज डॉलर्सहून अधिक निधीची तरतूद यासारखे निर्णय त्याची साक्ष देतात.
अमेरिकेबरोबरच ब्रिटननेही रशिया व चीनच्या अंतराळातील कारवायांची दखल घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी ब्रिटनने याबाबत इशाराही दिला होता. ‘अंतराळ क्षेत्राच्या शांतीपूर्ण वापराला रशिया तसेच चीनकडून असलेला धोका वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, ब्रिटन आपल्या अंतराळविषयक धोरणात मोठे बदल करणार असून यापुढे रशिया व चीनच्या अंतराळातील आगळिकीला ब्रिटन उत्तर देईल’, असे ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी बजावले होते.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info