चीनला रोखण्यासाठी अमेरिका ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये तटरक्षक दल तैनात करणार – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन

चीनला रोखण्यासाठी अमेरिका ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये तटरक्षक दल तैनात करणार – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन

वॉशिंग्टन – ‘अमेरिका हा पॅसिफिक क्षेत्रातील सामर्थ्यशाली देश आहे. चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात बेकायदा व अनियंत्रित मासेमारीसह अनेक कारवाया सुरू आहेत. या क्षेत्रातील देशांच्या हद्दीत घुसून त्या देशांच्याच जहाजांना त्रास दिला जात आहे. ही बाब अमेरिकेसह इंडो-पॅसिफिकमधील आमच्या सहकारी देशांच्या सार्वभौमत्वाला धोका उत्पन्न करणारी आहे. चीनच्या या कारवायांनी क्षेत्रिय स्थैर्यालाही धक्के बसत आहेत. अस्थैर्य व धोका वाढविणाऱ्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू असून त्यात यापुढे तटरक्षक दलही सहभागी होणार आहे. त्यांची या क्षेत्रातील तैनाती अत्यंत महत्त्वाची ठरेल’, या शब्दात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीनच्या वर्चस्ववादी इराद्यांना नवा धक्का दिला.

रॉबर्ट ओब्रायन

चीनच्या नौदलाने गेल्या काही महिन्यात पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. चीनच्या युद्धनौकांबरोबरच तटरक्षक दलाची जहाजे व चीनच्या सशस्त्र मच्छिमार बोटिंची पथके (नेव्हल मिलिशिया) यांचा वावर वाढला आहे. चीनच्या युद्धनौका व बोटी या सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या इतर देशांच्या बोटींना सातत्याने त्रास देत आहेत. एप्रिल महिन्यात चीनच्या गस्तीनौकांनी व्हिएतनामच्या मच्छिमार जहाजाला धडकही दिली होती. मे महिन्यात चीनच्या जहाजांनी मलेशियाच्या सागरी क्षेत्रानजिक ठाण मांडले होते. त्यानंतर चीनकडून फिलिपाईन्स व इंडोनेशियाच्या हद्दीतही अशाच घुसखोरीच्या कारवाया झाल्याचे समोर आले होते. चीनच्या सुमारे ३०० मच्छिमार बोटी व जहाजे थेट लॅटिन अमेरिकी देशांनजिकच्या सागरी हद्दीत दाखल झाल्याचे ऑगस्ट महिन्यात उघड झाले होते. चीनच्या या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकाही या भागात अधिक सक्रिय झाली आहे.

जुलै महिन्यात, अमेरिकेने साऊथ चायना सीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना चीनविरोधात उघड संघर्षाची भूमिका जाहीर केली होती. अमेरिका मुक्त व खुल्या ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राचा कट्टर पुरस्कर्ता असून या क्षेत्राचा भाग असणाऱ्या साऊथ चायना सीवरील चीनचे सर्व दावे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, अशा स्पष्ट व खणखणीत शब्दात अमेरिकेने साऊथ चायना सीवरील चीनचा हक्क धुडकावला होता. त्याचवेळी या क्षेत्रातील इतर देशांच्या ताब्यातील भाग चीनने बळकावल्याचा आरोप ठेवून, अशा देशांच्या संरक्षणासाठी अमेरिका ठामपणे उभी राहील, असा इशाराही अमेरिकेने दिला होता.

रॉबर्ट ओब्रायन

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ओब्रायन यांनी तटरक्षक दलाच्या तैनातीबाबत केलेले वक्तव्य त्याचाच भाग ठरतो. अमेरिकी तटरक्षक दलात ‘फास्ट रिस्पॉन्स कटर्स’ प्रकारातील प्रगत जहाजे सामील करण्यात येत असून, ही जहाजे इंडो-पॅसिफिकमध्ये तैनात करण्यात येतील, असे ओब्रायन यांनी सांगितले. दक्षिण पॅसिफिक क्षेत्रातील ‘अमेरिकन समोआ’ या बेटावर ‘फास्ट रिस्पॉन्स कटर्स’चा तळ उभारण्याचा प्रस्ताव असल्याचेही अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी स्पष्ट केले. तटरक्षक दलाच्या या जहाजांवर सागरी सुरक्षा, गस्त, टेहळणी, स्थानिक भागीदार देशांना सहकार्य करणे व ‘फ्रीडम ऑफ नॅव्हीगेशन’ मोहिमा यासारख्या जबाबदाऱ्या असतील असे संकेतही त्यांनी दिले.

अमेरिकेकडून गेल्या वर्षभरात इंडो-पॅसिफिकमधील आरमारी हालचाली मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. त्यात विमानवाहू युद्धनौकांच्या तैनातीसह, विनाशिकांची गस्त व नौदल सरावांचा समावेश आहे. त्यावर तीव्र नाराजी दर्शविताना, अमेरिका नौदल वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चीनने केला होता. मात्र चीनच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून, अमेरिकेने तटरक्षक दलाच्या माध्यमातून आपल्या इंडो-पॅसिफिकमधील हालचाली अधिकच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचा हा निर्णय चीनला दिलेला स्पष्ट संदेश असल्याचे दिसते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info